पुण्यात अनधिकृत इमारतीला अधिकृत करण्यासाठी आमदाराची एन्ट्री? आयुक्त कारवाई करणार का ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2026 12:26 IST2026-03-06T12:23:05+5:302026-03-06T12:26:18+5:30

विशेष म्हणजे, कनिष्ठ कर्मचाऱ्यांपासून ते वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत ‘मॅनेज’ करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

pune news mls entry to authorize an unauthorized building? | पुण्यात अनधिकृत इमारतीला अधिकृत करण्यासाठी आमदाराची एन्ट्री? आयुक्त कारवाई करणार का ?

पुण्यात अनधिकृत इमारतीला अधिकृत करण्यासाठी आमदाराची एन्ट्री? आयुक्त कारवाई करणार का ?

- दुर्गेश मोरे

पुणे : महानगरपालिकेच्या नोटिसांच्या खेळामध्ये उभी राहिलेल्या आंबेगाव खुर्द येथील सर्व्हे नं. ३१ मधील गणेश कन्स्ट्रक्शनच्या शिवसृष्टी गृहप्रकल्पाला आता अधिकृत करण्यासाठी जिल्ह्यातील एका आमदाराने चांगलीच कंबर कसली आहे. विशेष म्हणजे, कनिष्ठ कर्मचाऱ्यांपासून ते वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत ‘मॅनेज’ करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांत महापालिकेच्या आशीर्वादाने ही इमारत अधिकृत होणार, हे नक्की.

आंबेगाव खुर्द येथील सर्व्हे नं. ३१ वर अमृतवेल खाणीमध्येच सनी शिंदे यांच्या गणेश कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून शिवसृष्टी हा गृहप्रकल्प उभारण्यात येत आहे. बांधकामाच्या सुरुवातीलाच डिसेंबर २०२३ मध्ये अनधिकृत ठरवले आहे. इतकंच नाही तर विकासक सनी शिंदे व इतर यांच्यावर एम. आर. टी. पी. ॲक्ट १९६६चे कलम ५२ अन्वये महापालिकेच्या बांधकाम विकास विभाग, झोन क्र. २ मार्फत कनिष्ठ अभियंता उमेश गोडगे हे गुन्हा दाखल करणार असल्याचे पत्र तत्कालीन बांधकाम विभागास विभाग झोन क्र. २ चे कार्यकारी अभियंता हेमंत मोरे यांनी दिले होते. त्यानुसार गुन्हाही दाखल झाला आहे. महापालिकेने केवळ कागदी घोडे नाचवत सुमारे २५० फ्लॅटचा हा प्रकल्प उभारण्यास मदत केली. या ठिकाणी ४० च्यावर कुटुंबेही वास्तव्य करण्यास आली आहेत. मात्र, ज्यावेळी खरी वस्तुस्थिती समजली त्यावेळी खरेदीदारांच्या पायाखालची वाळू सरकली. मात्र, तोपर्यंत खूप उशीर झाला. कारण, विकासकाला दिलेली रक्कमही परत मिळू शकत नाही.

महापालिकेला हाताशी धरून सुरू असलेला खेळ उघडकीस येताच जिल्ह्यातील एका आमदाराने थेट एन्ट्री केली आहे. विशेष म्हणजे, ही इमारत अनधिकृत असल्याचे माहीत असतानादेखील दबावतंत्र वापरण्यास सुरुवात झाली आहे. इतकच नाही तर ही इमारत अधिकृत करण्यासाठी थेट महापालिकेतील कनिष्ठ कर्मचाऱ्यांपासून ते वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांनाच मॅनेज करण्यासाठी संबंधित आमदारांसह विकासकाने चांगली कंबर कसल्याची नागरिकांतून चर्चा सुरू झाली आहे. यासंदर्भात पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवलकिशोर राम यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.

अनधिकृत इमारतींना लोकप्रतिनिधींचे पाठबळ ?

आंबेगाव खुर्द मधील शिवसृष्टी गृहप्रकल्प हा केवळ एकच अनधिकृत आहे असे नाही. कात्रज, आंबेगाव खुर्द, आंबेगाव बुद्रुक, जांभूळवाडीसह परिसरात मोेठ्या प्रमाणात अनधिकृत इमारती उभ्या राहत आहे. महापालिकेने काहींना केवळ नोटिसा दिल्या; पण कारवाई केली नाही. शिवसृष्टी गृहप्रकल्पाला जसे लोकप्रतिनिधीचे पाठबळ असल्याचे समोर आले. त्यावरून परिसरात असलेल्या बहुतांश किंबहुना सर्वच अनधिकृत इमारतींना लोकप्रतिनिधींचे पाठबळ असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. महत्त्वाचे म्हणजे त्यामध्ये महापालिकेचाही समावेश असणे, हे दुर्दैव.

आयुक्त कारवाई करणार की फसवणुकीला प्रोत्साहन

आंबेगाव खुर्द येथील शिवसृष्टी गृहप्रकल्प हा महापालिकेनेच अनधिकृत ठरवला आहे. मात्र, आजपर्यंत काहीच कारवाई झाली नाही. आता तर हा प्रकल्प अधिकृत करण्यासाठी एक आमदार महापालिकेतीलच अधिकाऱ्यांची फौज घेऊन उतरल्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे. विकासकाची फ्लॅट विक्री जोमाने सुरू आहे. तुटपुंजी कमाई जमा करून सर्वसामान्य या ठिकाणी घर घेत आहेत. स्वप्नातील घर अनधिकृत आहे हे त्यांना माहीतच नाही. त्यामुळे आयुक्त कारवाई करणार की फसवणुकीला प्रोत्साहन देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title : पुणे: अनधिकृत इमारत को वैध बनाने के लिए विधायक का हस्तक्षेप; क्या आयुक्त कार्रवाई करेंगे?

Web Summary : पुणे में एक विधायक द्वारा अनधिकृत शिवसृष्टि परियोजना को वैध बनाने का प्रयास किया जा रहा है, जिससे भ्रष्टाचार और अवैध निर्माणों पर नगरपालिका अधिकारियों की निष्क्रियता के बारे में चिंता बढ़ रही है।

Web Title : Pune: MLA intervenes to legalize unauthorized building; will commissioner act?

Web Summary : Pune's unauthorized Shivsrushti project faces legalization push by an MLA, raising concerns about potential corruption and inaction from municipal authorities regarding illegal constructions.