ध्वनी प्रदूषण कायदा सर्वांसाठी समान; भोंगेमुक्त पुण्यासाठी किरीट सोमय्यांचा पुढाकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2025 18:54 IST2025-08-03T18:54:08+5:302025-08-03T18:54:31+5:30
भोंगेमुक्त महाराष्ट्रासाठी पुढाकार घेतलेल्या भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज पुण्यातील पोलीस आयुक्तांची भेट घेतली.

ध्वनी प्रदूषण कायदा सर्वांसाठी समान; भोंगेमुक्त पुण्यासाठी किरीट सोमय्यांचा पुढाकार
पुणे - भोंगेमुक्त महाराष्ट्रासाठी पुढाकार घेतलेल्या भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज पुण्यातील पोलीस आयुक्तांची भेट घेतली. मुंबई उच्च न्यायालय आणि मुख्यमंत्री यांच्या आदेशानुसार भोंगेमुक्त मोहिमेची अंमलबजावणी संपूर्ण राज्यभर करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून पुण्यातील यंत्रणेला सक्रिय करण्यासाठी सोमय्या आज पुण्यात आले. मुंबई आणि ठाण्यात जशी अंमलबजावणी झाली, तशीच पुण्यातही व्हावी यासाठी मी पुण्याच्या पोलीस आयुक्तांना आणि सर्व पोलीस ठाण्यांना पत्र पाठवले आहे. असे सोमय्या यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
ते पुढे म्हणाले,पुण्यातील एका भागात १४ मशिदी असून तिथे मोठ्या प्रमाणावर भोंगे लावण्यात आले आहेत. दिवसातून पाच वेळा नमाज पठणासाठी मोठ्या आवाजात भोंगे वाजवले जातात. यामुळे ध्वनी प्रदूषण होते आणि कायद्याचा भंग होतो. ध्वनी प्रदूषण कायदा सर्वांसाठी समान आहे. काही राजकीय नेते केवळ मशिदींवर भोंगे लावून दादागिरी करत आहेत. गेली २४ वर्ष ही दादागिरी सुरू आहे. राज्यात अनेक ठिकाणी कारवाई सुरू आहे पण अजूनही काही ठिकाणी अंमलबजावणीत अडथळे आहेत असेही ते म्हणाले.
संभाजीनगरात सध्या ७० टक्के भोंगे उतरवण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच, अनेक मंदिरांमधूनही भोंगे खाली घेतले गेले आहेत आणि डीजे वाजवण्यावरही हळूहळू कायद्याप्रमाणे निर्बंध आणले जात आहेत. हा विषय राजकीय नाही, तर कायद्याच्या अंमलबजावणीचा आहे. मी स्वतः ही जबाबदारी घेतली असून संपूर्ण राज्यभर फिरत आहे. विधानसभेतही अनेक आमदारांनी या विषयावर आवाज उठवला आहे असे सांगून पुणे पोलिसांनी मुंबईसारखा आदर्श ठेवावा अशी अपेक्षा सोमय्यांनी व्यक्त केली.