डेअरी मालक, प्लांटवाले दुधामध्ये भेसळ करतात त्यांच्यावर कठोर कायदा करा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2025 14:44 IST2025-09-30T14:43:45+5:302025-09-30T14:44:58+5:30
कठोर कायदा करण्यात यावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर बांगर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.

डेअरी मालक, प्लांटवाले दुधामध्ये भेसळ करतात त्यांच्यावर कठोर कायदा करा
मंचर : जर्सी गोऱ्यांचा व भाकड जनावरांचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्याकडे शासनाने लक्ष द्यावे. तसेच दुधामधील भेसळ रोखण्यासाठी कठोर कायदा करण्यात यावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर बांगर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे. तसे निवेदन देण्यात आले. पवार यांनी कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार हे जिल्हा दूध संघाच्या वार्षिक सभेसाठी आले असताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रभाकर बांगर यांनी या दोन्ही प्रश्नांकडे त्यांचे लक्ष वेधले. जर्सी गोऱ्यांचा निर्माण झालेला प्रश्न तसेच भाकड जनावरांचा विक्रीचा निर्माण झालेला प्रश्न त्यांनी सांगितला. गोवंश हत्याबंदी कायदा असल्यामुळे होणारी अडचण, जनावरांचा आठवडे बाजार बंद असल्यामुळे जनावरांची खरेदी विक्री बंद असल्याचा देखील प्रश्न उपस्थित केला. तसेच दुधामध्ये होत असलेली भेसळ रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करून त्यासंदर्भात विशेष असा कायदा करावा कारण दुधामध्ये भेसळ करणारा शेतकरी नसून शेतकरी ज्यांना दूध घालतो ते डेअरी मालक व प्लांटवाले यामध्ये भेसळ करून नागरिकांच्या जीवाशी खेळत असतात.
या भेसळखोरांवर कठोर कारवाई करावी. दुधातील भेसळ रोखल्यामुळे अतिरिक्त दूध जे बाजारामध्ये विकले जात आहे, ते बंद होऊन दुधाची कमतरता निर्माण होईल व चांगले व निर्भेळ दूध घालणाऱ्या शेतकऱ्यांना चांगला दर मिळेल याबाबत देखील आपण तातडीने पावले उचलून निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली. यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन देण्यात आले. यावेळी आंबेगाव तालुका अध्यक्ष तुकाराम गावडे, प्रकाश कोळेकर, प्रमोद खांडगे उपस्थित होते.
या विचारलेल्या प्रश्नांवर उत्तर देताना अजित पवार म्हणाले, या दोन्ही प्रश्नांबाबत गांभीर्याने दखल घेऊन मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये लवकरात लवकर चांगला निर्णय घेण्यात येईल व शेतकऱ्यांची जनावरांबाबतची असलेली अडचण दूर केली जाईल. तसेच भेसळखोरांवरती कठोर कारवाई करण्याचा कायदा लवकरात लवकर केला जाईल, असा शब्द त्यांनी प्रभाकर बांगर यांनी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात दिला.