कांद्याच्या दरात घसरण; शेतकरी आर्थिक अडचणीत;निर्यातीत घट
By अजित घस्ते | Updated: December 7, 2025 14:30 IST2025-12-07T14:30:21+5:302025-12-07T14:30:43+5:30
एकरी तीन किलो बियाणे लागते. त्यामुळे शेतकऱ्यांना कांदा लागवडीचा खर्चसुद्धा निघत नसल्याने आता कांदा लागवड करणे शेतकऱ्यांना परवडत नाही.

कांद्याच्या दरात घसरण; शेतकरी आर्थिक अडचणीत;निर्यातीत घट
पुणे : कांदा निर्यातीत घट झाली आहे. त्यामुळे देशांतर्गत बाजारात कांदा दरात मोठी घसरण झाली आहे. सध्या दर कोसळल्यामुळे मार्केट यार्ड गुलटेकडी कांदा विभागात दररोज ७० ते ८० ट्रक आवक होत आहे. किलोला केवळ ८ ते १४ रुपये भाव मिळत आहे. उत्पादनाच्या २५ टक्के जादा कांद्याची बाजारात साठवणूक झाल्याने भावात मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे.
त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. शासनाने तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. कांद्याचा लागवडीचा हंगाम हा १५ नोव्हेंबर ते १५ जानेवारी असतो. मात्र, यंदा ऑक्टोबरच्या शेवटच्या आणि नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात पाऊस झाल्यामुळे कांदा रोपांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे लागवडीसाठी रोपांचा तुटवडा जाणवत आहे. कांदा बियाणांचे दर प्रतिकिलो २५०० ते ३००० रुपये आहेत. एकरी तीन किलो बियाणे लागते. त्यामुळे शेतकऱ्यांना कांदा लागवडीचा खर्चसुद्धा निघत नसल्याने आता कांदा लागवड करणे शेतकऱ्यांना परवडत नाही.
पावसाचा फटका
अतिवृष्टी, अवकाळी पावसामुळे कांदा मोठ्या प्रमाणात खराब झाला आहे. सोलापूर जिल्ह्यासह अनेक ठिकाणी खरीप आणि लेट खरीप पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांनी लाखो रुपये खर्च करून पिकविलेला कांदा मातीमोल झाला आहे. पुणे जिल्ह्यात जुन्नर परिसरातील ५०० हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरील कांद्याचे नुकसान झाले आहे.
कांद्याच्या भावात घसरण
सध्या कांद्याचे दर कमी असून, काढणीनंतर जेव्हा कांदा विक्रीसाठी बाजारात येतो, तेव्हा अनेक वेळा बाजारभावात खूप घसरण होते. यामुळे शेतकऱ्यांना लागवडीचा खर्चही मिळणे कठीण झाले आहे. यापूर्वी काही ठिकाणी दोन महिन्यांपूर्वी ४० रुपये किलो असलेला कांद्याचा दर सध्या ८ ते १४ रुपये प्रतिकिलोवर आला आहे.
निर्यातीच्या धोरणामुळे नुकसान
निर्यातीतील अनिश्चित धोरणांमुळे आणि निर्यातबंदीमुळेही कांद्याचे भाव घसरले आहेत. ज्यामुळे साठवून ठेवलेला उन्हाळी कांदा आणि येणाऱ्या नवीन कांद्याला भाव मिळत नाही. त्यामुळे उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.
सध्या बाजारात खेड, जुन्नर, आंबेगाव, कोपरगाव या भागांतून कांद्याची मार्केट यार्डमध्ये आवक होत आहे. दररोज ८० ट्रकची आवक होत आहे. मात्र, भाव पडले आहेत. सध्या केवळ ८ ते १४ रुपये प्रतिकिलो कांद्याला भाव मिळत आहे. शेतकरी आणि व्यापाऱ्यांकडे कांदा साठवणूक मोठी झाली आहे. त्यात नवीन कांद्याची आवकही सुरू आहे. आणखीन ३ महिने तरी कांद्याच्या भावात दरवाढ होणार नाही. - अप्पा कोरपे, कांदा व्यापारी