महापालिका निवडणुकीसाठी राजकीय पक्ष सज्ज;संघटनात्मक तयारी सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2025 16:36 IST2025-07-12T16:35:29+5:302025-07-12T16:36:50+5:30
युती, आघाडीबाबत वरिष्ठ काय घ्यायचा तो निर्णय घेतील, मात्र स्वतंत्र लढायचे आहे, असा विचार करून सर्वच राजकीय पक्षांनी काम सुरू केले आहे.

महापालिका निवडणुकीसाठी राजकीय पक्ष सज्ज;संघटनात्मक तयारी सुरू
पुणे : भारतीय जनता पक्ष, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस, दोन्ही शिवसेना यांच्याबरोबरच आम आदमी पार्टी व अन्य राजकीय पक्षांनाही महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने शहर शाखांमध्ये संघटनात्मक बदल करण्यास सुरुवात केली आहे. पक्षाच्या आघाड्यांमध्ये पदाधिकाऱ्यांचे बदल करण्यात येत असून, त्या सक्रिय करण्यात येत आहेत. युती, आघाडीबाबत वरिष्ठ काय घ्यायचा तो निर्णय घेतील, मात्र स्वतंत्र लढायचे आहे, असा विचार करून सर्वच राजकीय पक्षांनी काम सुरू केले आहे.
भारतीय जनता पक्ष
भाजपने शहराध्यक्ष धीरज घाटे यांना त्या पदावर कायम ठेवले आहे. मात्र, त्याचबरोबर पक्षाचे ज्येष्ठ व अनुभवी पदाधिकारी गणेश बिडकर यांना महापालिका निवडणुकीची स्वतंत्र जबाबदारी देण्याविषयी चर्चा सुरू आहे. पक्षाच्या वेगवेगळ्या आघाड्यांच्या बैठका सुरू केल्या आहेत. तिथेही पदाधिकारी बदलाचा गंभीरपणे विचार केला जात आहे. काम करतील त्यांना पुन्हा संधी, जिथे काम दिसणार नाही तिथे बदल, याप्रमाणे निर्णय घेतले जात आहेत. संघटनात्मक स्तरावर पक्षाची ताकद वाढवणे, पक्षाची हजारी पन्ना, घराघरांत संपर्क या उपक्रमांची काटेकोर अंमलबजावणी यावर पक्षाकडून भर दिला जात आहे. विसर्जित महापालिका सभागृहात पक्षाचे १०५ नगरसेवक होते व एकहाती सत्ता होती. ३ वर्षांच्या खंडानंतर ती पुन्हा मिळवण्यासाठी पक्षाने सर्वतोपरी प्रयत्न चालवले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)
पक्षाने संघटनेचे दोन भाग केले आहेत. महापालिका हद्दीतील चार विधानसभा मतदार संघ एका भागात, तर चार दुसऱ्या भागात अशी विभागणी केली आहे. माजी आमदार सुनील टिंगरे यांना एका भागाचे, तर माजी नगरसेवक सुभाष जगताप यांना दुसऱ्या भागाचे अध्यक्ष नियुक्त केले आहे. त्याशिवाय दोघांनाही प्रत्येकी दोन याप्रमाणे चार कार्याध्यक्षांची नियुक्ती केली आहे. पक्षाचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महापालिकेतील गेलेली सत्ता पुन्हा मिळविण्याचा चंग बांधला आहे. त्याप्रमाणे त्यांनी उपनगरांमध्ये जास्त लक्ष केंद्रीत केले आहे. माजी आमदार महादेव बाबर यांना पक्षात घेण्यात आले आहे.
शिवसेना (एकनाथ शिंदे)
यांची शहरात पुरेशी राजकीय ताकद नाही, मात्र ती वाढवण्याचा व महापालिकेत चांगले संख्याबळ मिळवण्याचा त्यांचाही प्रयत्न आहे. त्यासाठीच काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांना पक्षात प्रवेश देण्यात आला. त्याशिवाय त्यांच्याकडे महानगरप्रमुख असे पद देण्यात आले आहे. काँग्रेस व अन्य पक्षांमधील असंतुष्टांना पक्षात घेण्याकडे लक्ष केंद्रित करण्याचे त्यांना सांगण्यात आले आहे. शहराध्यक्ष नाना भानगिरे हेही त्यासाठी प्रयत्न करत आहेत. युवकांचे संघटन वाढविण्याकडे त्यांचा कल आहे. सत्तेत असूनही शहरातील वेगवेगळ्या प्रश्नांवर आंदोलन करून पक्षकार्यकर्ते सक्रिय केले जात आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)
या पक्षाने सातत्याने विविध प्रश्नांवर आंदोलने करण्यास सुरुवात केली आहे. पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांचे पुण्यातील दौरे वाढले आहेत. खासदारकीचा मतदारसंघ म्हणून त्या लक्ष देत आहेतच, पण लक्ष्य महापालिका हेच आहे. एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेसचे ४२ नगरसेवक होते. त्यातील बहुतेकजण अजित पवारांकडे गेले आहेत, मात्र तरीही शरद पवार यांना मानणारा बराच मोठा मतदार शहरात आहे, त्यावर पक्षाची मदार असून पवार यांनाही सातत्याने शहरात बोलावले जात आहेत.
शिवसेना (उद्धव ठाकरे)
यांची शहरात फार मोठी ताकद नाही. मात्र, त्यांनीही जास्तीत जास्त जागा निवडून आणण्याचा प्रयत्न चालवला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबरोबर युती झालीच तर शहरात मोठी राजकीय स्पेस मिळेल असे त्यांना वाटते आहे. त्यांनीही मूळचे शिवसेनेत व नंतर मनसे, वंचित असा प्रवास केलेले माजी नगरसेवक वसंत मोरे यांना पक्षात घेत त्यांच्याकडे महापालिका निवडणुकीची स्वतंत्र जबाबदारी दिली आहे.
काँग्रेस
या सर्व राजकीय घडामोडींमध्ये काँग्रेससारखा एकेकाळी संपूर्ण महापालिकेवर एकहाती वर्चस्व असलेला राष्ट्रीय पक्ष मात्र जवळपास सुस्त झाला आहे. अध्यक्षपद बदलण्याच्या चर्चेत अडकला आहे. त्यातही काही महिने झाले तरीही निर्णय व्हायला तयार नाही. संघटनात्मक स्तरावर पक्ष पूर्णपणे ढासळलेला दिसतो. आंदोलने, चर्चा, मोर्चा सुरू आहे. मात्र, एकत्रित कार्यक्रमांपेक्षा त्यातून गटबाजीच समोर येते आहे. प्रत्येकजण स्वतंत्रपणे वेगवेगळे कार्यक्रम करताना दिसतो. महापालिका निवडणुकीसाठी म्हणून पक्षात अद्याप तरी कसलीही सक्रियता दिसत नाही.
अन्य पक्षांची तयारी
मनसेचे स्थानिक पदाधिकारी अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाच्या प्रतीक्षेत आहेत, तर आम आदमी पार्टी (आप) शहराच्या विशिष्ट परिसरात संघटन वाढवून त्याकडे लक्ष केंद्रित करून काम करत आहे. वंचित विकास आघाडी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे वेगवेगळे गटही महापालिका निवडणुकीची त्यांच्या राजकीय शक्तीप्रमाणे मोर्चेबांधणी करण्याच्या प्रयत्नात आहेत.