पुणेकरांसाठी खुशखबर..! उद्यापासून गर्दीच्या वेळी दर ६ मिनिटांनी धावणार मेट्रो; जाणून घ्या वेळापत्रक
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2025 09:57 IST2025-08-14T09:57:21+5:302025-08-14T09:57:31+5:30
उद्यापासून एकूण फेऱ्या ५५४ होणार आहेत. अधिकच्या ६४ फेऱ्यांमुळे प्रवाशांना गर्दीचा सामना करावा लागणार

पुणेकरांसाठी खुशखबर..! उद्यापासून गर्दीच्या वेळी दर ६ मिनिटांनी धावणार मेट्रो; जाणून घ्या वेळापत्रक
पुणे : सध्या गर्दीच्या वेळेत (सकाळी ९ ते ११ आणि दुपारी ४ ते ८) या वेळी दर ७ मिनिटाला मेट्रो अशी सेवा पुणे मेट्रोतर्फे पुरविण्यात येत आहे. आता (दि. १५) ऑगस्टपासून पुणे मेट्रो गर्दीच्या वेळेस दर ६ मिनिटाला सेवा पुरविण्यात येणार आहे. विनागर्दीच्या वेळी मात्र दर १० मिनिटाला एक मेट्रो असणार आहे.
सध्या पुणे मेट्रोच्या दोन्ही मार्गिका मिळून ४९० फेऱ्यांद्वारे मेट्रो सेवा पुरवत आहे. दर ६ मिनिटाला मेट्रो सेवेमुळे अधिक ६४ फेऱ्या वाढणार आहे. त्यामुळे उद्यापासून एकूण फेऱ्या ५५४ होणार आहेत. अधिकच्या ६४ फेऱ्यांमुळे प्रवाशांना गर्दीचा सामना करावा लागणार नाही. दर ६ मिनिटाला मेट्रो चालवण्यास मेट्रो दोन महिन्यापासून प्रयत्नशिल होती. त्या अनुषंगाने अनेकवेळा चाचण्या घेण्यात आल्या.
सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. जुलै, २०२५ या महिन्यामध्ये मेट्रोला चांगला प्रतिसाद मिळाला असून, दैनंदिन प्रवासी संख्या १,९२,००० पर्यंत वाढली. ऑगस्ट, २०२५ मध्ये प्रवासी संख्येत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. ऑगस्टमध्ये प्रवाशांची सरासरी संख्या २ लाख १३ हजार ६२० इतकी आहे.
पुणे मेट्रोच्या प्रवासी संख्येत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे पुणे मेट्रोने दैनंदिन मेट्रोच्या फेऱ्यांमध्ये वाढ केली आहे. आता दर सहा मिनिटाला मेट्रो सेवा पुरवण्याचा निर्णय मेट्रो प्रशासनाने घेतला आहे. - श्रावण हर्डीकर, व्यवस्थापकीय संचालक, महामेट्रो