Pune News : दररोज दहा लाख गणेशभक्तांची गर्दी होणार; शहर अन् जिल्ह्यात मद्य विक्री बंदी आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2025 10:28 IST2025-08-26T10:24:17+5:302025-08-26T10:28:40+5:30

७ ते ८ लाख गणेशभक्त मेट्रोने येण्याची शक्यता असल्याने मेट्रो स्थानकावर तगडा बंदोबस्त राहणार; २७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबरपर्यंत शहर व जिल्ह्यात मद्य विक्री राहणार बंद

pune news One million Ganesh devotees will throng the city every day; Order to ban sale of liquor in the city and district | Pune News : दररोज दहा लाख गणेशभक्तांची गर्दी होणार; शहर अन् जिल्ह्यात मद्य विक्री बंदी आदेश

Pune News : दररोज दहा लाख गणेशभक्तांची गर्दी होणार; शहर अन् जिल्ह्यात मद्य विक्री बंदी आदेश

पुणे : पुणे शहरातील मेट्रोचा विस्तार स्वारगेटपर्यंत झाला असून कसबा पेठ व मंडई हे दोन मेट्रो स्टेशन मध्यवस्तीत येतात. या स्थानकावर दररोज ७ ते ८ लाख गणेशभक्त येण्याची शक्यता आहे. त्यातून गर्दीच्या वेळी कोणतीही दुर्घटना होऊ नये, यासाठी गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहे. मेट्रो स्थानकावर मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता गृहीत धरता अतिरिक्त मनुष्यबळ पुरवण्यात येत असल्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी पुणे पोलिस दलाकडून घेण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती पत्रकार परिषदेत दिली. यावेळी पोलिस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलिस आयुक्त मनोज पाटील, राजेश बनसोडे, पंकज देशमुख, उपायुक्त संदीप भाजीभाकरे आदी वरिष्ठ पोलिस अधिकारी उपस्थित होते.

पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले की, गेल्यावर्षी मेट्रोचा विस्तार शिवाजीनगर कोर्टापर्यंत होता. तेव्हा गणेशोत्सवाच्या काळात दररोज लाख असणारी मेट्रोची प्रवासी संख्या वाढून ३ लाख झाली होती. आता कोर्टापासून स्वारगेटपर्यंत मेट्रोचा विस्तार झाला आहे. कसबा व मंडई ही दोन नवीन स्थानके मध्यवस्तीत आली आहेत. या स्थानकांवर गणेशभक्त मोठ्या संख्येने येण्याची शक्यता आहे. त्यामुळे गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी उपाययोजनांची आखणी करण्यात येत आहे. अधिकाऱ्यांसोबत सविस्तर चर्चा करून उपाययोजना आखण्यात आली.

ध्वनिक्षेपक...
जिल्हाधिकारी डुडी यांच्याकडून ध्वनिक्षेपक व ध्वनीवर्धकास ३० ऑगस्ट ते ४ सप्टेंबर आणि ६ सप्टेंबर असे ७दिवस-रात्री १२ पर्यंत परवानगी देण्यात आली आहे.

मद्य विक्री बंदी आदेश..
पुणे शहरातील गणेशोत्सवानिमित्त सार्वजनिक शांतता अबाधित ठेवण्याच्या दृष्टीने २७ ऑगस्ट व ६ सप्टेंबर रोजी संपूर्ण पुणे जिल्ह्यात सर्व प्रकारच्या मद्यविक्री बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे.

बंदोबस्त मनुष्यबळ...
गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणुकीसाठी ६ व ७ सप्टेंबर २०२५ रोजी पुणे पोलिस आयुक्तांतर्गत पोलिस आयुक्तासह सह पोलिस आयुक्त, सर्व अपर पोलिस आयुक्त, तसेच १० पोलिस उपायुक्त, २७ सहायक पोलिस आयुक्त, १५४ पोलिस निरीक्षक, ६१८ सहायक पोलिस निरीक्षक/उपनिरीक्षक, ६२८६ अंमलदार, १६ स्ट्रायकिंग, १४ क्युआरटी हिट, ७ बीडीडीएस पथके, ११०० होमगार्ड व १ एसआरपीएफ कंपनी असा बंदोबस्त लावण्यात आला आहे.

विसर्जनाचेही नियोजन
पहिल्या दोन-तीन दिवसांत येथे येणारे व जाणारे यांच्या संख्येवरून नेमका अंदाज येईल. त्यावरून पुढील दिवसांमध्ये आणखी काय नियोजन करायचे हे निश्चित करण्यात येणार आहे. याशिवाय शेवटच्या दिवशी विसर्जन मिरवणुक पाहण्यासाठी लक्ष्मी रस्त्यावर प्रचंड गर्दी होते, त्यामुळे बेलबाग चौकाच्या आधीपासून ते थेट अलका टॉकीज चौक आणि विसर्जन ठिकाणावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले.

गुन्हे प्रतिबंधासाठी उपाययोजना...
गणपती मंडळांची आरास पाहण्यासाठी येणाऱ्या भाविकांच्या गर्दीमुळे चोऱ्या होण्याची शक्यता अधिक असते. गुन्हे प्रतिबंधासाठी पथके नेमण्यात आली आहेत. अॅन्टी चेन स्नॅचिंग पथक, वाहनचोरी विरोधी पथक, मोबाइल चोरीविरोधी पथक, महिला व बाल सुरक्षा (छेडछाड विरोधी) पथक अशी पथके नेमण्यात आली असून, गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे यांच्या अधिपत्याखाली १ सहायक पोलिस आयुक्त, ६ पोलिस निरीक्षक, ३२ सहायक पोलिस निरीक्षक / पोलिस उपनिरीक्षक, २५३ पोलिस अंमलदार यांची नेमणूक करण्यात आली आहे.


इतर उपाय योजना...
मध्य वस्तीत २० ठिकाणी वॉच टॉवर उभारून त्या ठिकाणी पोलिस बंदोबस्त परिमंडळीय स्तरावर पेट्रोलिंग, विभागीय स्तरावर पेट्रोलिंग, पोलिस ठाणे स्तरावर पेट्रोलिंग, चौकी स्तरावर पेट्रोलिंग महत्त्वाच्या गणपती मंडळाचे गर्दीच्या ठिकाणी पोलिस मदत केंद्र दंगाकाबुच्या अनुषंगाने पोलिस स्टेशनस्तरावर एकूण ३९ बैठका, प्रात्यक्षिके घेण्यात आली आहेत. 

Web Title: pune news One million Ganesh devotees will throng the city every day; Order to ban sale of liquor in the city and district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.