सनातन संस्थेची पृथ्वीराज चव्हाण यांना १० कोटींची मानहानीची नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 20:07 IST2025-08-07T20:06:49+5:302025-08-07T20:07:42+5:30

- या नोटिसीमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांनी १५ दिवसांच्या आत लेखी माफी मागावी; मूळ मुलाखतीइतक्याच प्रसिद्धीने ती माफी प्रसिद्ध करावी, भविष्यात कोणतीही बदनामीकारक विधाने करू नयेत

pune news Sanatan Sanstha issues defamation notice of Rs 10 crore to Prithviraj Chavan | सनातन संस्थेची पृथ्वीराज चव्हाण यांना १० कोटींची मानहानीची नोटीस

सनातन संस्थेची पृथ्वीराज चव्हाण यांना १० कोटींची मानहानीची नोटीस

पुणे :  मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा निकाल लागल्यानंतर काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी निकालावर प्रतिक्रिया देताना ‘भगवा नव्हे, तर ‘सनातनी दहशतवाद’ म्हणा,’ अशा प्रकारचे हिंदुद्वेषी वक्तव्य केल्याप्रकरणी सनातन संस्थेचे विश्वस्त वीरेंद्र मराठे यांच्या वतीने चव्हाण यांना १० कोटी रुपयांची मानहानीची नोटीस पाठवण्यात आली आहे. तसेच पृथ्वीराज चव्हाण यांनी सनातन संस्थेची बिनशर्त माफी मागावी, अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जाण्याची तयारी ठेवावी, असा इशारा सनातन संस्थेचे प्रवक्ते अभय वर्तक यांनी दिला आहे.

या नोटिसीमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांनी १५ दिवसांच्या आत लेखी माफी मागावी; मूळ मुलाखतीइतक्याच प्रसिद्धीने ती माफी प्रसिद्ध करावी, भविष्यात कोणतीही बदनामीकारक विधाने करू नयेत आणि कायदेशीर खर्च म्हणून १० हजार रुपये द्यावेत, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. संस्थेचे मानद कायदेशीर सल्लागार तथा मुंबई उच्च न्यायालयाचे सरकारी वकील रामदास केसरकर यांनी नोटिसीत म्हटले आहे की, चव्हाण यांच्या वक्तव्यामुळे सनातन संस्थेची प्रतिमा मलीन झाली असून, हजारो साधकांच्या भावना दुखावल्या आहेत. ही नोटीस मिळूनही उत्तर न दिल्यास चव्हाण यांच्यावर फौजदारी आणि दिवाणी खटले दाखल करण्यात येणार आहेत.

अभय वर्तक म्हणाले, आज पृथ्वीराज चव्हाण सांगत आहेत की, ‘भगवा’ हा महाराष्ट्राच्या मराठी संस्कृतीचा, छत्रपती शिवरायांचा, संत ज्ञानेश्वरांपासून सर्व संत आणि वारकऱ्यांचा पवित्र आहे. त्यामुळे कोणीही ‘भगवा दहशतवाद’ असे म्हणू नये, असे काँग्रेसी नेत्यांना आवाहन करत आहेत; पण जेव्हा मालेगाव प्रकरण झाले, त्यावेळी काँग्रेस नेते पी. चिदंबरम, दिग्विजय सिंह, सुशीलकुमार शिंदे आदी नेत्यांनी यथेच्छ ‘भगवा दहशतवाद’ म्हणत हिंदूंना लक्ष्य केले. तेव्हा चव्हाण यांना ‘भगवा’ छत्रपतींचा आहे, संतांचा आहे, हे लक्षात आले नाही का? इतकी वर्षे ते झोपले होते का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

Web Title: pune news Sanatan Sanstha issues defamation notice of Rs 10 crore to Prithviraj Chavan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.