स्टंटबाजी करणाऱ्या पिकअप वाहन चालकाने घेतला दुचाकीस्वाराचा जीव
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2025 16:55 IST2025-07-30T16:53:39+5:302025-07-30T16:55:06+5:30
अपघात करून पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या पिकअप चालकाला रुग्णवाहिका चालकाने पाठलाग करून पकडले.

स्टंटबाजी करणाऱ्या पिकअप वाहन चालकाने घेतला दुचाकीस्वाराचा जीव
नारायणगाव : स्टंटबाजी करत पिकअप वाहन चालविणाऱ्या वाहनचालकामुळे दुचाकीस्वाराचा जागेवरच मृत्यू झाला तर पत्नी जखमी झाली आहे. ही घटना मंगळवारी (दि. २९) जुन्नर - नारायणगाव रस्त्यावरील कुरणजवळ घडली. दरम्यान, अपघात करून पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या पिकअप चालकाला रुग्णवाहिका चालकाने पाठलाग करून पकडले.
या अपघातात बादशाह तलाव येथील दुचाकीस्वार अमजद पीरखान पठाण वय (४८) हे मृत्युमुखी पडले तर त्यांच्या पत्नी रुकसाना अमजद पठाण या अपघातात जखमी झाल्या आहेत. याबाबत अधिक माहिती अशी, अमजद पठाण हे पत्नीसमवेत मंचरवरून मुलाच्या शस्त्रक्रियेसाठी कागदपत्रे घेऊन परतत होते. पिकअप वाहन जुन्नरहून नारायणगावकडे येत होते.
पिकअप वाहनाचा चालक स्टंटबाजी करत रस्त्याने नागमोडी वळणे घेत वाहन चालवत होता तसेच त्याने मद्यप्राशन केले असल्याची शंका या वाहनात मागे बसलेल्या प्रवाशाने व्यक्त केली. अपघात झाल्यानंतर पिकअप वाहन चालक जागेवर न थांबता नारायणगावच्या दिशेने वाहन घेऊन पळून जात होता. रुग्णवाहिका चालक सुनील औटी यांनी नारायणगावजवळ रुग्णवाहिका आडवी घालून या वाहनास अडविले व चालकास पोलिसांच्या ताब्यात दिले. या अपघाताचा पुढील तपास नारायणगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक महादेव शेलार हे करीत आहेत.