- अविनाश हुंबरे
सांगवी : सांगवी (ता. बारामती) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. केंद्रात सध्या उपचार सुरळीत सुरू असून, सांगवी, शिरवली, कांबळेश्वर, सोमंथळी, खांडज, तसेच शेजारील गावांमधून दररोज सुमारे १५० रुग्ण प्राथमिक उपचारांसाठी येथे येत असतात. औषध व गोळ्यांचा साठाही पुरेसा उपलब्ध असून किरकोळ तपासण्या देखील येथे केल्या जातात. मात्र, मागील काही महिन्यांत गरोदर मातांच्या प्रसूतींच्या प्रमाणात मोठी घट झाल्याचे दिसून येत असून याकडे आशा स्वयंसेविका व वैद्यकीय अधिकारी दुर्लक्ष करत असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.
उपचारासाठी मुक्कामी राहणाऱ्या रुग्णांना गरम पाण्याने अंघोळ करता यावी, यासाठी सांगवी ग्रामपंचायतीने सोलर पॅनल उपलब्ध करून दिले आहे. मात्र, गेल्या सहा-सात महिन्यांपासून हे सोलर पॅनल सुरू न झाल्याने ते धूळखात पडून आहे. आरोग्य केंद्राच्या अनेक समस्या असतानाही संबंधित अधिकारी व लोकप्रतिनिधींकडून त्याकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, सध्या वाढत्या उन्हामुळे नागरिक सहसा बाहेर पडणे टाळत असल्याने आरोग्य केंद्राच्या परिसरात मोकाट जनावरे तसेच जवळच सुरू असलेल्या अवैध मटका व दारूच्या अड्ड्यांवरून येणाऱ्या काही व्यक्तींचा वावर वाढला आहे. काहीजण येथे निवारा घेत असल्याने परिसर अस्वच्छ होत आहे. आरोग्य केंद्राचा मोकळा परिसर जणू उघड्यावर शौचास जाण्याचे ठिकाणच बनल्याने वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही याचा त्रास सहन करावा लागत असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.
याशिवाय बारामती-फलटण रस्त्याच्या कामादरम्यान आरोग्य केंद्राची संरक्षक भिंत पाडण्यात आली होती. याबाबत आरोग्य विभागाने बांधकाम विभागाला कंपाऊंड उभारण्याचा प्रस्ताव दिला असला तरी आठ ते नऊ महिने उलटूनही भिंत उभारण्यात आलेली नाही. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांकडून याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे.
दरम्यान, यासंदर्भात बोलताना वैद्यकीय अधिकारी आकाश राठोड म्हणाले की, आरोग्य केंद्राच्या परिसरात काही लोकांकडून होणाऱ्या प्रकारांमुळे आम्ही वैतागलो आहोत. आरोग्य केंद्रासाठी कंपाउंड बांधण्याचा प्रस्ताव बांधकाम विभागाकडे पाठविला आहे. तसेच बडोदा बँकेच्या सीएसआर निधीतून वॉटर प्लांट देण्यात आला असून त्याचमधून सोलर पॅनलचे कनेक्शन करून लवकरच काम मार्गी लावण्यात येणार आहे. आरोग्य केंद्रात ओपीडी व्यवस्थित सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
Web Summary : Sangvi's primary health center faces neglect. Despite treating 150 daily, issues like a non-functional solar panel, missing compound wall, and loitering create unsanitary conditions. The medical officer cites ongoing efforts to address these problems, including a proposed compound wall.
Web Summary : सांगवी प्राथमिक स्वास्थ्य केंद्र उपेक्षा का शिकार है। प्रतिदिन 150 रोगियों के इलाज के बावजूद, निष्क्रिय सोलर पैनल, कंपाउंड की दीवार गायब, और आवारागर्दी जैसी समस्याएं अस्वच्छ स्थितियां पैदा करती हैं। चिकित्सा अधिकारी इन समस्याओं को दूर करने के प्रयासों का हवाला देते हैं, जिसमें एक प्रस्तावित कंपाउंड दीवार भी शामिल है।