वाहतूक कोंडी होणारे रस्ते आयुक्तांच्या रडारवर; प्रत्यक्ष पाहणी करून अहवाल सादर करण्याचे आयुक्तांचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2025 21:14 IST2025-09-19T21:13:52+5:302025-09-19T21:14:14+5:30
सध्या पावसाचे दिवस असल्याने शहरातील अनेक रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. रस्त्यांवर जागोजागी पावसाचे पाणी साचते.

वाहतूक कोंडी होणारे रस्ते आयुक्तांच्या रडारवर; प्रत्यक्ष पाहणी करून अहवाल सादर करण्याचे आयुक्तांचे आदेश
पुणे : शहरातील रस्त्यांवरील अनधिकृत पार्किंग आणि त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी यासंदर्भात ‘लोकमत’ने वृत्तमालिका प्रसिद्ध केल्यानंतर प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. याचाच एक भाग म्हणून महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी शहरातील प्रमुख ३२ रस्त्यांसह वाहतूक कोंडी होणाऱ्या ठिकाणांची प्रत्यक्ष पाहणी करून, कोंडी का होते? याचा अहवाल मंगळवारी, दि. २३ सप्टेंबरपर्यंत सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
सध्या पावसाचे दिवस असल्याने शहरातील अनेक रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. रस्त्यांवर जागोजागी पावसाचे पाणी साचते. त्यातच शहराच्या दुतर्फा अनधिकृतपणे चारचाकी व दुचाकींची पार्किंग होते. यामुळे वाहतुकीचा वेग मंदावून शहरात वाहतूक कोंडी होते. या कोंडीमुळे १० किलोमीटर अंतर जाण्यासाठी अर्धा-पाऊण तास वेळ लागतो. वाहतूक कोंडीत पुण्याचा जगात पहिल्या १० शहरांमध्ये क्रमांक लागतो. यामुळे अनेक कंपन्या पुण्याबाहेर जात आहेत.
शहरातील रस्त्यांची दुरवस्था, रस्त्यांवर होणारी अनधिकृत पार्किंग यासंदर्भात ‘लोकमत’ गेण्या आठ दिवसांपासून वृत्त मालिकेच्या माध्यमातून सातत्याने प्रकाश टाकत आहे. या वृत्त मालिकेची दखल घेऊन महापालिका प्रशासनाकडून अनधिकृत पार्किंगवर नियंत्रण आणण्यासाठी शहरातील सहा रस्त्यांवर पे अँड पार्किंग करण्यासह जंगली महाराज रस्त्यावरील बहुमजली मेकॅनिकल पार्किंग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
याच अनुषंगाने महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी गुरुवारी महापालिकेत शहरातील वाहतुकीसंदर्भात पथ विभागासह विविध विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत आयुक्तांनी वाहतूक कोंडी व रस्त्याच्या स्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी शहरातील प्रमुख ३२ रस्ते आणि वाहतूक कोंडी होणाऱ्या २२ ठिकाणांची प्रत्यक्ष पाहणी करून त्याचा अहवाल मंगळवारपर्यंत सादर करण्याचे आदेश दिले. तसेच वाहतूक कोंडीची कारणे शोधण्याच्याही सूचना केल्या आहेत. यावेळी पथ विभाग, बांधकाम विभाग, क्षेत्रीय कार्यालय, परिमंडळ कार्यालय, अतिक्रमण विभाग, विद्युत विभाग, आकाशचिन्ह या विभागांमधील अधिकारी व अभियंते उपस्थित होते.
वाहतूक कोंडीची प्रथमदर्शनी दिसणारी कारणे ...
शहरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. हे खड्डे योग पद्धतीने दुरुस्त होत नसल्याने वाहतुकीचा वेग मंदावतो. याशिवाय शहरातील अनेक रस्त्यांवर व पदपथांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत. या अतिक्रमणांमध्ये हातगाडी, पथारी व्यावसायिक, स्टॉल, अनधिकृत बांधकाम आदींचा समावेश आहे. या अतिक्रमणांवर महापालिकेकडून कारवाई केली जाते. मात्र, पुन्हा सर्व परिस्थिती जैसे थे होते.
शहराच्या काही भागांची पाहणी केल्यानंतर प्रशासकीय यंत्रणेच्या दुर्लक्षामुळे अनेक ठिकाणी वाहतूकीची समस्या निर्माण झाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणा कार्यान्वित केल्यानंतर बऱ्यापैकी समस्या दूर होऊ शकतात. त्यामुळे वाहतूक कोंडी होण्याच्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन कोंडी का होते, याची कारणमिमांसा फोटोसह सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत. - नवल किशोर राम, महापालिका आयुक्त