तीस हजारांची लाच घेताना रावेतला दोन पोलिसांवर गुन्हा;महिलेचा समावेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2025 14:06 IST2025-07-19T14:06:08+5:302025-07-19T14:06:25+5:30
- संशयितास अटक न करण्यासाठी तक्रारदाराकडे ५० हजारांची मागणी

तीस हजारांची लाच घेताना रावेतला दोन पोलिसांवर गुन्हा;महिलेचा समावेश
पिंपरी : गुन्ह्यातील संशयितास अटक न करण्यासाठी तीस हजार रुपयांची लाच मागणाऱ्या रावेत पोलिस ठाण्यातील दोघांना शुक्रवारी (दि १८ जुलै) रंगेहात पकडले आहे. हवालदार राजश्री रवी घोडे, सहायक पोलिस फौजदार राकेश शांताराम पालांडे यांना ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक सतीश वाळके यांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार व्यवसायाने वकील आहेत. त्यांच्या अशिलावर रावेत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. प्रकरणाचा तपास हवालदार राजश्री घोडे हिच्याकडे आहे. संबंधित गुन्ह्यात संशयिताला अटक न करण्यासाठी, त्याच्याविरुद्ध दाखल होणाऱ्या दोषारोपपत्रात संशयितास फायदा होईल, अशा त्रुटी ठेवून दोषारोपपत्र पाठवण्यासाठी घोडे यांनी तक्रारदाराकडे ५० हजार रुपयांची मागणी केली. त्यानंतर तक्रारदाराने याबाबतची माहिती गुरुवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागास दिली.
पथकाने तक्रारीनुसार पंचासमक्ष लाचेच्या मागणीची पडताळणी केली. घोडे हिने मदत करण्यासाठी सुरुवातीस ५० हजार लाचेची मागणी केली. तडजोडीअंती ३० हजार रुपये देण्याचे ठरले, तसेच सहायक पोलिस फौजदार पालांडे याने घोडे हिच्या लाच मागणीस प्रोत्साहन दिल्याचे निष्पन्न झाले. लाच मागणीची पडताळणीची केल्यानंतर शुक्रवारी सापळा रचण्यात आला. रावेत पोलिस ठाण्यातच तक्रारदाराकडून ३० हजारांची लाच घेताना पंचासमक्ष रंगेहात पकडण्यात आले. त्यानंतर पालांडे याला घरातून ताब्यात घेण्यात आले. दोघांविरुद्ध रावेत पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.