पुणे : महापालिकेने सह्याद्री रुग्णालयाला धर्मादाय रुग्णालय सुरु करण्यासाठी डेक्कन जिमखाना परिसरातील मोक्याची दिली, मात्र सह्याद्रीने गरिबांसाठी धर्मादाय रुग्णालय सुरु करण्याऐवजी व्यावसायिक खासगी रुग्णालय सुरु केले विशेष म्हणजे महापालिकेने यावर काहीच कारवाई केली नाही. इतकेच नव्हे तर आता ती जागा तिसऱ्याच व्यवस्थापनाला रुग्णालय चालविण्यासाठी दिली आहे त्याबद्दल महापालिकेला काहीच पत्ता नाही.डेक्कन जिमखाना परिसरातील पुणे महापालिकेच्या अत्यंत मोक्याच्या जमिनीवर उभारण्यात आलेल्या सह्याद्री हॉस्पिटलच्या विक्री व्यवहाराविरुद्ध सध्या गंभीर वादंग उठले आहे. महापालिकेने ही जमीन १९९८ मध्ये कोकण मित्र मंडळ मेडिकल ट्रस्ट या संस्थेला केवळ चॅरिटेबल रुग्णालय उभारण्यासाठी दिली होती. मात्र सध्याची परिस्थिती पाहता ही जमीन एका खासगी व्यावसायिक साखळी रुग्णालय चालवण्यासाठी वापरली जात असल्याचे समोर आले आहे.
कोकण मित्र मंडळ मेडिकल ट्रस्टला सेवाभावी आरोग्य उपचारासाठी भाडेकराराने दिलेल्या जमिनीचा आजवर व्यावसायिक वापर सुरू असतानाही महापालिका प्रशासन डोळे मिटून बसले होते. ट्रस्टने सुरूवातीस सह्याद्री रूग्णालय व नंतर एव्हरस्टोन कॅपिटल या खासगी गुंतवणूकदार कंपनीशी व्यावसायिक करार केला तेव्हाच तत्कालीन महापालिका अधिकाऱ्यांच्या ते निदर्शनास का आले नाही? की, दुर्लक्षित केले? यासाठी प्रशासन अधिकारी व राजकीय प्रतिनिधी यांच्यातील संगनमत की, प्रशासनावर राजकीय दबाव होता ? असे अनेक सवाल उपस्थित होत आहे. सह्याद्री हॉस्पिटल विक्री व्यवहार प्रकरणी निर्माण झालेल्या वादंगामुळे कोकण मित्र मंडळ ट्रस्टचे एक प्रमुख विश्वस्त असलेले डॉ. चारुदत्त आपटे व त्यांचे कुटुंब केंद्रस्थानी आले आहे.चॅरिटेबल रुग्णालय उभारण्यासाठी भाडेकरार करताना महापालिकेने घातलेल्या अटी-शर्तींचे ट्रस्टींकडून पालन होत नसता सुमारे २५ वर्षे महापालिका प्रशासनाने कायदेशीर नोटीस सोडा, साधी विचारणाही केली नाही, ही बाब गंभीर आहे. महापालिकेच्या जागेचे ‘चॅरिटेबल ट्रस्ट’ कडून ‘सह्याद्री रूग्णालय’ नंतर ‘एव्हरस्टोन कॅपिटल कंपनी’, ‘ओंटारियो टीचर्स पेन्शन प्लॅन बोर्ड’ व आता ‘मणिपाल ग्रुप’कडे व्यावसायिक हक्क हस्तांतर होताना महापालिका प्रशासन कुठे होते ? आता विक्री व्यवहार विरोधात तक्रार आल्यानंतर महापालिका प्रशासनाला कोकण मित्र मंडळ मेडिकल ट्रस्टला नोटीस पाठविण्याची उपरती झाली. याबाबत कोकण मित्र मंडळ मेडिकल ट्रस्टने महापालिकेच्या सहायक आरोग्य अधिकाऱ्यांकडे पत्राद्वारे खुलासा केला आहे. मात्र हा खुलासा उपस्थित होणारे प्रश्न, जागा कराराने देतानाच्या अटी-शर्ती यांच्याशी कुठेच सुसंगत नाही. या संपूर्ण प्रकरणात सार्वजनिक हितासाठी दिलेली जमीन खासगी कंपन्यांच्या हाती गेली असून त्यातून कोट्यवधींचा नफा कमावला जात आहे. हा प्रश्न केवळ एका हॉस्पिटलपुरते मर्यादित नाही, तर हा सार्वजनिक मालमत्तेचा वापर, पारदर्शकता, आणि जबाबदारीचा प्रश्न आहे. कोकण मित्र मंडळ मेडिकल ट्रस्टकडून करण्यात आलेला खुलासा
ट्रस्टने खुलासा पत्रात नमूद केल्यानुसार, महापालिकेने २७ फेब्रुवारी १९९८ रोजी कोकण मित्र मंडळ मेडिकल ट्रस्टला जमीन भाडेपट्टा कराराद्वारे दिली. जमिनीची किंवा त्यावरील रुग्णालय इमारतीची मालकी कधीही ट्रस्टने एव्हरस्टोन कॅपिटल किंवा ऑटारियों टीचर्स यांना अगर अन्य कोणत्याही व्यक्ती अथवा संस्थांना हस्तांतरित केलेली नाही. ही जमीन आजही महापालिकेच्या मालकीची आहे. या जमिनीवर बांधलेल्या रुग्णालयास २००४ मध्ये दिलेला नर्सिंग होम परवाना अजूनही ट्रस्टच्या नावावर आहे. रुग्णालय प्रमुखाच्या नावात व खाटांच्या संख्येत वेळोवेळी झालेले बदल महापालिकेच्या कार्यालयाच्या परवानगीने करण्यात आले आहेत. याबाबतचा परवान्याची माहिती महापालिकेला सादर करण्यात आली आहे. ही मिळकत ट्रस्टने मणिपाल हॉस्पिटल समूह अगर अन्य कोणत्याही व्यक्ती अथवा संस्थेस हस्तांतरित केलेली नाही. असे नमूद केले आहे. आता ट्रस्टच्या खुलाशानंतर महापालिका प्रशासनाला रुग्णालय प्रमुखाच्या नावात व खाटांच्या संख्येत वेळोवेळी झालेल्या बदलांची माहिती होती का ? या बदलांसाठी प्रशासनाने वेळोवेळी परवानग्या दिल्या होत्या का?, आणि त्यासाठी कोणाची शिफारस अथवा दबाव होता का ? असे प्रश्न नव्याने निर्माण झाले आहेत.
सह्याद्री हॉस्पिटल व्यवहारप्रकरणी महापालिकेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्हकोकण मित्रमंडळ ट्रस्टने नर्सिंग होम परवान्यानुसार रुग्णालय प्रमुखाच्या नावात व खाटांच्या संख्येत झालेले बदल महापालिकेच्या परवानगीने केल्याचे म्हटले आहे. करारानुसार रुग्णालयामध्ये गरजू रुग्णांवर उपचार केल्याचेही पत्रात नमूद केले आहे, त्याची पडताळणी करण्यात येईल. जागेचा भाडे करार व इतर गोष्टी भूमी व जिंदगी विभागाशी संबंधित आहेत. - डॉ. नीना बोराडे, आरोग्यप्रमुख, पुणे महापालिका