पुणे शहरात पाणी साठणाऱ्या केवळ तीनच ठिकाणांची कामे पूर्ण, वाहतूक पोलिसच परवानगी देईना
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2025 18:05 IST2025-05-24T18:03:57+5:302025-05-24T18:05:27+5:30
- पाच ठिकाणच्या कामांना वाहतूक पोलिसांचीच परवानगी मिळेना; ३१ पैकी १२ ठिकाणची कामे नाहीत सुरू

पुणे शहरात पाणी साठणाऱ्या केवळ तीनच ठिकाणांची कामे पूर्ण, वाहतूक पोलिसच परवानगी देईना
- हिरा सरवदे
पुणे : महापालिकेने पहिल्या टप्प्यात शहरातील ३१ पाणी साठणाऱ्या ठिकाणी दीर्घकालीन उपाय योजना करण्याचे काम हाती घेतले आहे. मात्र, आत्तापर्यंत केवळ तीन ठिकाणचे काम पूर्ण झाले असून, ३१ पैकी १२ ठिकाणची कामे अद्यापही सुरू झालेली नाहीत. विशेष म्हणजे, महापालिकेला पाणी साठवणाऱ्या ठिकाणांची यादी देऊन उपाय योजना करण्याच्या सूचना करणारे वाहतूक पोलिसच पाच ठिकाणी कामे करण्यास परवानगी देत नसल्याचे समोर आले आहे.
शहरातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ७२२ मि.मी. आहे. बदलत्या पर्जन्यमान आणि वाढत्या शहरीकरणामुळे २००५ पासून वार्षिक सरासरी पर्जन्यमान १००० मि.मी.पर्यंत वाढले आहे. नोव्हेंबर २०१५ मध्ये, मुसळधार पावसामुळे धानोरी, विश्रांतवाडी, लोहगाव, टिंगरेनगर या भागात भीषण पूर आला. त्यामुळे मालमत्तेचे मोठे नुकसान झाले. त्यानंतर आंबील ओढा परिसरात अशीच परिस्थिती पाहायला मिळाली.
अतिवृष्टी झाल्यानंतर शहरातील विविध ठिकाणी पाणी साठण्याच्या घटनांमध्ये दरवर्षी वाढ होत आहे. यामुळे शहरातील वाहतुकीचा वेग मंदावून कोंडी होण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे पोलिस प्रशासनाकडून दरवर्षी शहरात पाणी साठणाऱ्या ठिकाणांची यादी महापालिका प्रशासनाला दिली जाते. तसेच सदर ठिकाणी उपाय योजना करण्याच्या सूचना केल्या जातात. शिवाय महापालिका प्रशासनाकडूनही शहरात विविध ठिकाणी पाहणी व सर्व्हे करून पाणी साठणारी ठिकाणे निश्चित केली जातात. तसेच त्या ठिकाणी योग्य त्या उपाय योजना केल्या जातात.
दरम्यान, शहरी पुराचा धोका कमी करण्यासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन योजनांतर्गत निधीचे वाटप केले आहे. हा निधी मिळविण्यासाठी देशातील सात शहरांची निवड केली आहे. त्यात पुणे शहराचा समावेश आहे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून पुणे शहरासाठी पाच वर्षांसाठी २५० कोटी रुपये दिले जाणार आहेत. या निधीतून पूर नियंत्रणासाठी दीर्घकालीन उपाययोजना केल्या जाणार आहेत.
या अनुषंगाने महापालिकेने पहिल्या टप्प्यात दीर्घकालीन उपाय योजना करण्यासाठी शहरातील विविध ३१ ठिकाणी २८ पावसाळी लाइन आणि ५ मोठे कल्व्हर्ट (पूल) बांधण्याचे नियोजन केले आहे. यासाठी निविदा काढून ३० मेपर्यंत सर्व कामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. मात्र, एक एप्रिलपासून आतापर्यंत नऱ्हे येथील पारी कंपनी, खडी मशीन चौक आणि मुंढवा रस्ता (कोद्रे बंगल्याजवळ) अशी केवळ तीन ठिकाणची कामे पूर्ण झाली आहेत. १६ ठिकाणी कामे सुरू असून, १२ ठिकाणांची कामे अद्याप सुरूच झालेली नाहीत.
वाहतूक पोलिस देत नाहीत कामाची एनओसी -
शहरातील रस्ते व चौकांमध्ये पावसाचे पाणी साठल्याने वाहतुकीचा वेग मंदावून कोंडी होते. त्यामुळे वाहतूक पोलिसांकडून दरवर्षी पावसाळ्यापूर्वी महापालिकेला शहरातील पाणी साठणाऱ्या ठिकाणांची यादी दिली जाते. तसेच सदर ठिकाणी उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या जातात. त्यानंतर महापालिकेकडून विविध उपाययोजना केल्या जातात. मात्र, कोंढवा येवलेवाडी येथील गोकुळनगर चौक, हडपसरमधील वैभव थिएटर कॉर्नर, स्वारगेट चौक, बिबवेवाडी रस्त्यावरील पुष्प मंगल कार्यालय आणि आळंदी रस्त्यावरील कळस फाटा या पाच ठिकाणी पावसाळी लाइन टाकण्यासाठी परवानगी (एनओसी) देत नसल्याचे प्रशासनाने दिलेल्या माहितीतून समोर आले आहे.
पाणी साठणाऱ्या ३१ ठिकाणांच्या कामाची काय स्थिती आहे....
- कामे पूर्ण - ३
- कामे सुरू - १
- कामे सुरूच नाहीत - १२
कामे सुरू न होण्याची कारणे ...
- ठेकेदाराने काम सुरूच केले नाही - ४
- मेट्रोच्या कामामुळे काम करणे अशक्य - १
- वाहतूक पोलिस परवानगी देत नाहीत - ५
- विद्युत विभागाचा अडथळा असल्याने - १
- राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कामाचा अडथळा असल्याने - १