‘डेअरिंग’दाखवत जिगरबाज अनिताने हाती घेतले रुग्णवाहिकेचे ‘स्टेअरिंग’
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2026 16:37 IST2026-03-08T16:36:27+5:302026-03-08T16:37:15+5:30
- उद्योगनगरीतील पहिल्या महिला रुग्णवाहिका चालक

‘डेअरिंग’दाखवत जिगरबाज अनिताने हाती घेतले रुग्णवाहिकेचे ‘स्टेअरिंग’
- रवींद्र जगधने
पिंपरी : शिक्षण फक्त चौथी पास, पण रुग्णवाहिका चालवण्यातील सफाई वाखाणण्यासारखी. त्यामुळेच महाराष्ट्रातील पहिल्या महिला रुग्णवाहिका चालकांपैकी एक अशी ओळख मिळाली. कोरोनाच्या काळात वाहनचालकांनी घरात बसणे पसंत केले असताना, या जिगरबाज रणरागिणीने कोरोनाचे रुग्ण आणि मृतदेहही स्वत: उचलून रुग्णवाहिकेत ठेवले आणि त्या-त्या ठिकाणी पोहोचवलेही..! अनिता संजय गोसावी (वय ४६) यांची ही कहाणी.
वाल्हेकरवाडी येथे राहणाऱ्या अनिता आता आजीबाई झाल्या आहेत, कारण मुलगा-मुलगी विवाहित असून नातवंडेही झाली आहेत. आई-वडील, भाऊ-बहीण यांच्यासोबत त्या राहतात. मूळगाव अकलूजहून २००८ मध्ये त्या कुटुंबासह पुण्यात आल्या. आधी स्कूल बसवर मदतनीस म्हणून काम केले होते, त्यामुळे वाहन चालवण्याची आवड निर्माण झाली. त्यातूनच त्या २०१७ मध्ये ड्रायव्हिंग शिकल्या. सरावासाठी जुना टेम्पो घेतला. त्यासाठी सोने मोडले. त्या टेम्पोतून अनिता आईच्या भाजी दुकानासाठी मार्केट यार्डमधून भाजी आणत. यादरम्यान २०१५ मध्ये पतीला अर्धांगवायू झाला आणि २०२३ मध्ये त्यांचे निधन झाले.
भावाची रुग्णवाहिका होती. २०१९ मध्ये भावाला कोरोना झाल्याने तो क्वारंटाइन झाला. तेव्हा अनिताताईंनी रुग्णवाहिकेचे स्टेअरिंग हाती घेतले. कोरोनाचा पहिला रुग्ण सोडताना मनात धास्ती होती, पण पीपीई किटमुळे धाडस आले. मग त्यांनी मागे वळून पाहिले नाही. कोरोना रुग्णांना रुग्णालयापर्यंत आणि मृतदेह स्मशानभूमीपर्यंत पोहोचवले. एका रुग्णाला तर १,१०० किलोमीटरचा प्रवास करून गुजरातपर्यंत पोहोचवले होते. धाडस, मेहनत आणि मानवतेच्या भावनेने अनिता यांनी अनेकांचे जीवन वाचवले आहे आणि मृतदेहांना सन्मानाने निरोप दिला आहे.
जखमी रुग्ण, कुजलेले मृतदेहांना दिला हात
ताईंनी जुनी मारुती व्हॅन विकत घेऊन रुग्णवाहिका बनवली. सुरुवातीला वायसीएम रुग्णालयाजवळ महिनाभर रुग्णवाहिका उभीच होती. त्यानंतर अनुभवी चालकांच्या सल्ल्याने रुग्णालय, ‘डेड हाऊस’ परिसरात फिरून माहिती दिली. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पहिला मृतदेह भोसरी स्मशानभूमीत पोहोचवला. त्यानंतर त्यांनी सलग दीड महिने दिवसरात्र सेवा दिली. घरच्यांच्या काळजीमुळे केवळ दोन-चार दिवस घरी थांबल्या. आता त्या अपघातातील जखमी, कुजलेले मृतदेह स्वत: उचलून घेऊन जातात. रात्री-अपरात्री काम असते. बेवारस मृतदेहांसाठी मोफत सेवा देतात.
बहिणीनेही पावलावर ठेवले पाऊल
लांबच्या प्रवासात अनिता छोटी बहीण वनिता गिरी यांना सोबत घेऊन जात असत. त्याही २०२३ पासून रुग्णवाहिका चालवतात. त्यांच्या पतीचे अपघातात निधन झाले असून रुग्णवाहिका चालवूनच कुटुंबाचे पालनपोषण करत आहेत.