आमचा विरोध अजित पवारांना नाही तर तेथील कारभाराला...; मुरलीधर मोहोळ यांनी स्पष्टच सांगितले
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 18:04 IST2025-10-30T18:03:43+5:302025-10-30T18:04:00+5:30
- आम्ही केल्या तक्रारींकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने आम्हाला असोसिएशन निवडणुकीच्या रिंगणात उतरावे लागले, अशी माहिती केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

आमचा विरोध अजित पवारांना नाही तर तेथील कारभाराला...; मुरलीधर मोहोळ यांनी स्पष्टच सांगितले
पुणे -महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार यांना आमचा विरोध नाही. मात्र, संघटनेचे सचिव नामदेव शिरगावकर यांच्या कार्यशैलीला आमचा विरोध आहे. जशी माझ्या संघटनेची शिरगावकर यांच्याविरोधात तक्रार आहे, तशी इतरही अनेक संघटनांच्या तक्रारी आहेत. आम्ही केल्या तक्रारींकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने आम्हाला असोसिएशन निवडणुकीच्या रिंगणात उतरावे लागले, अशी माहिती केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली.
महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या निवडणुकीमध्ये असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरले आहेत. यासाठी २ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. ॲथलेटिक्स, आर्चरी, बॅडमिंटन, बास्केटबॉल, फुटबॉल, जिम्नॅस्टिक, हॉकी, ज्युडो, खो-खो, टेनिस, रायफल, रोईंग यांसारख्या 22 संघटनांचे प्रतिनिधी मतदानात सहभागी होणार आहेत.
या पार्श्वभूमीवर मोहोळ यांनी गुरुवारी आपल्या कोथरुड येथील निवास्थानी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, सचिवांचा मनमानी कारभार सुरू होता. आमच्या संघटनेला मान्यता दिली जात नव्हती, इतर संघटनांच्याही सचिवांच्या संदर्भात तक्रारी होत्या. यामध्ये अजित पवार यांनी लक्ष घालावे, एवढीच आमची अपेक्षा होती. मात्र, त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे आम्ही निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला. या निवडणुकीचा राजकारणाशी कसलाही संबंध नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निवडणुकीत लक्ष घातलेले नाही, असेही मोहोळ यांनी स्पष्ट केले.
आमच्या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना क्रीडा मंत्र्यांचे फोन येतात...
राज्याचे क्रिडा मंत्री आम्हाला पाठिंबा दिलेल्या क्रिडा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना फान करून धमकवतात, असा आरोप महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष व महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या निवडणुकीत वरिष्ठ उपाध्यक्ष पदाचे उमेदवार आमदार संदीप जोशी यांनी केला. भ्रष्टाचाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या क्रीडा मंत्र्यांना आमचा विरोध आहे, असेही जोशी म्हणाले.