राजगुरुनगर सहकारी बँकेच्या वार्षिक सभेला गालबोट; नेमकं काय घडलं ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2025 18:09 IST2025-09-07T18:09:19+5:302025-09-07T18:09:32+5:30
या सभेत एक सभासद तरुण मद्यप्राशन करून आला होता. मंदधुंद अवस्थेत हा तरुण संचालकांना प्रश्न विचारत होता.

राजगुरुनगर सहकारी बँकेच्या वार्षिक सभेला गालबोट; नेमकं काय घडलं ?
राजगुरूनगर : पुणे जिल्ह्यात सहकार क्षेत्रातील अग्रणी असलेल्या राजगुरुनगर सहकारी बँकेची ९४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार (दि. ७) रोजी पार पडली. यावेळी सर्वात पहिले प्रश्न विचारण्यावरून दोन सभासदांमध्ये शिवीगाळ व हाणामारी झाल्याने वार्षिक सभेला पहिल्यांदाच गालबोट लागले.
अधिकच्या माहितीनुसार, राजगुरुनगर सहकारी बँकेची वार्षिक सभा चंद्रमा गार्डन येथे पार पडली. या सभेत एक सभासद तरुण मद्यप्राशन करून आला होता. मंदधुंद अवस्थेत हा तरुण संचालकांना प्रश्न विचारत होता. संचालक मंडळही समर्पक उत्तरे देत होते. मात्र पुन्हा पुन्हा तोच प्रश्न विचारण्यासाठी हातात माईक घेण्यावरून दोन सभासदांमध्ये बाचाबाची होऊन शिवीगाळ व हाणामारी झाली. माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल बाबा राक्षे, हिरामण सातकर, रेवणनाथ थिगळे व सभासदांनी या व्यक्तीला सभागृहाबाहेर काढले.
दरम्यान, अध्यक्षीय भाषणात सागर पाटोळे म्हणाले, “राजगुरुनगर सहकारी बँकेने त्यांच्या ग्राहकांसाठी इंटरनेट बँकिंग सुविधा सुरू केल्या आहेत. सर्वसामान्य नागरिकांची बँक म्हणून बँकेची ओळख सर्वत्र आहे. ग्राहक-सभासद यांच्या हिताचे निर्णय घेऊन आणि आरबीआयचे निर्बंध यांचे काटेकोर पालन केल्याने सहकार क्षेत्रात भरारी घेऊन अनेक पुरस्कार बँकेने मिळवले आहेत.”
या सभेला बँकेचे अध्यक्ष सागर पाटोळे यांच्यासह उपाध्यक्ष अश्विनी पाचारणे, ज्येष्ठ संचालक किरण आहेर, विजया शिंदे, राजेंद्र सांडभोर, राजेंद्र वाळुंज, गणेश थिगळे, अरुण थिगळे, दिनेश ओसवाल, अॅड. राहुल तांबे, विनायक घुमटकर, विजय डोळस, अविनाश कहाणे, रामदास धनवटे, दत्तात्रय भेगडे, समीर आहेर, सचिन मांजरे, तज्ञ संचालक अॅड. धर्मेंद्र खांडरे, गौतम कोतवाल, सुरेश कौदरे, प्रकाश डोळस, विकास बाणखेले, दीपक वारुळे, महेश शेवकरी, मुख्य कार्यकारी अधिकारी शांताराम वाकचौरे, वरिष्ठ अधिकारी संजय ससाणे, अमृत टाकळकर, सम्राट सुपेकर, अंकुश कोहिणकर, दिलीप मलघे, बाळासाहेब घोलप, मंजित महिंद्रकर यांच्यासह मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते.
यावेळी बँकेचे माजी अध्यक्ष दिनेश ओसवाल ह्यांची पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशन वर संचालक पदी निवड झाल्याबद्दल तसेच २०२४- २५ ह्या आर्थिक वर्षात महाराष्ट्र अर्बन को ऑपरेटिव बँक्स फेडरेशन चा द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार मिळवून दिल्याबद्दल बँकेचे सभासद बाबा राक्षे,हिरामण सातकर ह्यांनी विशेष सत्कार वार्षिक सर्वसाधारण सभेत केला.
सभासदांच्या वतीने शांताराम घुमटकर, हिरामण सातकर, बाबा राक्षे, अॅड. महादेव घुले, अशोक दुगड, प्रकाश पाचारणे, रेवण थिगळे, शरद मुऱ्हे, कालिदास सातकर, सुरेश टाकळकर, विलास मांजरे, शिवाजी वर्पे, अॅड. वैभव कर्वे, सुधीर वाळुंज, अनिल वरकड आदींनी प्रश्न विचारले. त्यांच्या प्रश्नांना बँकेचे अध्यक्ष सागर पाटोळे, संचालक किरण आहेर, दिनेश ओसवाल आणि बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शांताराम वाकचौरे यांनी उत्तरे देऊन निरसन केले. ९४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेपुढे ठेवण्यात आलेले सर्व विषय सर्वानुमते मंजूर करण्यात आले. मुख्य कार्यकारी अधिकारी शांताराम वाकचौरे यांनी बँकेच्या अहवालाचे वाचन केले. आभार बँकेचे उपाध्यक्ष अश्विनी पाचारणे यांनी मानले.