आता दूध देखील दाेन रुपयांनी महाग; दुधाच्या दरात दरवाढ लागू
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2025 12:31 IST2025-03-16T12:30:45+5:302025-03-16T12:31:38+5:30
- दूध उत्पादक शेतकऱ्यांना ग्रामीण भागात योग्य दर मिळत नसल्याने शेतकरी व ग्राहक नाराजी व्यक्त

आता दूध देखील दाेन रुपयांनी महाग; दुधाच्या दरात दरवाढ लागू
पुणे : महागाईच्या झळा सामान्यांना बसत असून, दुधाच्या दरातही दोन रुपयांनी वाढ झाली आहे. सामान्य ग्राहकांना याचा फटका बसणार आहे. यामुळे कडक उन्हाळ्यात प्रतिलिटर गायीच्या दुधाला ५८ रुपये, तर म्हशीच्या दुधाला ७४ रुपये मोजावे लागणार आहे. यामुळे सामान्यांना याची झळ सोसावी लागत आहे. यामुळे ग्राहकांच्याकडून प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे, तर दूध उत्पादक शेतकऱ्यांना ग्रामीण भागात योग्य दर मिळत नसल्याने शेतकरी व ग्राहक नाराजी व्यक्त करीत आहेत.
दूध उत्पादक व प्रक्रिया कल्याणकारी संघाच्या सभासदांची बैठक पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित, कात्रज डेअरीत पार पडली. या बैठकीत दूध दरवाढीबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. दूध उत्पादक संघाकडून गाय आणि म्हैस या दोन्हींच्या दूध दरात दोन रुपये प्रतिलिटर इतकी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पूर्वीचे दर - वाढीव दर
गायीचे दूध - ५४ ते ५६ - ५६ ते ५८
म्हशीचे दूध - ७० ते ७२ - ७२ ते ७४
उन्हाळ्यातील चारा आणि पाणीटंचाईमुळे दूध उत्पादन खर्चात वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अधिकचा भाव देण्यासाठी दूध दरवाढ करावी लागली. तसेच पनीरमधील भेसळ आणि शेतकऱ्यांचे थकीत अनुदान लवकर मिळण्यासाठी दुग्ध व्यवसाय विकासमंत्री आणि आयुक्त यांची भेट घेणार आहे. - प्रकाश कुतवळ, सचिव, दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघ
जीवनावश्यक वस्तूमध्ये दूध येते. रोजच्या वापरातील आणि लहान मुलांना उपयुक्त असणारे दूध किमती वाढतच आहे. त्यामुळे सरकारने दूध वाढविणाऱ्या संघ सोसायटीवर अंकुश ठेवणे गरजेचे आहे. दूध महाग झाले तरी घ्यावे लागते. यामुळे दुधाचे दर नियंत्रणात असावेत. - मंगल मोहिते, गृहिणी
दुधाच्या दरात वारंवार वाढ होत आहे. मात्र, उन्हाळ्याच्या तडाख्यात फ्रीजमध्ये दूध ठेवणे आणि लाईट बिल यातून दूध विक्री परवडत नाही. त्यात एक रुपयांचं मिळत असल्याने दुधापेक्षा वीज बिल जादा येत आहे. - रेखा खोसे, दुकानदार