बापरे..! मेलेल्या माणसांनी स्वत:च केला अर्ज; वाघोलीत बोगस अर्जाचा पर्दाफाश
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2025 12:49 IST2025-11-08T12:49:10+5:302025-11-08T12:49:41+5:30
- मतदार यादीतून नाव कमी करण्यासाठी आले ३६ अर्ज त्यातील दोन हयात नाहीच

बापरे..! मेलेल्या माणसांनी स्वत:च केला अर्ज; वाघोलीत बोगस अर्जाचा पर्दाफाश
वाघोली : वाघोलीतील (ता. हवेली) सातव नामक मतदार गावठाणात राहणारे व वर्षानुवर्ष मतदान करणाऱ्या ३८ मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यासाठी निवडणूक अधिकारी यांच्याकडे अर्ज करण्यात आला. हा अर्ज त्यांनी स्वतःहून केल्याचे दाखविण्यात आले आहे. मात्र, प्रत्यक्ष त्यातील एकाही मतदाराने असा अर्ज केलेला नाही. धक्कादायक बाब म्हणजे दोन व्यक्ती मयत असणाऱ्या मतदारांनाही स्वतःहून अर्ज केल्याचे दाखविण्यात आले आहे.
वाघोलीतील भाग क्रमांक ३१४ गावठाण मधील हे मतदार आहेत. वाघोली बूथ अधिकारी हे त्या अर्जाची छाननी करण्यासाठी मतदारापर्यंत पोहोचल्यानंतर ही धक्कादायक बाब उघडकीस आली. शिरूर निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे हे अर्ज प्राप्त झाल्यानंतर ती नावे वगळण्यासाठी बीएलओकडे तपासणीसाठी ३८ मतदाराच्या नावांची यादी आली होती. या यादीत मतदारांनीच त्यांची स्वतःची नावे वगळण्यासाठी अर्ज केल्याचे दाखविण्यात आले आहे.
यामध्ये दोन मयत नावांचाही समावेश आहे. मयत उमेदवार यांनी तहसील कार्यालयात चालत जाऊन स्वतः हा अर्ज केला का? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. आज जाणूनबुजून केलेला प्रकार असून असा बोगस प्रकार करणाऱ्या दोषींवर कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी या मतदारांनी केली आहे.
या यादीबाबत पाहणी करून त्याची चौकशी करून काय प्रकार आहे ते पाहावा लागेल. एका भागातील नावे दुसऱ्या भागात समाविष्ट करण्यासाठी अर्ज केला आहे का? तो कोणी केला हे तपासावे लागेल. - बाळासाहेब म्हस्के, तहसीलदार, तथा निवडणूक निर्णय अधिकारी, शिरूर
मी माझे नाव यादीतून वगळण्यासाठी अर्ज केला नाही. अर्जामध्ये माझ्या कुटुंबातील सदस्यांचीही नावे त्यात आहेत. हा सर्व बोगस प्रकार आहे. त्याची चौकशी करून कारवाई करावी. - अतुल शिंदे, मतदार,वाघोली
हा सर्व बोगस प्रकार आहे. कोणीतरी जाणून बुजून हा प्रकार केला आहे. आम्ही वर्षानुवर्ष मतदार असताना आमची नावे कशाला वगळू. - नारायण जाधव, मतदार, वाघोली