ससून रुग्णालयावर कायदेशीर तपासण्यांचा वाढता भार; वर्षभरात ३० हजारांहून अधिक ‘एमएलसी’ प्रकरणे
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2026 19:25 IST2026-03-28T19:25:07+5:302026-03-28T19:25:17+5:30
‘ससून’ हे शहरातील एकमेव मोठे सरकारी रुग्णालय असल्याने कायदेशीर हस्तक्षेप असलेले बहुतेक रुग्ण ससूनमध्येच दाखल होतात.

ससून रुग्णालयावर कायदेशीर तपासण्यांचा वाढता भार; वर्षभरात ३० हजारांहून अधिक ‘एमएलसी’ प्रकरणे
पुणे : शहरातील प्रमुख सरकारी रुग्णालय असलेल्या ‘ससून’मध्ये वैद्यकीय उपचारांसोबत कायदेशीर तपासणीची गरज असलेल्या ‘मेडिको-लीगल केस’ (एमएलसी) रुग्णांचा ताण दिवसेंदिवस वाढत आहे. वर्षभरात पुणे शहर, जिल्ह्यासह, शेजारील जिल्ह्यांमधील ७० हजारांहून अधिक रुग्ण उपचारासाठी ससून रुग्णालयात होतात. दरवर्षी एकूण भरती होणाऱ्या रुग्णांपैकी जवळपास निम्मे, म्हणजे सरासरी ३० हजारांहून अधिक रुग्ण एमएलसी प्रकरणांचे असल्याचे चित्र आहे.
वेगवेगळी अपघात प्रकरणे, मारहाणीच्या घटनांमधील व्यक्ती, विषप्रयोग, आत्महत्येचा प्रयत्न, लैंगिक अत्याचार यांसारख्या घटनांमधील रुग्णांचा ‘एमएलसी’मध्ये समावेश होतो. अशा प्रत्येक प्रकरणात वैद्यकीय उपचारांसोबतच कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक असते. त्यामुळे डॉक्टर व कर्मचाऱ्यांवर उपचारांबरोबर पोलिसांना माहिती देणे, सविस्तर अहवाल तयार करणे, तसेच न्यायालयीन साक्ष देण्याची अतिरिक्त जबाबदारी येते.
‘ससून’ हे शहरातील एकमेव मोठे सरकारी रुग्णालय असल्याने कायदेशीर हस्तक्षेप असलेले बहुतेक रुग्ण ससूनमध्येच दाखल होतात. त्यामुळे येथील आपत्कालीन विभागात सतत गर्दी व गोंधळाचे वातवरण अनुभवावयास मिळते. महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये कायदेशीर तपासण्यांसाठी कोणतीच सुविधा नसल्याने अशा प्रकरणांचा अतिरिक्त भार ससून रुग्णालयावर पडत आहे.
वाढते रस्ते अपघात, कौटुंबिक व सामाजिक वाद, तसेच मानसिक ताणतणाव ही एमएलसी प्रकरणे वाढण्यामागील प्रमुख कारणे आहेत. विशेषतः रात्रीच्या वेळी अपघात व मारहाणीच्या घटनांमुळे आपत्कालीन विभागावर अधिक ताण निर्माण होत आहे.
बाह्यरुग्ण विभागात वर्षभरात सुमारे साडेचार लाख रुग्णांवर उपचार
वर्षभरात सुमारे साडेचार लाख रुग्ण बाह्यरुग्ण विभागात उपचार घेतात. दररोज सरासरी १,००० ते १,२०० रुग्णांवर उपचार केले जातात. यामध्ये साध्या आजारांपासून ते गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियांपर्यंत सर्वप्रकारच्या सेवांचा समावेश आहे. रुग्णालयात दररोज सरासरी ४५ ते ४७ मोठ्या शस्त्रक्रिया होतात, तर वर्षाला हा आकडा १७ हजारांपर्यंत पोहोचतो. किरकोळ शस्त्रक्रियांची संख्या दिवसाला सुमारे १५० असून वर्षाला ५० ते ५५ हजारांपर्यंत जाते.
वाढत्या एमएलसी प्रकरणांमुळे मनुष्यबळ व यंत्रणांवर अतिरिक्त ताण निर्माण होत आहे. प्रत्येक प्रकरणात अचूक व वेळेत कागदपत्रे पूर्ण करणे आवश्यक असल्याने आरोग्य यंत्रणेवर दडपण वाढत आहे. एमएलसी प्रकरणांचे प्रमाण कमी करण्यासाठी रस्ते सुरक्षा उपाय, मानसिक आरोग्याविषयी जनजागृती आवश्यक आहे. इतर शासकीय रुग्णालयांमध्येही एमएलसी तपासण्या झाल्यास ‘ससून’वरील ताण कमी होण्यात मदत होईल. - डॉ. यल्लपा जाधव, वैद्यकीय अधीक्षक, ससून रुग्णालय