मिळकतकराने पार केला बावीशे कोटींचा टप्पा; पाच दिवसात चारशे कोटी रुपये मिळकत कर जमा करण्याचे आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2025 13:32 IST2025-03-27T13:29:35+5:302025-03-27T13:32:48+5:30
पाच दिवसांत चारशे कोटी रुपये मिळकत कर जमा करण्याचे आव्हान कर आकारणी आणि संकलन विभागापुढे आहे.

मिळकतकराने पार केला बावीशे कोटींचा टप्पा; पाच दिवसात चारशे कोटी रुपये मिळकत कर जमा करण्याचे आव्हान
पुणे : चालू आर्थिक वर्ष संपण्यास केवळ पाच दिवसांचा कालावधी शिल्लक राहिला असून, मंगळवार (दि. २५) पर्यंत महापालिकेच्या तिजोरीत २ हजार २२९ कोटी रुपयांचा मिळकत कर जमा झाला आहे. अंदाजपत्रकातील उद्दिष्ट गाठण्यासाठी पाच दिवसांत चारशे कोटी रुपये मिळकत कर जमा करण्याचे आव्हान कर आकारणी आणि संकलन विभागापुढे आहे.
महापालिकेच्या २०२४-२५ च्या अंदाजपत्रकामध्ये मिळकत करातून २ हजार ७०० कोटी रुपये उत्पन्न अपेक्षित धरले आहे. राज्य शासनाने लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर समाविष्ट गावांतील थकबाकीदारांवर कारवाई करू नये, असे आदेश दिल्याने उत्पन्न कमी झाल्याचा दावा मिळकत करविभाग करत आहे. त्यामुळेच मिळकत कराचे उद्दिष्ट गाठण्यासाठी मिळकत कर विभागाकडून प्रयत्न केले जात आहे. आर्थिक वर्ष संपण्यास पाच कालावधी राहिल्याने मिळकत कर भरणाऱ्या मिळकतधारकांची संख्या वाढत आहे.
दरम्यान, १ एप्रिल २०२३ ते २५ एप्रिल २०२४ या कालावधीत २ हजार १३६ कोटी ०८ लाख २४ हजार ६३४ मिळकत कर जमा झाला होता. मागील आर्थिक वर्षात १ एप्रिल २०२३ ते २५ एप्रिल २०२४ या कालावधीत २ हजार १३६ कोटी ०८ लाख २४ हजार ६३४ कर जमा झाला. चालू आर्थिक वर्षात म्हणजे १ एप्रिल २०२४ ते २५ एप्रिल २०२५ या कालावधीत २ हजार २२९ कोटी ०९ लाख ५१ हजार ०१९ रुपयांचा कर महापालिकेच्या तिजोरीत जमा झाला आहे.
समाविष्ट गावांमधून ४५० कोटी
चालू आर्थिक वर्षात समाविष्ट ३२ गावांमधून ४१४.०९ कोटी रुपयांचा मिळकत कर जमा झाला आहे. फुरसुंगी आणि उरूळी देवाची या दोन गावांमधील मिळकतधारकांनी ३५.२२ कोटी रुपये मिळकत कर जमा केला आहे. या दोन्ही गावांसह ३४ गावांमधून मिळकत करापोटी महापालिकेकडे ४४९.३२ कोटी रुपयांचा कर जमा झाला आहे.
चालू आर्थिक वर्षात २५ मार्चअखेर २ हजार २२९ कोटी रुपये मिळकत कर जमा झाला आहे. उद्दिष्टपूर्तीसाठी थकबाकी वसुलीसाठी पथकांची नियुक्ती केली आहे. त्यातून चांगल्याप्रकारे वसुली होत आहे. थकबाकीदारांसाठी कोणतीही अभय योजना प्रस्तावित नसल्याने थकबाकीदारांनी तातडीने कर भरावा. - - पृथ्वीराज बी. पी., अतिरिक्त आयुक्त, महापालिका