कसबा पेठेतील जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालय स्थलांतरास विरोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2026 11:57 IST2026-03-22T11:56:17+5:302026-03-22T11:57:12+5:30

- प्रशासनाने पुनर्विचार करावा, आरोग्य विभागाची मागणी 

pune news opposition to relocation of birth and death registration office in Kasba Peth | कसबा पेठेतील जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालय स्थलांतरास विरोध

कसबा पेठेतील जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालय स्थलांतरास विरोध

पुणे : महापालिकेच्या कसबा पेठ येथील कै. तुकाराम हरिभाऊ जावळे भवन इमारतीमधील जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयासह आरोग्य विभागातील महत्त्वाच्या कार्यालयांचा स्थलांतर करण्याच्या निर्णय प्रशासनाने घेतला आहे. या प्रस्तावित स्थलांतर करण्याच्या निर्णयाला काही विरोधी पक्षांसह, राजकीय प्रतिनीधी व सामान्य नागरिकांकडून विरोध होत आहे. आता महापालिकेच्या आरोग्य विभागानेही प्रशासनाने या निर्णयाचा पुनर्विचार करावा, अशी मागणी आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे.

महापालिका प्रशासनाने कसबा पेठ क्षेत्रीय कार्यालयातील विविध विभाग पर्यायी ठिकाणी स्थलांतरित करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. मात्र, या ठिकाणी २००४-०५ सालापासून जन्म-मृत्यू नोंदणी विभाग, मेट्रोपॉलिटन सर्व्हेलन्स युनिट आणि कीटक प्रतिबंधक विभाग असे तीन अत्यावश्यक विभाग कार्यरत आहेत. हे सर्व विभाग शहराच्या आरोग्य व्यवस्थेसाठी महत्त्वपूर्ण आहेत.

तळमजल्यावर असलेल्या जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयात १९५० सालापासून २०१९ पर्यंतच्या कालावधीतील सुमारे दीड ते दोन हजार हस्तलिखित रजिस्टर जतन करण्यात आले आहेत. यामध्ये समाविष्ट ३४ गावांच्या नोंदींचाही समावेश आहे. या कार्यालयात दररोज शेकडो नागरिक विविध अर्जांसाठी येत आहेत. येथील कार्यालयात संपूर्ण शहरातील दवाखाने, क्षेत्रीय कार्यालये, नागरी सुविधा केंद्रे आणि मयत पास केंद्रांना आवश्यक स्टेशनरी याच कार्यालयातून वितरित केली जाते.

इमारतीच्या पहिल्या मजल्यावर जन्म-मृत्यू दुरुस्ती अर्ज स्वीकारणे, जुने डेटा एन्ट्री, चौकशी कक्ष यांसारख्या सेवा दिल्या जातात. येथे दररोज ८० ते १०० नागरिक दुरुस्ती अर्जासाठी येतात. दुसऱ्या मजल्यावर वैद्यकीय अधिकारी कार्यालय, संगणकीय दुरुस्ती कक्ष तसेच मेट्रोपॉलिटन सर्व्हेलन्स युनिटचे शहरभरातील अहवाल सादर करण्याचे काम चालते. जन्म-मृत्यू बारनिशी कक्षातून जन्म मृत्यू नोंदणी माहिती अर्ज, माहिती अधिकार अर्ज, पासपोर्ट अर्ज, पोलिस व इतर शासकीय पत्रे या कक्षाकडून केली जातात. जन्म-मृत्यू अर्जावरील दुरुस्ती या ठिकाणी संगणकीय प्रणालीद्वारे केली जाते. तिसऱ्या मजल्यावर कीटक प्रतिबंधक विभागाचे कामकाज व प्रशिक्षण कक्ष असून, चौथ्या मजल्यावर कीटक प्रतिबंधक विभागाच्या प्रयोगशाळेचेही कामकाज सुरू आहे.

जन्म-मृत्यू नाेंदणी, दुरुस्ती आणि बारनिशीसारखी महत्त्वाची कार्यालये शहराच्या मध्यवर्ती भागात असल्यामुळे नागरिकांना येथे सहज पोहोचता येते. जन्म-मृत्यू नोंदींसारखी महत्त्वाची कागदपत्रे शोधण्यासाठी शहराच्या विविध भागांतून मोठ्या प्रमाणावर नागरिक येथे येतात. त्यामुळे हे कार्यालय इतरत्र हलविल्यास नागरिकांना मोठ्या प्रमाणात गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे.

तसेच, जन्म-मृत्यू नोंदींसारख्या महत्त्वाच्या अभिलेख्यांचे कायद्यानुसार कायमस्वरूपी जतन करणे आवश्यक आहे. या जुन्या कागदपत्रांचे स्थलांतर करताना एखादा दस्तऐवज गहाळ होणे, फाटणे अथवा खराब होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. अशीही चिंता संबंधित विभाग प्रमुखांकडून व्यक्त करण्यात आली आहे. या निर्णयामुळे दैनंदिन प्रशासकीय कामकाजात विलंब होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे संबंधित अधिकाऱ्यांनी नमूद केले आहे.

या पार्श्वभूमीवर, जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयासह आरोग्य विभागातील सर्व विभागांचे स्थलांतर न करता त्याच ठिकाणी सुरू ठेवावे किंवा वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर स्वतंत्र व प्रशस्त इमारतीची व्यवस्था करावी, अशी विनंती आरोग्य विभागाकडून महापालिका आयुक्तांकडे करण्यात आली आहे.

 

जन्म-मृत्यू नोंदींसारख्या महत्त्वाच्या अभिलेख्यांचे कायद्यानुसार कायमस्वरूपी जतन करणे आवश्यक आहे. या कार्यालयांच्या स्थलांतरणाच्या निर्णयामुळे दैनंदिन प्रशासकीय कामकाजात विलंब होऊ शकतो. याबरोबरच मध्यवर्ती भागत असलेला जन्म-मृत्यू नोंदींसारखा विभागाचे स्थलांतर झाल्यास नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. - डॉ. मनीषा नाईक, उपनिबंधक तथा सहायक आरोग्य अधिकारी, जन्म-मृत्यू नोंदणी विभाग  

 कसबा पेठ येथील कै. तुकाराम हरिभाऊ जावळे भवन इमारतीमधील जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयासह आरोग्य विभागातील महत्त्वाच्या कार्यालयांचे स्थलांतर करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे जन्म-मृत्यू नोंदणीच्या कामासह कीटक प्रतिबंधक विभागाच्या दैनंदिन कामकाजावर परिणाम होणार आहे. त्यामुळे प्रशासनाने निर्णयाचा पुनर्विचार करावा, अशी विनंती आयुक्तांकडे केली आहे. -  डॉ. नीना बोराडे, आरोग्य प्रमुख, महापालिका

Web Title : कसबा पेठ जन्म-मृत्यु पंजीकरण कार्यालय स्थानांतरण का विरोध

Web Summary : पुणे के नागरिकों ने कसबा पेठ जन्म-मृत्यु पंजीकरण कार्यालय के स्थानांतरण का विरोध किया। स्वास्थ्य विभाग को दस्तावेज़ हानि और सार्वजनिक असुविधा का डर है, इस महत्वपूर्ण, केंद्रीय रूप से स्थित सेवा पर पुनर्विचार करने का आग्रह किया।

Web Title : Opposition to Shifting Kasba Peth Birth-Death Registration Office

Web Summary : Pune citizens oppose the relocation of the Kasba Peth birth-death registration office. The health department fears document loss and public inconvenience, urging reconsideration for this vital, centrally located service.