पुण्यात करन्सी एक्सचेंजमध्ये जबरी चोरी; परदेशी चलन डॉलर, थाई बाथ, दिरामसह लाखोंचा ऐवज लंपास
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2025 09:49 IST2025-07-02T09:48:25+5:302025-07-02T09:49:51+5:30
चोरट्याने दुकानाचे लोखंडी शटर तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर दुकानातील लॉकर उचकटून त्यामधील २,५७,४२० रुपये रोख आणि अंदाजे २० ते २२ लाख रुपये किमतीचे डॉलर, थाई बाथ आणि दिराम असे विविध देशांचे चलन चोरून नेले.

पुण्यात करन्सी एक्सचेंजमध्ये जबरी चोरी; परदेशी चलन डॉलर, थाई बाथ, दिरामसह लाखोंचा ऐवज लंपास
पुणे - शहरात पुन्हा एकदा मोठ्या चोरीच्या घटनेने खळबळ उडवली आहे. बालेवाडी येथील Sunrise 4 U Forex Pvt. Ltd. या करन्सी एक्सचेंजच्या दुकानात अनोळखी चोरट्याने मध्यरात्री दुकानाचे शटर तोडून प्रवेश करत सुमारे २५ लाख रुपयांचा ऐवज लंपास केला आहे.
ही घटना आज २ जुलै रोजी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास घडली. चोरट्याने दुकानाचे लोखंडी शटर तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर दुकानातील लॉकर उचकटून त्यामधील २,५७,४२० रुपये रोख आणि अंदाजे २० ते २२ लाख रुपये किमतीचे डॉलर, थाई बाथ आणि दिराम असे विविध देशांचे चलन चोरून नेले. याप्रकरणी रोहित दिलीप मालुसरे (वय ४०, रा. सोमवार पेठ, पुणे, व्यवसाय करन्सी एक्सचेंज ऑपरेटर) यांनी तक्रार दिली आहे. ते kundan Espacio, यशोदा चौक, बालेवाडी येथील या एक्सचेंज सेंटरचे मालक आहेत.
दरम्यान घटनेची माहिती मिळताच बाणेर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. दुकान परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून चोरट्याच्या शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या घटनेने बालेवाडी परिसरात दहशत निर्माण झाली असून व्यावसायिकांमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने चिंता व्यक्त केली जात आहे.