रस्ता नव्हे, मृत्यूचा सापळा.. याला जबाबदार कोण ? तुकाईदर्शन–काळेपडळ रस्ता दुरवस्थेच्या विळख्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2025 13:04 IST2025-08-30T12:23:52+5:302025-08-30T13:04:34+5:30

ठिकठिकाणी रस्त्यांवर मोठे खड्डे पडले आहेत. अनेक चेंबरची झाकणे तुटलेली असल्याने ते चुकवण्याच्या नादात अनेक दुचाकीस्वार घसरून पडत आहेत.

pune news not a road, but a death trap Who is responsible for this | रस्ता नव्हे, मृत्यूचा सापळा.. याला जबाबदार कोण ? तुकाईदर्शन–काळेपडळ रस्ता दुरवस्थेच्या विळख्यात

रस्ता नव्हे, मृत्यूचा सापळा.. याला जबाबदार कोण ? तुकाईदर्शन–काळेपडळ रस्ता दुरवस्थेच्या विळख्यात

फुरसुंगी : तुकाईदर्शन काळेपडळ रस्त्याच्या दुरवस्थेमुळे अनेक अपघात होत असून, वाहतुकीची कोंडी होत आहे. पुणे मनपाकडून या रस्त्याच्या ड्रेनेज लाइनदुरुस्तीचे काम करण्यात आले; परंतु निविदेमधील निर्देश न पाळता हलक्या दर्जाचे काँक्रीट वापरून रस्त्याची डागडुजी करण्यात आली. यामुळे जिथे ड्रेनेज लाइनचे काम झाले आहे, तिथे ठिकठिकाणी रस्त्यांवर मोठे खड्डे पडले आहेत. अनेक चेंबरची झाकणे तुटलेली असल्याने ते चुकवण्याच्या नादात अनेक दुचाकीस्वार घसरून पडत आहेत.

या रस्त्याने पुणे मनपा पाणीपुरवठा विभागाच्या टँकरने पाणी वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असते. अधिकच्या फेऱ्या मारण्याच्या हेतूने टँकरचा वेगही अधिकच असतो; यामुळे मोठा अपघात होण्याची प्रशासन वाट बघत आहे की काय, असा प्रश्न स्थानिक नागरिकांमध्ये पडत आहे. मुळात या रस्त्याची पूर्ण डागडुजी होणे अपेक्षित आहे. मात्र तुकाईदर्शन हा भाग पुणे मनपामधून वगळल्यामुळे जाणूनबुजून या रस्त्याच्या कामासाठी निधी खर्च करण्यास पुणे मनपा पथ विभागाचे अधिकारी असमर्थता दाखवतात. या रस्त्याचा अधिकचा वापर हा काळेपडळ, ससाणेनगर येथील नागरिकच करत असतात. 

फुरसुंगी-उरुळी देवाची नगरपरिषदेचा कारभार सुरळीत होईपर्यंत आवश्यक असणाऱ्या सुविधा पुरवण्याची जबाबदारी शासनाने पुणे महापालिका यांच्याकडे दिलेली असताना, पुणे महापालिकेचे अधिकारी हा विषय गांभीर्याने घेणार नसतील तर, महापालिकेचे पाणी वाहतूक करणारे टँकर, घनकचरा व्यवस्थापन करणाऱ्या कचरागाड्या या रस्त्यावरून फिरू देणार नाही, असा इशारा तुकाईदर्शन येथील सामाजिक कार्यकर्ते प्रवीण आटोळे यांनी प्रशासनास दिला आहे.

Web Title: pune news not a road, but a death trap Who is responsible for this

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.