रुग्णालयांचे आधुनिकीकरण; कर्करोग उपचार व साथरोग नियंत्रणावर भर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2026 15:37 IST2026-03-10T15:35:58+5:302026-03-10T15:37:02+5:30
- आयुक्तांच्या अंदाजपत्रकात आरोग्य सुविधांना बळकटी

रुग्णालयांचे आधुनिकीकरण; कर्करोग उपचार व साथरोग नियंत्रणावर भर
पुणे :पुणे महापालिकेच्या २०२६-२७ या आर्थिक वर्षांच्या आयुक्तांच्या अर्थसंकल्पात पालिकेच्या रुग्णालयांचे आधुनिकीकरण करण्याबरोबरच सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेच्या सक्षम करण्यावर भर देण्यात आला आहे. कर्करोग उपचार सुविधा, साथरोग नियंत्रणासाठी अत्याधुनिक यंत्रणा उभारणी गरीब व गरजू नागरिकांना परवडणाऱ्या उपचार सेवा याचा बजेटमध्ये समावेश आहे.
पुणे महापालिकेच्या बजेटमध्ये आरोग्य विभागासाठी ८८१ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. गेल्यावर्षी आरोग्यावर ५६९ कोटींची तरतूद करण्यात आली होती. गेल्यावर्षीच्या तुलनेत आरोग्य विभागासाठी ३१२ कोटींची जादा तरतूद करण्यात आली आहे. कमला नेहरू रुग्णालयात अत्याधुनिक शस्त्रक्रिया कक्ष, वैद्यकीय उपकरणे, तज्ज्ञ डॉक्टरांची उपलब्धता, तसेच अतिदक्षता विभागाच्या सुविधांचा विस्तार केला जाणार आहे. यासोबतच अण्णासाहेब मगर रुग्णालयाच्या नवीन इमारतीसाठी व सेवा विस्तारासाठी ५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. इतर रुग्णालयांचेही टप्प्याटप्प्याने आधुनिकीकरण करण्याचे नियोजन आहे.
गरीब व गरजू नागरिकांसाठी महापालिकेमार्फत शहरी गरीब वैद्यकीय साहाय्य योजना राबविण्यात येत असून, त्यासाठी १२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच मनपाचे अधिकारी, कर्मचारी व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय सुविधांसाठी १३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
बाणेर येथे नवे कर्करोग रुग्णालय उभारणार
कर्करोगाच्या उपचारासाठी बाणेर येथे नवीन कर्करोग रुग्णालय उभारण्याचा प्रस्ताव आहे. येथे लिनिअर एक्सलेरेटरद्वारे रेडिओथेरपी उपचार सुविधा सीजीएचएस दराने उपलब्ध होणार आहेत. तसेच स्वारगेट येथील स्व. बसंतदादा पाटील प्रशिक्षण केंद्रात पेट-स्कॅन सुविधा उपलब्ध करण्यासाठी इमारत उपलब्ध करून देण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी अंदाजपत्रकात ८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती.
साथरोग नियंत्रणासाठी अत्याधुनिक प्रयोगशाळा
साथरोग नियंत्रणासाठी केंद्र सरकारच्या पीएम-एबीएचआयएम योजनेअंतर्गत शहराची निवड करण्यात आली आहे. कसबा पेठ येथील जावळे भवन येथे मेट्रोपॉलिटन सर्व्हेलन्स युनिट आणि अत्याधुनिक प्रयोगशाळा उभारली जात असून विविध साथरोगांचे लवकर निदान व नियंत्रणासाठी ही यंत्रणा उपयुक्त ठरणार आहे. या प्रकल्पासाठी केंद्र शासनाकडून ८.०९ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
रेबीजमुक्त शहरासाठी विशेष मोहीम
पशुवैद्यकीय विभागामार्फत रेबीजमुक्त शहरासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. एप्रिल २०२५ ते जानेवारी २०२६ या कालावधीत शहरात ४७ हजारांहून अधिक भटक्या कुत्र्यांची नसबंदी व लसीकरण करण्यात आले असून, एकूण १.५२ लाखांहून अधिक कुत्र्यांचे लसीकरण करण्यात आले आहे. तसेच भूगाव व शिंदेवाडी येथे श्वान निवारा केंद्र उभारण्याचे काम सुरू आहे.