महापालिका निवडणुका स्वबळावर लढविण्याची तयारी; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे संकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2025 14:17 IST2025-05-18T14:11:42+5:302025-05-18T14:17:21+5:30
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुती म्हणून निवडणुकांना सामोरे जाणार असलो, तरी काही ठिकाणी स्वबळावर निवडणुका लढवू

महापालिका निवडणुका स्वबळावर लढविण्याची तयारी; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे संकेत
पुणे : शहरात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाची तसेच भारतीय जनता पक्षाची ही ताकद आहे. त्यामुळेच महापालिका निवडणुका स्वबळावर लढवाव्यात, असा दबाव दोन्ही पक्षांच्या प्रमुखांवर येत आहे. त्यामुळेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुती म्हणून निवडणुकांना सामोरे जाणार असलो, तरी काही ठिकाणी स्वबळावर निवडणुका लढवू, असे वक्तव्य केले होते. या वक्तव्याला आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील पाठिंबा दर्शविला आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस देखील पुण्यात स्वबळावर निवडणूक लढवेल, असे बोलले जात आहे.
राज्यात महायुती सरकारमधील घटक पक्षांची ताकद अनेक ठिकाणी आहे. महायुतीतील काही पक्षांची ताकद काही ठरावीक जिल्ह्यात जास्त आहे. त्यामुळे अपवादात्मक स्थितीत तेथे स्वबळावर आगामी महापालिका निवडणूक लढवली जाऊ शकते, असे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच पुण्यात सुचवले होते. त्याला अनुमोदन देत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी दुजोरा दिला आहे. विभागीय आयुक्त कार्यालयात शनिवारी (दि.१७) जिल्ह्याच्या खरीप हंगाम आढावा बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते
ते म्हणाले, आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणूक स्वतंत्र लढण्याची मागणी प्रत्येक पक्षातील कार्यकर्ते करू लागले आहेत. त्यातच दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात एका कार्यक्रमात काही ठिकाणी महायुतीतील पक्ष स्वतंत्र निवडणूक लढवू शकतात, असे वक्तव्य केले होते. त्यामुळे ज्या पक्षाची जिथे जास्त ताकद आहे. तिथे निवडणूक स्वतंत्र लढवू जाऊ शकते. मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याला माझे पूर्ण समर्थन आहे.
दीपक मानकर यांचा राजीनामा योग्यच
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष दीपक मानकर यांच्यावर नुकतेच गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामुळे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. यावर अजित पवार म्हणाले की, अशा प्रकरणात राजीनामा देणे योग्य असते. कारण, पदावर असल्यास जास्त दडपण येते. त्यामुळे आता येथून पुढे पोलिसांना आपल्या पद्धतीने कारवाई करता येईल. मानकर यांच्यावर देखील कोणतेही दडपण अथवा दबाव असणार नाही. मात्र, मानकर यांनी आपल्याला या प्रकरणात नाहक गोवण्यात आले आहे, असे मला सांगितले आहे. चौकशीनंतर यात सत्य काय आहे ते आपोआप बाहेर येईल.