शिवसृष्टीमुळे बारामतीचे सांस्कृतिक व पर्यटन महत्त्व अधिक वाढेल; अजित पवारांचा विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2025 10:27 IST2025-08-29T10:23:16+5:302025-08-29T10:27:20+5:30

- कन्हेरी परिसरातील विविध विकासकामांची पाहणी करत अधिकाऱ्यांना केल्या सूचना : शिवाजी महाराजांची भव्य प्रतिकृती उभारणार, पर्यटनाला चालना मिळून रोजगाराच्या संधी निर्माण होणार

pune news shivsruthi will further increase the cultural and tourism importance of baramati ajit Pawar | शिवसृष्टीमुळे बारामतीचे सांस्कृतिक व पर्यटन महत्त्व अधिक वाढेल; अजित पवारांचा विश्वास

शिवसृष्टीमुळे बारामतीचे सांस्कृतिक व पर्यटन महत्त्व अधिक वाढेल; अजित पवारांचा विश्वास

बारामती : कन्हेरी परिसरात शिवसृष्टीमुळे पर्यटकांना इतिहासाची ओळख आणि त्यातून प्रेरणा मिळेल. तसेच बारामतीचे सांस्कृतिक व पर्यटन महत्त्व अधिक वाढेल, असा विश्वास राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित यांनी व्यक्त केला. उपमुख्यमंत्री पवार यांनी आज बारामती परिसरातील विविध विकासकामांची पाहणी केली. शिवसृष्टी, कन्हेरी वन उद्यान परिसर, तांदुळवाडी येथील वृद्धाश्रम तसेच तिरंगा चौकाची पाहणी करून अधिकाऱ्यांना सूचना केल्या. यावेळी खासदार सुनेत्रा पवार उपस्थित होत्या.

पवार यांनी शिवसृष्टी या ऐतिहासिक थीम पार्क परिसरातील कॅनॉल शेजारील रस्त्याची पाहणी केली व सुधारित कामासाठी सूचना दिल्या. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन प्रवासाचे दर्शन घडवणाऱ्या अनेक भव्य प्रतिकृती उभारण्यात येणार आहेत. यामध्ये शिवकाळातील सदरा व आग्रा दरबार, शिवकालीन बाजारपेठा व राजसभा, राजगड प्रवेशद्वाराची प्रतिकृती, शिवकालीन आरमार आणि माहितीपट व थ्रीडी अॅनिमेशनद्वारे शिवकालीन युद्धाचा प्रत्यक्ष अनुभव घेता येणार आहे.

पवार यांनी बारामतीच्या वनपरिक्षेत्र अंतर्गत उभारण्यात आलेल्या कन्हेरी वन उद्यान परिसरातील विकासकामांची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांकडून कामाच्या संदर्भातील माहिती जाणून घेतली. यावेळी 'अॅडव्हेंचर अँड नेचर क्लब' मार्फत साहसी खेळांच्या प्रशिक्षण कार्यक्रमाचा समारोप झाला. यावेळी १४ प्रशिक्षणार्थीना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. अशा उपक्रमांच्या माध्यमातून युवा वर्गाला रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील आणि बारामतीच्या पर्यटनाला चालना मिळेल, असा विश्वासही उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

यावेळी उप वनसंरक्षक महादेव मोहिते, उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर, एमआयडीसीचे प्रादेशिक परिवहन अधिकारी हनुमंत पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल पवार, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता दिगंबर डुबल आदी उपस्थित होते.

Web Title: pune news shivsruthi will further increase the cultural and tourism importance of baramati ajit Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.