ओतूरचे ग्रामीण रुग्णालय उद्घाटनाच्या प्रतीक्षेत; जनता, प्रशासनाचे मात्र मौन, सुविधा तयार पण रुग्णालय बंदच
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2025 16:47 IST2025-12-06T16:46:47+5:302025-12-06T16:47:00+5:30
- कोट्यवधी खर्चुन उभी इमारत, डॉक्टर मात्र हवा! ओतूरच्या प्रश्नाकडे शासनाचे दुर्लक्ष? इमारत उभी, डॉक्टर आणि स्टाफ नेमणूक झालेली नाही

ओतूरचे ग्रामीण रुग्णालय उद्घाटनाच्या प्रतीक्षेत; जनता, प्रशासनाचे मात्र मौन, सुविधा तयार पण रुग्णालय बंदच
ओतूर : गेल्या दीड वर्षापासून ओतूरकरांना ग्रामीण रुग्णालयाकडे अक्षरशः ‘डोळे लावून’ बसावे लागत आहे. नवे भव्य बांधकाम उभे राहून दोन वर्षे झाली, सर्व सुविधा यंत्रणेसकट तयार पण अद्याप रुग्णालय सुरूच नाही. परिणामी नागरिकांमध्ये सरकारबद्दल प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत हा मुद्दा पुन्हा एकदा राजकीय पातळीवर तापेल, यात शंका नाही. ‘या २०२५ मध्ये तरी रुग्णालय सुरू होणार का, की पुन्हा सकाळ-संध्याकाळ केवळ घोषणा ऐकायच्या?’, असा सर्रास प्रश्न जनतेतून विचारला जात आहे.
ओतूर व परिसरातील गावातील लोकसंख्या एक लाखाच्या घरात, आठवडी बाजार जिल्ह्यातील मोठ्या बाजारांपैकी एक. ५०-६० गावांची ये-जा सुरू असते. एवढ्या मोठ्या लोकवस्तीत केवळ प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मर्यादित सोयी. आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना जुन्नर, आळेफाटा किंवा नारायणगावचा रस्ता धरावा लागतो.
रस्ता लांब, वेळ कमी, व्यवस्था नाही आणि अशा प्रवासात अनेकांचे जीव गेले, ही वस्तुस्थिती शासनाच्या निद्रिस्त यंत्रणेला तरी जागवणार का? कोट्यवधींच्या खर्चातून रुग्णालयाचे बांधकाम पूर्ण. इमारत उभी, सुविधा तयार, डॉक्टर आणि स्टाफ नेमणूक झालेली नाही. ‘घर बांधून किल्ली सरकारजवळच अडकली!’ अशी बोचरी टीका नागरिक करत आहेत. प्रसारमाध्यमांचा पाठपुरावा, नागरिकांच्या वारंवार मागण्या, निवेदने तरीही फाइलींचे चक्र जशास तसे फिरत आहेत. हा नियोजनातील अपयशाचा नमुना की ओतूरवासीयांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष?, असा प्रश्न उभा राहत आहे. ओतूरमधील युवकांनी थेट प्रशासनालाच सवाल केला आहे - ‘रुग्णालय सुरू करायला आमरण उपोषण करावं लागणार आहे का?’ जनतेचा संयम आता संपत चालला आहे. शासनाची उदासीनता आणि दुर्लक्ष आता असह्य पातळीवर पोहोचले आहे.
आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, स्थानिक प्रशासनाकडून एकच उत्तर -
‘लवकरच नियुक्त्या होतील. रुग्णालय सुरू करण्याची प्रक्रिया सुरू आहे.’ परंतु, या प्रक्रियेला मुहूर्त कधी?, तारीख कधी? याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. शासनाकडून स्पष्ट, ठोस आणि त्वरित निर्णयाची मागणी सध्या ओतूर परिसरात जोर धरत आहे. कारण, ओतूरचे ग्रामीण रुग्णालय सुरू झाले पाहिजे, कारण कित्येकदा प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधाचा अभाव पाहायला मिळत असतो. त्या सुविधा तोकड्या पडत असून, इंजेक्शन कधी असतात कधी नसतात, गोळ्या असतात नसतात, त्यामुळे कित्येक रुग्णांना खासगी रुग्णालयात धाव घ्यावी लागत आहे, अशी वस्तुस्थिती सध्या आहे.
केवळ प्राथमिक आरोग्य केंद्रात मर्यादित सुविधा आता ओतूर भागाच्या वाढत्या लोकसंख्येला अपुऱ्या ठरत आहेत. हृदयविकाराचा झटका, अपघात, प्रसूती, श्वसनाच्या समस्या, साप चावणे, विषबाधा, बिबट हल्ला, अशा गंभीर परिस्थितीत रुग्णांना आळेफाटा येथील खासगी किंवा जुन्नर, नारायणगाव येथे शासकीय ग्रामीण रुग्णालयात तातडीने हलवावे लागते. दरम्यान या प्रवासात वेळेअभावी अनेकांनी जीव गमावल्याचा धोका कायम आहे. - हेमंत पा. डुंबरे, तालुकाध्यक्ष मानवाधिकार संघ
रुग्णालय सुरू होणे ही फक्त सरकारी जबाबदारी नाही, तर जनतेच्या जीवनाचा प्रश्न आहे आणि आता घोषणा नव्हे, निर्णय हवा आहे. ग्रामीण रुग्णालय चालू न केल्यास येथील नागरिकांची जीवित सुरक्षितता धोक्यात येत असल्याने, शासनाने तत्काळ निर्णय घेणे अत्यावश्यक आहे. इमारत तयार... मग नक्की अडथळा कुठे आहे?, लोकांनी मरत राहावे आणि सरकारने फक्त आश्वासन देत राहावे?, ओतूर परिसरातील गरजू रुग्णालयाच्या प्रतीक्षेत आहे आणि आता लोकांना घोषणांचा नाही, निर्णयांचा आवाज हवा आहे. - शांताराम पानसरे, जेष्ठ नागरिक