माळेगाव सहकारी साखर कारखान्याकडून प्रतिटन ३३०० ची उचल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 09:42 IST2025-12-10T09:41:48+5:302025-12-10T09:42:07+5:30
सातारा, सांगली, कोल्हापूर या उच्च उतारा जिल्ह्यांत यावर्षी शेतकरी संघटनांच्या दबावानंतर ३५०० ते ३६००रुपये प्रतिटन असा ट्रेंड तयार झाला होता.

माळेगाव सहकारी साखर कारखान्याकडून प्रतिटन ३३०० ची उचल
माळेगाव : चालू गळीत हंगामासाठी माळेगाव सहकारी साखर कारखान्याने सोमेश्वरच्या धर्तीवर प्रतिटन ३३०० रुपये इतकी पहिली उचल जाहीर केली आहे. सोमेश्वरनंतरही ही उचल जिल्ह्यातील सर्वाधिक ठरणार आहे.
माळेगाव कारखान्याचा पहिला उचलदर आणि अंतिम दर राज्यभरातील साखर उद्योगात महत्त्वाचा मानला जातो. सातारा, सांगली, कोल्हापूर या उच्च उतारा जिल्ह्यांत यावर्षी शेतकरी संघटनांच्या दबावानंतर ३५०० ते ३६००रुपये प्रतिटन असा ट्रेंड तयार झाला होता. जिल्ह्यात उतारा तुलनेने कमी असल्याने शेतकऱ्यांना या दरापेक्षा १००–२०० रुपये कमी मिळतील असे अपेक्षित होते. मात्र सोमेश्वरने प्रतिटन ३३०० रुपयांची उचल देत जिल्ह्याचा उच्चांकी दर जाहीर केला.
सोमेश्वरनंतर जिल्ह्यातील अन्य कारखाने शांतच होते. नीरा–भीमा आणि छत्रपती साखर कारखान्यांनी नुकतीच ३१०१ रुपयांची उचल जाहीर केली. त्यामुळे आता माळेगाव कोणत्या पातळीवर उचल घोषित करणार, याकडे सर्व कारखाने आणि शेतकरी वर्गाचे लक्ष होते. अखेर माळेगाव कारखान्यानेही आपल्या गाळप उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी ३३०० रुपये प्रतिटन अशी एकरकमी उचल नोंदवली. हा दर जिल्ह्यात सोमेश्वरसोबत सर्वाधिक ठरला आहे.