तळजाईवर पैलवान व भावी पोलिसांत राडा;पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या मुलींचा विनयभंगाचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 10:01 IST2025-07-16T09:59:56+5:302025-07-16T10:01:29+5:30
सहकारनगर पोलिस तक्रार घेत नसल्याचा आरोप करत पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या तरुण-तरुणींनी पोलिस आयुक्त कार्यालयासमोर ठिय्या मांडला.

तळजाईवर पैलवान व भावी पोलिसांत राडा;पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या मुलींचा विनयभंगाचा आरोप
पुणे : पैलवान आणि पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांमध्ये मंगळवारी सकाळी तळजाई मैदानावर चांगलाच राडा झाला. यावेळी पैलवानांनी भावी पोलिसांना शिवीगाळ करून मारहाण केल्याची व तरुणींचा विनयभंग केल्याचा आरोप केला जात आहे. या प्रकरणाचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला होता. दरम्यान, यासंदर्भात सहकारनगर पोलिस तक्रार घेत नसल्याचा आरोप करत पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या तरुण-तरुणींनी पोलिस आयुक्त कार्यालयासमोर ठिय्या मांडला. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
सहकारनगरमधील तळजाई मैदानावर दररोज सकाळी १५० ते १७० तरुण व तरुणी पोलिस भरतीची तयारी करतात. भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांच्या सांगण्यानुसार, मंगळवारी (दि. १५) सकाळी ते तळजाई मैदानावर सराव करत होते. त्यावेळी मैदानाच्या मध्यभागी चार पैलवान थांबले. त्यांना बाजूला होण्यास सांगितल्यानंतर शिवीगाळ व धक्काबुक्की केली. यावेळी पोलिस खात्यांतर्गत पीएसआय पदासाठी मैदानी परीक्षेचा सराव करण्यासाठी आलेले पोलीस अमलदार भांडण सोडवण्यासाठी आले. मात्र, पैलवानांनी त्यांनाही शिवीगाळ करीत मारहाण केली. त्यानंतर पैलवानांनी त्यांच्या इतर साथीदारांना बोलावून सराव करणाऱ्या तरुणांना मारहाण केली. यावेळी काही पैलवानांनी तरुणींचा विनयभंग करीत छेडछाड केल्याचा आरोप या तरुणांनी केला.
दरम्यान, सकाळी आठच्या सुमारास मारहाण होऊनही सहकारनगर पोलिस पैलवानांच्या विरोधात तक्रार घेत नाहीत, असा आरोप करत सायंकाळी चारच्या सुमारास पोलिस आयुक्त कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी तरुणांशी चर्चा करून सहकारनगर पोलिस ठाण्याशी संपर्क साधून योग्य कार्यवाही करण्याच्या सूचना केल्या. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत सहकारनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.