बिबट्यांच्या नसबंदीचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे; ‘वनतारा’मध्येही ५० पाठवले जाणार; अजित पवारांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2025 19:59 IST2025-10-15T19:57:54+5:302025-10-15T19:59:26+5:30
- उपमुख्यमंत्री पालकमंत्री अजित पवार यांनी दिली. तसेच गुजरात राज्यातील वनतारा प्रकल्पांतर्गत सुमारे पन्नास बिबटे पाठविण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.

बिबट्यांच्या नसबंदीचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे; ‘वनतारा’मध्येही ५० पाठवले जाणार; अजित पवारांची माहिती
पुणे : जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, शिरूर आणि खेड तालुक्यांतील बिबट्यांची नसबंदी करण्यात येणार असून, तसा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठविण्यात येणार आहे. त्याशिवाय बिबट्यांना बंदिस्त करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीमधून साहित्य खरेदीसाठी चाळीस कोटींचा निधी देण्यास मान्यता दिली आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री पालकमंत्री अजित पवार यांनी दिली. तसेच गुजरात राज्यातील वनतारा प्रकल्पांतर्गत सुमारे पन्नास बिबटे पाठविण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.
विधानभवनात दिशा कृषी उन्नतीची या विषयावर आयोजित बैठकीनंतर पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. जिल्ह्यातील चार तालुक्यांतील बिबट्यांची संख्या वाढत असून, वन्यप्राणी आणि मानव संघर्षाला आता वेगळे वळण लागले आहे. गेल्या वर्षभरात जिल्ह्यात १६ जणांचा मृत्यू झाले असून, त्याचे लोण राज्यातील अन्य जिल्ह्यांतही पोहोचले आहे. त्यामुळे यावर उपाययोजना करण्यासंदर्भात माजी मंत्री दिलीप वळसे- पाटील यांनी अजित पवार यांना बैठक घेण्याची विनंती केली होती. त्यानुसार ही बैठक झाल्याचे पवार यांनी सांगितले.
बैठकीत बिबट्यांच्या वाढत्या संख्यांवर चिंता व्यक्त करण्यात आली. तसेच उपाययोजनांवर चर्चा करताना थेट केंद्रीय पर्यावरण आणि वनमंत्री भूपेंद्र यादव यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधला. जिल्ह्यात चार तालुक्यांतील बिबट्यांच्या वाढत्या संख्या यादव यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यावेळी यादव यांनी नसबंदी करण्यासंदर्भात प्रस्ताव पाठविण्याची सूचना केली. तसेच गुजरात राज्यातील वनतारा प्रकल्पाअंतर्गत सुमारे पन्नास बिबटे पाठविण्यात येणार असल्याचे पवार यांनी सांगितले.
या चारही तालुक्यांत सकाळी वीजपुरवठा करण्यात येणार आहे. त्यासाठी महावितरणचे मुख्य कार्यकारी अधिकारी लोकेश चंद्रा यांच्याशी संपर्क साधून त्यांना यासंदर्भात सूचना करण्यात आली. त्यासाठी उपकरणे लागणार असून, ३१ ऑक्टोबरपर्यंत ही सर्व प्रक्रिया पूर्ण होणार असल्याचे पवार यांनी सांगितले.
ऊस शेती आणि मानवी वस्त्यांमधील बिबट्यांचा वावर आणि हल्ले वाढल्यामुळे बिबट्यांना पिंजऱ्यात बंदिस्त करण्याबरोबरच त्यांची नसबंदी करण्याची सूचना भूपेंद्र यादव यांनी केली. त्यानुसार १२५ बिबटे पकडण्यात येणार असून, त्यासाठी निधी देण्याची तयारी दर्शविली आहे.