फक्त एका फोनमुळे वाद, मारहाण, अन्...; मोबाईल वापरल्याच्या वादातून झालेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2025 16:27 IST2025-07-30T16:27:14+5:302025-07-30T16:27:41+5:30
- पसार झालेले आरोपी गजानन आणि महारुद्र यांना अटक केली. चौकशीत देवा याने न विचारता मोबाईल वापरल्याने त्याला बेदम मारहाण करुन खून केल्याची कबुली दिली.

फक्त एका फोनमुळे वाद, मारहाण, अन्...; मोबाईल वापरल्याच्या वादातून झालेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू
पुणे : न विचारता मोबाईल वापरल्याने वाद झाला. या वादातून झालेल्या बेदम मारहाणीत त्याचा खून झाला. ही घटना सिंहगड रोडवरील धायरी परिसरात घडली. गुन्हा घडल्यानंतर तीन तासात नांदेड सिटी पोलिसांनी पसार झालेल्या कंपनीतील दोन कामगारांना अटक केली.
देवा उर्फ देवीदास पालते (२५, रा. तागयाल, ता. मुखेड, जि. नांदेड) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी कंपनीतील कामगार गजानन हरिश्चंद्र राठोड (३२, रा. आडगाव, ता. पुसद, जि. यवतमाळ) आणि रुद्र शिवाजी गवते (२७, रा. साईधाम, त्रिनेत्र इंजिनिअरिंगजवळ, धायरी, सिंहगड रोड) यांना अटक करण्यात आली. दिनेश राठोड अद्याप फरार आहे. पालते, राठोड, गवते हे कामगार आहेत. सध्या तिघेजण धायरीत राहायला आहेत. देवा याने आरोपी गजानन याचा मोबाईल न विचारात वापरल्याने त्यांच्यात वाद झाला.
गजानन आणि त्याचा साथीदार महारुद्र यांनी त्याला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. मारहाणीत तो गंभीर जखमी झाला. जखमी अवस्थेतील देवाला एकटे सोडून आरोपी गजानन आणि महारुद्र यांनी पळ काढला. या घटनेची माहिती नांदेड सिटी पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचारी शिवा क्षीरसागर यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन गंभीर जखमी अवस्थेतील देवाला रुग्णालयात दाखल केले. उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी सांगितले.
त्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. पसार झालेले आरोपी गजानन आणि महारुद्र यांना अटक केली. चौकशीत देवा याने न विचारता मोबाईल वापरल्याने त्याला बेदम मारहाण करुन खून केल्याची कबुली दिली. परिमंडळ ३ चे पोलिस उपायुक्त संभाजी कदम, सहायक आयुक्त अजय परमार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक अतुल भोस, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक गुरुदत्त मोरे, सहायक निरीक्षक राहुल यादव, प्रवीण जाधव, संग्राम शिनगारे, राजू वेगरे, प्रतीक मोरे, स्वप्नील मगर, मोहन मिसाळ, शिवा क्षीरसागर, भीमराज गांगुर्डे, उत्तम शिंदे आणि निलेश कुलथे यांनी ही कामगिरी केली.