पीएमपीचे प्रवासी घटल्याने उत्पन्नात ४७ कोटींनी घट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2025 09:22 IST2025-04-12T09:19:52+5:302025-04-12T09:22:15+5:30

- गेल्या आर्थिक वर्षांत दोन कोटी २९ लाख प्रवासी कमी झाले

pune news PMP revenue drops by 47 crores due to decrease in passengers | पीएमपीचे प्रवासी घटल्याने उत्पन्नात ४७ कोटींनी घट

पीएमपीचे प्रवासी घटल्याने उत्पन्नात ४७ कोटींनी घट

पुणे : अपुरी बससंख्या, मार्गावर वेळेवर बस नसणे, जुन्या बस रस्त्यात बंद पडणे, वेळेचे नियोजन नसणे या विविध कारणांमुळे पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) गेल्या आर्थिक वर्षांत दोन कोटी २९ लाख प्रवासी संख्येत घट झाली आहे. शिवाय प्रवासी घटल्याने यंदा ४७ कोटी रुपये उत्पन्न कमी मिळाले. यामुळे पीएमपीची संचालन तूट वाढणार आहे.

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पीएमआरडीएच्या हद्दीत पीएमपीकडून प्रवासी सेवा देण्यात येते. पीएमपीच्या दैनंदिन १ हजार ७०० बस शहरातील विविध मार्गांवर धावतात. गेल्या काही वर्षांपासून दरवर्षी पीएमपीची संचालन तूट वाढत आहे. त्यामुळे पीएमपीची आर्थिक कोंडी होत आहे. त्यामुळे ही तूट भरून काढण्यासाठी दोन्ही महापालिकांना अतिरिक्त पैसे द्यावे लागत आहेत. पीएमपीची संचालन तूट वाढल्यामुळे खर्च कमी करण्याकडे भर दिला जात आहे; पण प्रत्येक महिन्यात प्रवासी संख्या कमी होत गेल्याचे दिसत आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे पीएमपीच्या ताफ्यातील कमी झालेली बससंख्या. येत्या काळात बससंख्या वाढणार आहे. त्यामुळे उत्पन्नात वाढ होईल का? हे पाहावे लागणार आहे.

जुन्या बसमुळे प्रवासी वैतागले :

गेल्या वर्षी पीएमपीच्या ताफ्यातील बसची घटना घडली होती. शिवाय स्वमालकीच्या ३२७ बसला १२ वर्षे पूर्ण झाली तरी मार्गावर सोडण्यात आले होते. त्यामुळे या बस सतत बंद पडत आहेत. त्याचा मनस्ताप प्रवाशांना सहन करावा लागत आहे. शिवाय बसची संख्या कमी झाल्यामुळे काही मार्गांवरील फेऱ्या कमी झाल्या आहेत. यामुळे पीएमपीच्या उत्पन्नावर परिणाम झाल्याचे दिसून आले.

प्रवासी १२ वरून १० लाखांवर :
पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पीएमआरडीएच्या हद्दीत दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत आहे. त्यामुळे या भागात पीएमपी बससंख्या वाढविणे गरजेचे आहे; परंतु बस कमी असल्याने प्रवाशांवर परिणाम होत आहे. गेल्या वर्षी दिवसाला १२ लाखांच्या पुढे गेलेली प्रवासी संख्या आता दहा लाखांवर आली आहे. शिवाय गर्दी असताना अनेक मार्गांवर बसची कमतरता आहे. त्यामुळे प्रवासी संख्येत घट झाली आहे.

अशी आहे आकडेवारी :

वर्ष            -   प्रवासी संख्या      -            उत्पन्न

२०२३-२४      -    ४३ कोटी ५५ लाख       -     ६११ कोटी

२०२४ - २५  -  ४१ कोटी २६ लाख   -   ५६४ कोटी 

Web Title: pune news PMP revenue drops by 47 crores due to decrease in passengers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.