कोरेगाव भीमा येथील बंधाऱ्याची दुरुस्ती दीड महिन्यानंतरही रखडली; शेतकऱ्यांमध्ये नाराजी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2025 13:42 IST2025-08-13T13:42:33+5:302025-08-13T13:42:51+5:30
१९८७ साली बांधलेल्या या बंधाऱ्याचा भराव वाहून गेल्याने कोरेगाव भीमा, पेरणे, बकोरी, वाघोली आणि लोणीकंद परिसरातील शेती आणि पाणी योजनांवर मोठा परिणाम झाला

कोरेगाव भीमा येथील बंधाऱ्याची दुरुस्ती दीड महिन्यानंतरही रखडली; शेतकऱ्यांमध्ये नाराजी
कोरेगाव भीमा : कोरेगाव भीमा आणि पेरणे येथील कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्याचा भराव २० जून २०२५ रोजी पावसाळ्यातील वाढत्या पाण्याच्या प्रवाहामुळे वाहून गेला. दीड महिना उलटूनही बंधाऱ्याच्या दुरुस्तीचे काम सुरू झालेले नाही. यामुळे ऐन पावसाळ्यात नदी कोरडी पडली असून, हजारो हेक्टर शेतीच्या पिकांचे नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांना सतावत आहे. पाटबंधारे विभागाच्या उदासीनतेमुळे आणि लोकप्रतिनिधींच्या निष्क्रियतेमुळे शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
१९८७ साली बांधलेल्या या बंधाऱ्याचा भराव वाहून गेल्याने कोरेगाव भीमा, पेरणे, बकोरी, वाघोली आणि लोणीकंद परिसरातील शेती आणि पाणी योजनांवर मोठा परिणाम झाला आहे. कोरेगाव भीमा आणि पेरणे ग्रामपंचायतींनी नवीन बंधारा बांधण्याची मागणी केली असून, याबाबत पत्रव्यवहार आणि २६ मे रोजी दूरध्वनीवरून पाठपुरावा केला. मात्र, पाटबंधारे विभागाने याकडे दुर्लक्ष केले. यापूर्वी केलेली निकृष्ट दर्जाची दुरुस्तीही अतिवृष्टीत वाहून गेली. स्थानिकांनी दुरुस्तीच्या दर्जाबाबत तक्रार केली होती, परंतु अधिकाऱ्यांनी त्याकडे कानाडोळा केला.
नवीन बंधाऱ्याचा प्रस्ताव बारगळला
२१ जून रोजी उपअभियंता अश्विन पवार यांनी बंधाऱ्याची पाहणी करून नवीन बंधारा बांधण्याचा प्रस्ताव शासनाला पाठविण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, हा प्रस्ताव बारगळला असून, केवळ १९८७ च्या जुन्या बंधाऱ्याची दुरुस्ती करण्याचे ठरले आहे. यामुळे शेतकऱ्यांचा हिरमोड झाला आहे.
पाणी योजनांवर संकट
बंधाऱ्याचा भराव वाहून गेल्याने कोरेगाव भीमा, पेरणे, बकोरी, वाघोली येथील पाणी योजना, तसेच लोणीकंद पावर हाऊस आणि जेएसपीएम कॉलेजच्या पाणी योजनांवर परिणाम झाला आहे. सुमारे ४०० हून अधिक शेतकऱ्यांच्या पाणी योजनांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. ऐन पावसाळ्यात नदी कोरडी पडल्याने शेतीसाठी पाणी उचलणाऱ्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.
लोकप्रतिनिधींचेही दुर्लक्ष
पावसाळ्यात नदी कोरडी पडल्याने शेतकऱ्यांसमोर पिके जगविण्याचे संकट उभे आहे. पाटबंधारे विभाग हातावर हात ठेवून बसला असून, लोकप्रतिनिधीही या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. दुरुस्तीच्या प्रतीक्षेत असलेला बंधारा आणि कोरडे पडलेले नदीपात्र, यामुळे परिसरातील शेती आणि पाणी योजनांचे भवितव्य धोक्यात आले आहे.