महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या आजीव सदस्यांमध्ये राजकीय घुसखोरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2025 09:53 IST2025-12-27T09:52:52+5:302025-12-27T09:53:03+5:30
- सुप्रिया सुळे यांची मुलगी, रोहित पवार यांच्या पत्नीचा समावेश

महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या आजीव सदस्यांमध्ये राजकीय घुसखोरी
- उमेश गो. जाधव
पुणे :महाराष्ट्र क्रिकेट संघटनेची निवडणूक ६ जानेवारी २०२६ रोजी होत असून त्यासाठी आजीव सदस्यांमध्ये जोरदार अवैध घुसखोरी घडवून आणण्यात आली आहे. आजीव सदस्यांमध्ये सुप्रिया सुळे यांनी मुलगी रेवती सदानंद सुळे आणि सध्याचे एमसीए अध्यक्ष, आमदार रोहित पवार यांची पत्नी कुंती पवार यांच्यासह अनेक राजकीय व्यक्तींचा समावेश करण्यात आला आहे.
या अवैध घुसखोरीमुळे आजीव सदस्यांची संख्या १६१ वरून थेट ५७२ वर गेली आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एमसीए सदस्यांमध्ये अवैध घुसखोरी घडवून आणण्यात येणार असल्याचे वृत्त 'लोकमत'ने प्रसिद्ध केले होते. तेव्हा एमसीए अध्यक्ष रोहित पवार यांनी ही शक्यता फेटाळून लावली होती. आता त्यांच्याच नेतृत्वाखाली ही राजकीय घुसखोरी घडवून आणण्यात आली आहे.
महाराष्ट्र क्रिकेट संघटनेला आजीव सदस्यांमध्ये वाढ करण्याचा अधिकार असला तरी निवडणुकीच्या आधीच त्यांना या अधिकाराची जाणीव का झाली हा प्रश्न अनुत्तरित आहे. क्रिकेट संघटनेत खेळाशी संबंधित व्यक्ती, संस्था, संघटनांचा समावेश व्हावा अशी साधारण अपेक्षा असते पण एमसीएमध्ये राजकीय घुसखोरीमुळे महाराष्ट्राच्या क्रिकेटचे आणि खेळाडूंचे नुकसान होणार आहे. आपल्या मुलाने क्रिकेटपटू व्हावे अशी अपेक्षा करून त्यांना मैदानावर पाठवणाऱ्या पालकांच्या विश्वासालाही यामुळे तडा जाणार आहे, असे एमसीएच्या एका सदस्याने सांगितले. याबाबत एमसीएचे अध्यक्ष रोहित पवार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.
'एमसीए'ची झाली फॅमिली ट्रस्ट
आजीव सदस्यांची संख्या वाढवताना अध्यक्ष रोहित पवार यांनी स्वतःच्या कुटुंबातील व्यक्तींचाच भरणा करून महाराष्ट्र क्रिकेट संघटनेची फॅमिली ट्रस्ट केल्याचा आरोप एमसीए सदस्याांनी केला आहे.
काॅंग्रेस, राष्ट्रवादीच्या संघटनांना प्राधान्य
क्लब, महाविद्यालय गटात काॅंग्रेस, राष्ट्रवादीचा प्रभाव असलेल्या संघटनांनाच सदस्यत्व देत महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचा राजकीय आखाडा केल्याचा आरोपही सदस्य करत आहेत.
मर्जीतील क्लबला सदस्यत्व
क्लब गटात ७ स्पोर्ट्स, आर्यन्स क्रिकेट ॲकॅडमी, केडन्स क्रिकेट ॲकॅडमी, क्रिकेट ॲकॅडमी ऑफ ट्रिनिटी या मर्जीतील क्लबला सदस्यत्व देताना नामवंत कसोटी कर्णधार दिलीप वेंगसरकर क्रिकेट अकादमीला (डीव्हीसीए) डावलण्यात आले आहे. वेंगसरकर अकादमी १८ वर्षांपासून पुण्यात कार्यरत असून त्यांनी भारतासाठी ऋतुराज गायकवाड, विकी ओत्सवाल यांसारखे खेळाडू दिले. तसेच सर्व वयोगटात महाराष्ट्र क्रिकेट संघासाठी सुमारे १०० खेळाडू त्यांनी तयार केले आहेत.
“लोकमत“चे वृत्त ठरले खरे
एमसीएमध्ये १०० अनधिकृत सदस्यांची होणार घुसखोरी या शीर्षकाखाली लोकमतने ३१ ऑक्टोबरला वृत्त प्रसिद्ध केले होते. डिसेंबरच्या अखेरीस हे वृत्त खरे ठरले असून १०० ऐवजी तब्बल ४११ सदस्यांची घुसखोरी घडवून आणण्यात आली आहे.