नव्या चाचणी पद्धतीचा फटका; पक्क्या लायसन्ससाठी वेटिंग वाढले
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 10:19 IST2025-12-25T10:16:26+5:302025-12-25T10:19:16+5:30
शहरात वाहन परवाना काढणाऱ्यांची संख्याही लक्षणीय आहे. पुणे आरटीओत दररोज सुमारे पाचशेहून अधिक लर्निंग लायसन्स जारी होतात.

नव्या चाचणी पद्धतीचा फटका; पक्क्या लायसन्ससाठी वेटिंग वाढले
पुणे : परिवहन विभागाने वाहन चालवण्याच्या चाचणीचे नियम अधिक कडक केले आहे. त्यामुळे पुणे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून (आरटीओ) पक्क्या वाहनचालक परवान्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर चाचण्या घेतल्या जात आहेत. मात्र, नव्या मार्गदर्शक सूचनांमुळे पक्क्या लायसन्ससाठी उपलब्ध असलेले चाचणी स्लॉट जवळपास निम्म्याने कमी झाले आहे. परिणामी, पक्क्या लायसन्ससाठी अपॉइंटमेंटचे वेटिंग वाढले असून, अनेकांना चाचणीसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे.
शहरात वाहन परवाना काढणाऱ्यांची संख्याही लक्षणीय आहे. पुणे आरटीओत दररोज सुमारे पाचशेहून अधिक लर्निंग लायसन्स जारी होतात. लर्निंग लायसन्सची परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर एका महिन्यानंतर उमेदवारांना प्रत्यक्ष वाहनचालक चाचणी द्यावी लागते. दुचाकींसाठी आळंदी रस्त्यावरील आरटीओ कार्यालयात, तर चारचाकी वाहनांसाठी आयडीटीआर येथे चाचणी घेतली जाते. या दोन्ही चाचण्यांसाठी ऑनलाइन अपॉइंटमेंट अनिवार्य आहे. दरम्यान, दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी पुण्यात नव्याने तीन स्वयंचलित वाहन चाचणी केंद्रे उभारण्याचे नियोजन आहे. मात्र, तोपर्यंत सध्या सुरू असलेल्या चाचणी केंद्रांवर अधिकाऱ्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत व कॅमेऱ्यासमोरच चाचण्या घेण्याच्या सूचना परिवहन विभागाने दिल्या आहेत. प्रत्येक चाचणीसाठी ठरावीक वेळ, नियमांचे काटेकोर पालन आणि संपूर्ण प्रक्रिया रेकॉर्ड होणे बंधनकारक करण्यात आले आहे.
चाचणी क्षमतेवर मर्यादा
या नव्या पद्धतीमुळे पुणे आरटीओकडील चाचणी क्षमतेवर मर्यादा आल्या आहेत. पूर्वी दररोज साधारण ७०० ते ८०० पक्क्या लायसन्सचे स्लॉट उपलब्ध होते. मात्र, सध्या ही संख्या घटून सुमारे ३५० पर्यंत आली आहे. त्यामुळे लर्निंग लायसन्स काढलेल्या उमेदवारांना वेळेत स्लॉट मिळणे कठीण झाले आहे. ऑनलाइन बुकिंग सुरू होताच काही मिनिटांत स्लॉट संपत असल्याने अनेक उमेदवारांमध्ये वेटिंगमध्ये राहावे लागत आहे.
परिवहन विभागाच्या आदेशानुसार पक्क्या लायसन्सच्या चाचण्या नव्या नियमांनुसार घेतल्या जात आहेत. सध्या ही प्रक्रिया प्रायोगिक तत्त्वावर सुरू असल्याने स्लॉटची संख्या मर्यादित आहे. मात्र, २९ डिसेंबरपासून दररोज सुमारे ५०० स्लॉट उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. नागरिकांच्या सोयीसाठी सकाळी ६ ते सायंकाळी ४ या वेळेत स्लॉट बुकिंगची सुविधा देण्यात आली असून, ज्यांचे लर्निंग लायसन्सची मुदत संपण्याच्या जवळ आहे, अशा उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार आहे. - स्वप्नील भोसले, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे