Shivshahi AC : शिवशाहीच्या ‘एसी’ पडताहेत बंद; प्रवासी होताहेत घामाघूम
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2025 16:23 IST2025-04-10T16:19:55+5:302025-04-10T16:23:14+5:30
शिवशाही बस मार्गावर सोडताना योग्य देखभाल दुरुस्ती न करता सोडण्यात येते

Shivshahi AC : शिवशाहीच्या ‘एसी’ पडताहेत बंद; प्रवासी होताहेत घामाघूम
- अंबादास गवंडी
पुणे : अस्वच्छ बस, बंद खिडक्या, फाटलेल्या सीट अशा बिकट अवस्था असणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) शिवशाही बसमधून प्रवाशांना घामाघूम होऊन प्रवास करावा लागत आहे. कारण, शिवशाही बसमधील एसी अचानक बंद पडण्याचे प्रमाण वाढत आहे. सध्या उन्हाचा कडाका वाढला असून, पैसे देऊनही प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.
काही शाळांना सुटी लागल्याने गावी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली आहे, तसेच लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्या फुल झाल्याने प्रवासी एसटीकडे वळले आहेत, तसेच राज्य सरकारकडून सवलती दिल्याने प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली आहे. एसटी प्रशासनाकडून जादा गाड्या सोडण्यात आल्या आहेत. अनेक मार्गांवर गाड्या वाढविल्या आहेत. एसटीकडून महिला व ज्येष्ठ नागरिकांना सवलतीमध्ये प्रवास करण्याची सोय आहे. त्यामुळे महिला व ज्येष्ठांची चांगली गर्दी एसटीला वाढली आहे; परंतु शिवशाही बसमधून प्रवास एसी बंद पडत असल्याने उन्हाळ्यात घामाघूम होऊन प्रवास करावा लागत आहे. एसटीच्या ताफ्यात बसची संख्या कमी आहे.
शिवाय प्रवाशांची संख्या वाढत आहे. त्यामुळे जुन्याच बस मार्गावर चालविल्या जात आहेत. लांब पल्ल्याच्या मार्गावर अनेक बस रस्त्यातच बंद पडत आहेत. भर उन्हात बस बंद पडल्यानंतर नागरिकांना बसमध्ये थांबता येत नाही, तसेच जवळ सावलीदेखील मिळत नाही. दुसरी बस मिळेपर्यंत उन्हातच थांबावे लागते. त्याचा त्रास प्रवाशांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे एसटीचा प्रवास जिवावर उदार होऊन करावा लागत आहे.
देखभाल दुरुस्तीविना बस मार्गावर :
शिवशाही बस मार्गावर सोडताना योग्य देखभाल दुरुस्ती न करता सोडण्यात येते. याचा नाहक मनस्ताप प्रवाशांना सहन करावा लागतो. देखभाल दुरुस्ती न झाल्यामुळे या बस अनेक वेळा रस्त्यात बंद पडणे, वेगाने न पळणे यासंबंधी तक्रारीचे प्रमाण वाढले आहेत, तसेच एसी बंद पडत असल्याच्या तक्रारी येऊ लागल्या आहेत. त्याचा त्रास प्रवाशांना सहन करावा लागत आहे.
अशी आहे आकडेवारी :
- राज्यातील शिवशाही बसची संख्या : ७९२
- पुणे विभागातील शिवशाही बसची संख्या : ७५
मी बुधवारी सोलापूरवरून पुण्याला येत होतो. मोडनिंबच्या पुढे बस बंद पडली. शिवाय बसमधील एसीसुद्धा बंद होता. त्यामुळे प्रचंड मनस्ताप सहन करून प्रवास करावा लागला. त्यामुळे मार्गावर चांगल्या बस सोडण्यात याव्यात. - सागर कोळी, प्रवासी
पुण्यातून बस मार्गावर सोडताना तिची संपूर्ण देखभाल दुरुस्ती करूनच सोडण्यात येते. इतर आगारातील बस मार्गावर सोडताना तपासणी करूनच सोडण्यात यावी, अशा संबंधित आगारप्रमुखांना सूचना दिल्या आहेत. - सचिन शिंदे, विभागीय वाहतूक अधिकारी, पुणे