पुणे पालिकेची संपर्क कार्यालये बनलीत समस्यांची आगार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2026 17:58 IST2026-02-22T17:56:49+5:302026-02-22T17:58:36+5:30
- समाविष्ट गावांमध्ये सुरू केलेल्या संपर्क कार्यालयांना उतरती कळा, कधी उंदरांचे, तर कधी सापांचे होते दर्शन, खडकवासला येथील कार्यालयात कर्मचाऱ्यांना साधे पिण्याचे पाणीही नाही

पुणे पालिकेची संपर्क कार्यालये बनलीत समस्यांची आगार
- हिरा सरवदे
पुणे : महापालिकेच्या मुख्य इमारतीसह क्षेत्रीय कार्यालयांच्या इमारतीमध्ये फर्निचर, रंगरंगोटीसाठी लाखो रुपये खर्च केले जात असताना महापालिकेने समाविष्ट गावांमध्ये सुरू केलेली संपर्क कार्यालये मात्र समस्याग्रस्त झाल्याचे पाहायला मिळत आहेत. खडकवासला येथील संपर्क कार्यालयात तर विविध प्रकारच्या समस्यांनी मुक्कामच केलेला आहे.
कार्यालयाचे बांधकाम जुने असल्याने येथील कर्मचाऱ्यांना कधी उंदीर, कधी मुंगूस, तर कधी सापांचेही दर्शन होते. आता या गावांना हक्काचे नगरसेवक मिळाले आहेत. आता हे नगरसेवक तरी या समस्या दूर करतात का, हे पाहावे लागणार आहे.

राज्य सरकारने जून २०२१ मध्ये किरकिटवाडी, खडकवासला, नांदेशी, सणसनगरसह २३ गावांचा महापालिका हद्दीत समावेश केला. दुसरीकडे महापालिकेने ग्रामपंचायतींची कार्यालये ताब्यात घेऊन त्याठिकाणी संपर्क कार्यालये सुरू केली आहेत. या इमारतीमध्ये आरोग्य कोटी, कर संकलन केंद्र सुरू केली आहेत. गावांचा समावेश होऊन साडेचार वर्षापेक्षा अधिक काळ गेला तरी ग्रामपंचायतींच्या इमारतींमध्ये काम करणाऱ्या कर्मचारी व अधिकाऱ्यांसाठी साध्या मूलभूत सेवासुविधा सुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेल्या नाहीत.
खडकवासला संपर्क कार्यालयाची इमारत जुनी असल्याने भिंती व छत जीर्ण झाले आहे. महापालिकेने जुन्याच लाकडांचा आधार घेऊन छतावर पत्रा टाकला आहे. मात्र, हे काम योग्य न झाल्याने पावसाळ्यात गळते. त्यामुळे छताचा प्लायवूडचा जागोजागी फुगलेला असून, मोठमोठे बिळे पडलेली आहेत. याठिकाणी ग्रामपंचायतीचे आणि तलाठी कार्यालयाचे जुने साहित्य आणि कागदपत्रांचे गठ्ठे आहेत.

यामुळे या कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना उंदीर, घूस, मुंगूस, तर कधी सापांचे दर्शन होते. त्यामुळे कर्मचाऱ्यांना जीव मुठीत घेऊन काम करावे लागते. याठिकाणी असलेल्या स्वच्छतागृहाची आवस्था दयनीय आहे, पाण्याच्या टाकीला जोडलेला पाईप लिकेज असल्याने भिंतीला शेवाळ आले आहे. कार्यालयाच्या समोरील रस्त्याची उंची जास्त असल्याने पावसाळ्यामध्ये कार्यालयात पाणी शिरते. शिवाय, कार्यालयातील लाइटची व्यवस्थाही जुनी झाल्याने जागोजागी वायरिंग लोंबकळत आहे. ट्यूब, फॅन सुरू करण्याची बटन्स निखळलेली आहेत.
गावांचा महापालिकेत समावेश झाल्यापासून महापालिकेत प्रशासक राज होते. येथील समस्यांचा पाढा वारंवार वरिष्ठांपुढे वाचला. मात्र, त्यावर काहीच कार्यवाही होत नसल्याचे सांगण्यात येते. आता मात्र महापालिकेची निवडणूक होऊन लोकनियुक्त नगरसेवक निवडून आल्याने समाविष्ट गावांना प्रतिनिधित्व मिळाले आहे. त्यामुळे गावांमधील आणि संपर्क कार्यालयांमधील सदस्या दूर होती, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

कर्मचाऱ्यांसाठी नाही पिण्याच्या पाण्याची व्यवस्था -
खडकवासला संपर्क कार्यालयात कर संकलन आणि आरोग्य कोटी आहे. याठिकाणी त्यामुळे येथे चाळीस ते पंचेचाळीस कर्मचाऱ्यांचा राबता असतो. या कर्मचाऱ्यांना याठिकाणी पिण्याच्या पाण्याची सुद्धा सुविधा नाही. त्यामुळे त्यांना घरून येताना पाण्याच्या बाटल्या आणाव्या लागतात. पाणी संपल्यानंतर दुकानातून पाण्याची बाटली विकत घ्यावी लागते.