भोर : भोर मतदारसंघात माजी आमदार संग्राम थोपटे आणि आमदार शंकर मांडेकर यांच्यातील राजकीय वाद चव्हाट्यावर आला आहे. "आम्ही मंजूर केलेल्या विकासकामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन तुम्ही करता; पण आमच्यावर खोटे आरोप करता. तुमची अवस्था चोराच्या उलट्या बोंबासारखी आहे. बोलताना पातळी राखा, अन्यथा जशास तसे उत्तर देऊ, असा इशारा माजी आमदार संग्राम थोपटे यांनी दिला आहे.रायरेश्वर डोंगरी विकास परिषदेत घेतलेल्या पत्रकार परिषदेत थोपटे यांनी मांडेकरांवर जोरदार टीका केली. यावेळी पोपट सुके, विठ्ठल आवाळे, जीवन कोंडे, रवींद्र कंक, संतोष धावले, पल्लवी फडणीस, अतुल किंद्रे, रोहन बाठे, उत्तम थोपटे, सचिन हर्णसकर, अभिषेक येलगुडे, सुधीर खोपडे, सुभाष कोंढाळकर, गणेश पवार, चंद्रकांत मलेकर, विजय शिरवले, अमित सागळे, राजेंद्र गुरव, नरेश चव्हाण, विश्वास ननावरे आणि डॉ. नागेंद्र चौबे उपस्थित होते.थोपटे म्हणाले, "संविधानाने मला अधिकार दिले आहेत. मी लोकांच्या प्रश्नांसाठी आवाज उठवतो. तुम्ही आमच्या कामांचे श्रेय घेता आणि खोटे आरोप करता. तुमचा विजय हा राजकीयअपघात आहे. सत्तेशिवाय कोण राहू शकत नाही, हे तुमच्या नेत्यांना विचारा." आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेच्या नियोजनाबाबतही थोपटे यांनी मांडेकरांवर दिशाभूल केल्याचा आरोप केला. "पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार मी नियोजन करतोय. याची मिरची तुम्हाला का झोंबली? स्थानिक आमदार लोकांची दिशाभूल करत आहेत. माझ्या १५ वर्षाच्या कामांचे प्रगती पुस्तक पाठवतो, मग काय कामे झाली ते समजेल," असे ते म्हणाले."राजगडला कर्जपुरवठा होऊ नये म्हणून सतत प्रयत्न झाले; पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जपुरवठा करून कर्मचारी आणि सभासदांना मदत केली. यामुळे राजगडला त्रास देणाऱ्यांना चपराक बसली," अशी टीका त्यांनी नाव न घेता केली.
राजकीय वाद चव्हाट्यावर;बोलताना पातळी राखा,अन्यथा जशास तसे उत्तर देऊ;संग्राम थोपटेंचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2025 10:51 IST