पीएमपीच्या महिला वाहकास शिवीगाळ; कोरेगाव पार्क पोलिसांत एकावर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2025 17:58 IST2025-09-30T17:57:05+5:302025-09-30T17:58:05+5:30
महिला वाहकाची पीएमपी बस सोमवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास कोरेगाव पार्क भागातून जात होती.

पीएमपीच्या महिला वाहकास शिवीगाळ; कोरेगाव पार्क पोलिसांत एकावर गुन्हा दाखल
पुणे : पीएमपीच्या महिला वाहकास शिविगाळ करून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलिसांनी एका प्रवाशावर गुन्हा दाखल केला आहे. धीरज रामचंद्र ब्रिजवासी (३२, रा. चंदननगर) असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे.
याबाबत पीएमपीच्या महिला वाहकाने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला वाहकाची पीएमपी बस सोमवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास कोरेगाव पार्क भागातून जात होती.
त्यावेळी ब्रिजवासीने धावत्या बसमध्ये प्रवेश केला. ‘धावत्या बसमध्ये प्रवेश करणे चुकीचे आहे. जीवावर बेतू शकते’, वाहक असलेल्या महिलेने त्याला सुनावले. त्यावेळी ब्रिजवासीने वाहक महिलेशी प्रवाशांसमोर बसमध्ये वाद घालण्यास सुरुवात केली. यावेळी त्याने शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. त्यानंतर पीएमपी बसचालकाने बस कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात नेली. पोलिसांनी ब्रिजवासीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला नोटीस बजाविली. पोलिस उपनिरीक्षक माळी तपास करत आहेत.