Palkhi Mahamarg: पालखी महामार्गाचे काम बंद; सणसर ग्रामस्थांचा प्रकल्प विभागाला अल्टीमेटम

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 10:59 IST2025-12-11T10:56:30+5:302025-12-11T10:59:54+5:30

Palkhi Mahamarg: लासुर्णे–भवानीनगर सेवा रस्त्याचा प्रश्न गंभीर; जाचकांचे अधिकाऱ्यांना खडे बोल

pune news palkhi highway work stopped sansar villagers issue ultimatum to the project department | Palkhi Mahamarg: पालखी महामार्गाचे काम बंद; सणसर ग्रामस्थांचा प्रकल्प विभागाला अल्टीमेटम

Palkhi Mahamarg: पालखी महामार्गाचे काम बंद; सणसर ग्रामस्थांचा प्रकल्प विभागाला अल्टीमेटम

सणसर : संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाचे गेले दोन-तीन वर्षांपासून रखडलेले काम आणि अंडरपास, सेवा रस्ता अशा वेगवेगळ्या समस्यांसाठी सणसरच्या ग्रामस्थांनी आज प्रकल्प अधिकाऱ्यांना प्रश्नांचा भडीमार करत धारेवर धरले. मागील पंधरा दिवसांपासून सणसरच्या ग्रामस्थांनी पालखी महामार्गाचे काम सणसर हद्दीत बंद केले आहे.

दरम्यान, पालखी महामार्गाच्या प्रकल्प अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून घेतले. यावेळी श्री छत्रपती कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक हेही उपस्थित होते. जाचक यांनी सणसर बरोबरच भवानीनगर येथील पुलाचा प्रश्न मांडला. पालखी महामार्गाला लासुर्णेपासून भवानीनगर असा सलग सेवा रस्त्याची गरज आहे. पूर्वीचा अंडरपास गावाच्या बाहेर घेतला. पालखीचा विचार केला नाही. हा सर्व प्रकार गावकऱ्यांना विश्वासात न घेता. रस्त्याची परिपूर्ण माहिती न दिल्यामुळे गावकरी अंधारात राहिले. काम पुढे गेले आहे. प्रकल्प अधिकाऱ्यांच्या चुकांचा त्रास गावकऱ्यांना होणार असल्याचे शरद कांबळे यांनी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणले.

प्रकल्प बनवताना रस्त्याची उंची, चुकीची गटार लाइन, रस्त्यावरची वळणे चुकीची आहेत. अंडरपासची उंची कमी असल्याने वाहतुकीचे ट्रॅक्टर, ट्रेलर, हार्वेस्टर, उसाच्या बैलगाड्या या रस्त्याच्या पलीकडे नेण्यास अडचण निर्माण होणार आहे. पाणीपुरवठा लाइन जोडून न देणे, गटार लाइन चुकीच्या पद्धतीने करणे, चेंबर आणि खड्डे खणून ठेवले आहेत. अशा प्रश्नांची सरबत्ती माजी उपसरपंच अभयसिंह निंबाळकर यांनी केली. यावर अधिकाऱ्यांनी केंद्राला ग्रामस्थांच्या मागण्यांचा प्रस्ताव पाठवण्यात येणार असल्याचे सांगितले. यावेळी सरपंच यशवंत नरुटे पाटील, पार्थ निंबाळकर, पिंटू गुप्ते, बजरंग रायते, विशाल पाटील यांनी वेगवेगळे मुद्दे मांडले. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

बैठकीतून तोडगा काढा

पूर्वी धरणाची जागा सुद्धा बदलली होती. उजनी धरणाच्या निर्मिती वेळी नियोजित धरण वेगळ्या ठिकाणी होते. परंतु, लोक भावनेचा, शेतकऱ्यांच्या नुकसानीचा विचार करून धरणाची जागा बदलली. हा तर फक्त रस्त्यावरच्या पुलाचा प्रश्न आहे. अधिकाऱ्यांनी या समस्येवर वेळीच विचार करायला पाहिजे होता, पण अजूनही वेळ गेलेली नाही. उपमुख्यमंत्री, कृषी मंत्री व ग्रामस्थ यांच्या समवेत एक बैठक लावून या प्रश्नाची उकल करावी लागेल, असे छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनी सांगितले.

Web Title : पालखी राजमार्ग का काम रुका: ग्रामीणों का परियोजना विभाग को अल्टीमेटम

Web Summary : सांसार के ग्रामीणों ने पालखी राजमार्ग का काम रोका, अधूरे अंडरपास और सर्विस रोड का हवाला दिया। उन्होंने स्थानीय पहुंच और उपयोगिताओं को प्रभावित करने वाली निर्माण त्रुटियों के तत्काल समाधान की मांग की। अधिकारियों ने समाधान प्रस्तावित करने का वादा किया।

Web Title : Palkhi Highway Work Stopped: Villagers Ultimatum Project Department Over Issues

Web Summary : Sansar villagers halted Palkhi highway work, citing incomplete underpasses and service roads. They demand immediate resolution of construction flaws affecting local access and utilities. Officials promised to propose solutions.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.