भटक्या कुत्र्यांचा राजगुरुनगरात उच्छाद; नागरिकांना चावा, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2025 19:16 IST2025-08-24T19:15:34+5:302025-08-24T19:16:22+5:30

दोन दिवसांपूर्वी मध्यवस्तीतील बाजार परिसरात वकील स्वप्नील जाधव यांच्यावर भटक्या कुत्र्याने हल्ला केला. ते दुचाकीवरून जात असताना कुत्र्याने त्यांच्या डाव्या पायाच्या पंजाला चावा घेतला

pune news ptray dogs rampage in Rajgurunagar; Citizens bite, safety of school children is a serious issue | भटक्या कुत्र्यांचा राजगुरुनगरात उच्छाद; नागरिकांना चावा, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर

भटक्या कुत्र्यांचा राजगुरुनगरात उच्छाद; नागरिकांना चावा, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर

राजगुरुनगर : खेड तालुक्याचे ठिकाण असलेल्या राजगुरुनगर शहरात भटक्या कुत्र्यांच्या टोळ्यांनी उच्छाद मांडला आहे. गेल्या दोन दिवसांत पिसाळलेल्या कुत्र्यांनी अनेक नागरिकांना चावल्याच्या घटना घडल्या असून, यामुळे विशेषतः शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मागील महिन्याभरात तब्बल २५० नागरिकांना कुत्र्यांनी चावल्याची नोंद आहे, तर एप्रिल २०२५ पासून आतापर्यंत तालुक्यातील एक हजाराहून अधिक जणांना कुत्र्यांच्या हल्ल्याचा सामना करावा लागला आहे.

मध्यवस्तीत कुत्र्याचा हल्ला, वकील जखमी -

दोन दिवसांपूर्वी मध्यवस्तीतील बाजार परिसरात वकील स्वप्नील जाधव यांच्यावर भटक्या कुत्र्याने हल्ला केला. ते दुचाकीवरून जात असताना कुत्र्याने त्यांच्या डाव्या पायाच्या पंजाला चावा घेतला, ज्यामुळे लचका तुटला आणि दहा टाके घालण्याची वेळ आली. त्यांना रेबीज प्रतिबंधक लस आणि पुढील उपचारासाठी पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात (वायसीएम) पाठवण्यात आले. अशा घटनांमुळे शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

भटक्या कुत्र्यांचा त्रास वाढला -

राजगुरुनगर हे खेड, आंबेगाव आणि जुन्नर तालुक्यांचे शासकीय आणि न्यायालयीन कामकाजाचे केंद्र आहे. यामुळे येथे दररोज मोठ्या संख्येने नागरिकांची वर्दळ असते. मात्र, रस्त्यावर टोळ्यांनी फिरणारी भटकी कुत्री नागरिकांसाठी डोकेदुखी ठरली आहेत. ही कुत्री रस्त्यावर ठाण मांडून बसतात, जोरजोरात भुंकतात, रस्ता ओलांडताना अचानक आडवी येतात किंवा दुचाकीस्वारांच्या मागे धावतात. यामुळे अनेकदा दुचाकीस्वार पडून जखमी झाले आहेत. काही अपघातांमध्ये नागरिक गंभीर जायबंदी झाल्याच्याही घटना घडल्या आहेत.

कचऱ्यामुळे कुत्र्यांचा उपद्रव वाढला -

शहरात मोठ्या प्रमाणात शिळे अन्न आणि कचरा रस्त्यावर टाकला जातो, ज्यामुळे भटक्या कुत्र्यांच्या टोळ्या मध्यवस्ती आणि आसपासच्या परिसरात घुटमळताना दिसतात. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी खेड नगर परिषदेने अनेकदा ठेकेदारांमार्फत कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याचा प्रयत्न केला; परंतु ठेकेदारांनी याला प्रतिसाद दिला नाही. परिणामी, नगर परिषदेची यंत्रणा हतबल झाल्याचे चित्र आहे. गणेशोत्सवाच्या आगमनापूर्वी ही समस्या नियंत्रणात न आल्यास मोठा उद्रेक होण्याची शक्यता आहे.

वैद्यकीय सुविधांचा अभाव -

चांडोली ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षिका डॉ. तेजश्री रानडे यांनी सांगितले, की गेल्या दोन दिवसांत २०-२५ विद्यार्थी, महिला आणि नागरिक कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झाले आहेत. ग्रामीण रुग्णालयात रेबीज प्रतिबंधक लस उपलब्ध असली, तरी गंभीर जखमांसाठी आवश्यक असलेली इम्युनोग्लोब्युलिन लस उपलब्ध नाही. अशा परिस्थितीत जखमींना वायसीएम रुग्णालयात पाठवण्याशिवाय पर्याय नाही. यामुळे नागरिकांना उपचारासाठी दूरचा प्रवास करावा लागत आहे.

नागरिकांची मागणी -

नागरिकांनी नगर परिषदेकडे भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त तातडीने करण्याची मागणी केली आहे. याबाबत नगर परिषद मात्र सोयीस्करपणे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत आहे. शाळकरी मुले, महिला आणि वृद्धांना या समस्येचा सर्वाधिक फटका बसत आहे. गणेशोत्सव जवळ येत असताना ही समस्या त्वरित सोडवण्याची गरज आहे, अन्यथा मोठ्या प्रमाणात नागरिकांना त्रास सहन करावा लागेल.

Web Title: pune news ptray dogs rampage in Rajgurunagar; Citizens bite, safety of school children is a serious issue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.