थाेरल्या काका-पुतण्यांसह खासदार सुप्रिया सुळेंची अदानींवर स्तुतीसुमने; तर अदानींकडून शरद पवारांचे काैतुक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2025 17:46 IST2025-12-28T17:46:02+5:302025-12-28T17:46:27+5:30
बारामती येथे आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, गौतमभाईंनी १९८८ साली शुन्यातून व्यवसायाची सुरुवात केली.

थाेरल्या काका-पुतण्यांसह खासदार सुप्रिया सुळेंची अदानींवर स्तुतीसुमने; तर अदानींकडून शरद पवारांचे काैतुक
बारामती : आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या देशातील पहिल्या अत्याधुनिक महाविद्यालयाचे उद्घाटन बारामतीत उद्योगपती गौतम अदानी यांच्या हस्ते आज झाले. यावेळी उद्योगपती गौतम अदानींवर ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह खासदार सुप्रिया सुळे यांनी स्तुतीसुमनांचा वर्षाव केला.
बारामती येथे आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, गौतमभाईंनी १९८८ साली शुन्यातून व्यवसायाची सुरुवात केली. आज त्यांच्या उद्योग समुहाचे जगातील २० देशांमध्ये कार्य सुरू आहे. ते तीन लाख लोकांना रोजगार देतात. पुढील पाच वर्षांत हा आकडा ५ लाखांवर जाईल. गुजरातमध्ये नापीक जमिनींवर ३० हजार मेगावॅट वीज निर्मितीचे त्यांचे काम सुरू आहे. ५ हजार कोटींची दोन हॉस्पिटल्सही त्यांची सुरू आहेत. यामध्ये श्रीमंतांबरोबरच गरिबांसाठीही आरक्षित बेड आहेत. अदानींचा ‘सीएसआर’ १,००० कोटींचा आहे आणि दोन वर्षांत तो ३,००० कोटींवर पोहोचेल. एखाद्याच्या एका व्हिजन आणि काम करण्याच्या जिद्देनं काय साध्य होऊ शकतं हे त्यांच्या उद्योग समुहाकडे पाहून कळतं, असे उपमुख्यमंत्री पवार यांनी अदानींचे कौतुक केले.
खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, ३० वर्षांपासून पवार आणि अदानी कुटुंबाचे प्रेमाचे नाते आहे. माझ्यासाठी गौतम अदानी आणि त्यांच्या पत्नीचे मोठ्या भावाचे आणि वहिनीचे नाते आहे. चांगली - वाईट प्रत्येक गोष्ट त्यांना मी हक्काने सांगते. तेदेखील हक्काने रागावतात आणि जीव लावतात. त्यांच्या संघर्षाला आम्ही जवळून पाहिले आहे. या यशात त्यांच्या पत्नीचा मोठा वाटा असल्याचे सुळे यांनी कौतुक केले.
ज्येष्ठ नेते शरद पवार म्हणाले, गौतम अदानी यांचे अनेक क्षेत्रांमध्ये मोठे योगदान आहे. सुरुवातीला गुजरातमधून मुंबईला आल्यावर त्यांच्याकडे काही नव्हते. पण, काही तरी उभे करण्याची जिद्द होती. त्यांनी आज लाखो लोकांना रोजगार दिला आहे. त्यांनी समाजहिताच्या अनेक गोष्टी देशात उभ्या केल्या आहेत. त्यांचे कर्तृत्व नव्या पिढीसाठी सांगणे आवश्यक आहे म्हणून त्यांना आज आमंत्रित केले आहे. उद्याचा भारत कसा असेल, याचा विचार अदानींनी मांडला, त्या विचारांनी पुढे गेल्यास देशातील बेरोजगारी हटविण्यात यश मिळेल, अशी माझी खात्री आहे, असे शरद पवार म्हणाले. यावेळी खासदार सुनेत्रा पवार, राजेंद्र पवार, युगेंद्र पवार, आमदार रोहित पवार, विठ्ठल मणियार, नगराध्यक्ष सचिन सातव उपस्थित होते.
राष्ट्रहिताचे धोरण राबविणारा नेता क्वचितच दिसतो -
उद्योजक गौतम अदानी यांनी त्यांच्या भाषणात ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर स्तुतीसुमनांचा वर्षाव केला. अदानी यांनी शरद पवार यांना ‘माय मेंटॉर’ असे संबोधले. अदानी म्हणाले, परिवर्तनाचे प्रतीक म्हणून बारामतीकडे पाहिले जाते. एक नेतृत्व कसे विकास साधू शकते, याचे उदाहरण म्हणून शरद पवार यांच्या कामांना बघितले जाते. कृषिमंत्री पदावर असताना त्यांनी केलेल्या कृषी धोरण, अन्नसुरक्षा कायदा, सहकारी संस्थांचा विकास आणि ग्रामीण अर्थकारणाला चालना देण्याचा प्रयत्न उल्लेखनीय आहे. केंद्रीय मंत्री आणि मुख्यमंत्री पदावर असताना राष्ट्रीय हिताचे धोरण राबविणारा नेता क्वचितच दिसतो. त्यांना सर्व क्षेत्रातील माहिती आहे आणि त्यांनी मोठ्या प्रमाणावर सामाजिक कामे उभारली आहेत, असे अदानी यांनी सांगितले.