मनोरुग्णालय पाहणीसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट, पण आरोग्यमंत्र्यांनी फिरवली पाठ
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2026 16:23 IST2026-04-11T16:22:24+5:302026-04-11T16:23:18+5:30
- येरवडा मनोरुग्णालयातील नरकयातनांकडे सरकारचेही दुर्लक्ष - मानसिक आरोग्य विभागाच्या सहसंचालिका सुनीता गेहलोत यांची रात्री उशिरा आकस्मिक भेट

मनोरुग्णालय पाहणीसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट, पण आरोग्यमंत्र्यांनी फिरवली पाठ
लोहगाव : येरवडा येथील प्रादेशिक मनोरुग्णालयात रुग्णांचे अमानवीय हाल, कोट्यवधींचे घोटाळे आणि कर्मचारी वसाहतींमधील अवैध धंदे उघडकीस आले. स्थानिक आमदारांनी अवगत केले असतानाही राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी या रुग्णालयाला भेट देण्याचे टाळले. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. वरिष्ठ अधिकारी येतात, पाहणीत दोष काढतात, अधीक्षकांच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. मग कामातील पारदर्शकता दाखवण्यासाठी आरोग्यमंत्र्यांनी हाकेच्या अंतरावर येऊनही मनोरुग्णालयाला भेट का दिली नाही. मंत्र्यांच्या या भूमिकेमुळे ‘भ्रष्ट प्रशासनाला सरकारचा वरदहस्त आहे का?’ असा गंभीर आरोप होतो आहे.
मंत्र्यांनी पाठ फिरवण्यामागचे नेमके कारण काय?…
आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर हे पुण्याच्या दौऱ्यावर असताना मनोरुग्णालयापासून अगदी हाकेच्या अंतरावर होते. मात्र, त्यांनी रुग्णालयात जाऊन प्रत्यक्ष परिस्थिती पाहण्याचे किंवा माध्यमांशी बोलण्याचे टाळले. रुग्णांकडून सक्तीने साफसफाई करून घेणे, कष्टाची कामे करून घेणे आणि प्रत्येक वॉर्डात अस्वच्छता व उग्र वास असताना, मंत्र्यांनी केवळ ‘चौकशी करू’ असे त्रोटक आश्वासन देऊन काढता पाय घेतला. यामुळे अधीक्षक श्रीनिवास कोलोड आणि इतर दोषी अधिकारी, कर्मचाऱ्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप होत आहे.
सहसंचलिका सुनीता गहलोत यांचीही आकस्मिक भेट : या प्रकरणी ‘लोकमत’च्या वृत्ताची दखल घेत मानसिक आरोग्य विभागाच्या सहसंचालिका सुनीता गेहलोत यांनी तातडीने येरवडा मनोरुग्णालयाची गुरुवारी (दि. ९) रात्री उशिरा पाहणी केली. गेहलोत यांना पाहणीत येरवडा मनोरुग्णालयाचे अधीक्षक यांच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. रुग्ण असलेल्या वॉर्डात मोठ्या प्रमाणात डास घोंगावत होते. रुग्ण जमिनीवर पांघरूण नसताना झोपले होते. अस्वच्छता इतकी की वॅार्डामध्ये उग्र वास येत होता. जनावरांच्या खुराड्यापेक्षाही भीषण परिस्थिती पाहून गेहलोत संतापल्या. मनोरुग्णाप्रति संवेदना जागृत ठेवून काम करा, अशा सूचना अधीक्षक, वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिल्या. रुग्णालयातील सगळ्याच प्रकरणाची उपसंचालक यांच्यामार्फत चौकशी केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
प्रशासकीय मनमानीचा कळस…
ज्या घोटाळ्यामुळे मागील अधीक्षकांना पद सोडावे लागले, त्याच घोटाळ्याची पुनरावृत्ती प्रभारी अधीक्षकांच्या काळात कशी होते? निविदा प्रक्रियेत पारदर्शकता का नाही? असे अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत. एकीकडे सहसंचालिका कारवाईचा इशारा देत असताना, दुसरीकडे आरोग्यमंत्री भेट टाळून कोणाला पाठीशी घालत आहेत? असा संताप सामान्य जनतेतून व्यक्त होत आहे. ‘कुंपणच शेत खात असेल, तर न्याय कोणाकडे मागायचा?’ अशी संतप्त प्रतिक्रिया सध्या येरवडा परिसरात उमटत आहे.