Plastic ban : महापालिकेने तेरा महिन्यांत जप्त केले ५ हजार किलो प्लास्टिक
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2026 12:53 IST2026-03-01T12:52:42+5:302026-03-01T12:53:55+5:30
- कारवाईतून सात लाख २४ हजार ५०० रुपये दंड वसूल

Plastic ban : महापालिकेने तेरा महिन्यांत जप्त केले ५ हजार किलो प्लास्टिक
पुणे : शासनाने ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या आणि थर्माकोल वापरावर आणि उत्पादनावर बंदी घातली आहे. त्यानुसार महापालिकेने जानेवारी २०२५ ते जानेवारी २०२६ या तेरा महिन्यांच्या कालावधीत १ हजार ४०८ जणांवर कारवाई करून ५ हजार १६८ किलो प्लास्टिक जप्त केले आहे. या कारवाईत सात लाख २४ हजार ५०० रुपये दंड वसूल केला आहे.
पर्यावरणासाठी हानीकारक ठरणाऱ्या ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांवर राज्य शासनाने २०१८ पासूनच बंदी घातली आहे. यानंतर राज्यात तसेच पुणे महापालिकेनेही प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घातलेल्या ‘यूज ॲण्ड थ्रो’च्या वापरातील प्लास्टिक व थर्माकोलच्या वस्तूंवर कारवाई सुरू केली आहे. महापालिका व राज्य प्रदूषण नियामक मंडळाच्या वतीने करण्यात येणाऱ्या या कारवाया मध्यंतरी काहीशा थंडावल्या होत्या; परंतु केंद्र शासनाने संपूर्ण देशभरातच या प्लास्टिकवर निर्बंध लादल्याने महापालिका पुन्हा ॲक्शन मोडवर आली होती. त्यानंतर कारवाईचे प्रमाण घटल्याचे पाहायला मिळते.
महापालिका प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने आणि आरोग्य निरीक्षकांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून जानेवारी २०२५ ते जानेवारी २०२६ या तेरा महिन्यांच्या कालावधीत १ हजार ४०८ जणांवर कारवाई करून ५ हजार १६८ किलो प्लास्टिक जप्त केले आहे. या कारवाईत सात लाख २४ हजार ५०० रुपये दंड वसूल केला आहे. ही कारवाई प्लास्टिक वापराच्या तुलनेत खूपच कमी आहे. यावरून कारवाईचा वेग थंडावल्याचे स्पष्ट होते.
पालिकेच्या स्पर्धेला मोठा प्रतिसाद
महापालिकेने प्लॅस्टिकचा कचरा निर्मूलन करण्यासाठी महापालिकेची माजी आयुक्त विक्रम कुमार यांनी प्लास्टिक कचरा संकलन स्पर्धा घेतली होती. या स्पर्धेला पुणेकरांनी चांगलाच प्रतिसाद दिला होता. यामुळे कमी कालावधीत तीन हजार २४८ किलो प्लास्टिक बाटल्या जमा झाल्या होत्या. स्पर्धेतील विजेत्यांना कमिन्स इंडिया या संस्थेच्या सहकार्याने घेतलेल्या स्मार्टफोन, स्मार्टवॉच, इलेक्ट्रिक बाईक अशा स्वरूपाची बक्षिसे देण्यात आली होती.
-------
महापालिकेने प्लास्टिकवर केलेली कारवाई
महिना - जप्त केलेले प्लास्टिक (किलो)
जानेवारी २०२५ - ६५९
फेब्रुवारी २०२५ - २८०
मार्च २०२५ - २८८
एप्रिल २०२५ - २०२
मे २०२५ - २४२
जून २०२५ - १२०.९
जुलै २०२५ - ५८५.५५
ऑगस्ट २०२५ - ३३२.३
सप्टेंबर २०२५ - ३७९.५
ऑक्टोबर २०२५ - ४१९.५
नोव्हेंबर २०२५ - २१३.५
डिसेंबर २०२५ - २५७५
जानेवारी - २०२६ - १०८.५
एकूण - ५ हजार १६७.७५
---