महाविकास आघाडी की फक्त शिवसेनेबरोबर युती? मनसैनिकांचा संभ्रम कायम
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 20:52 IST2025-08-05T20:51:31+5:302025-08-05T20:52:13+5:30
पक्षाध्यक्ष राज ठाकरे काय निर्णय घेतात याबद्दल त्यांच्यामध्ये उत्सुकता आहे, त्याचबरोबर लवकर काय तो निर्णय घेतला जावा, अशी अपेक्षाही.

महाविकास आघाडी की फक्त शिवसेनेबरोबर युती? मनसैनिकांचा संभ्रम कायम
पुणे : आपण महाविकास आघाडीत जाणार आहोत की फक्त शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाबरोबर आपली युती असणार आहे? असा संभ्रम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये कायम आहे. पक्षाध्यक्ष राज ठाकरे काय निर्णय घेतात याबद्दल त्यांच्यामध्ये उत्सुकता आहे, त्याचबरोबर लवकर काय तो निर्णय घेतला जावा, अशी अपेक्षाही.
हिंदी सक्तीच्या विरोधातील आंदोलन यशस्वी झाल्यापासून मनसे व शिवसेना (उबाठा) युतीची जोरदार चर्चा सुरू आहे. शिवसेनेकडून याबाबत वारंवार बोलले जात आहे, मात्र राज ठाकरे अजूनही अंतर राखून आहेत. आपल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना त्यांनी युतीबाबत काय बोलायचे ते मीच बोलेन, अन्य कोणीही बोलू नये, अशी तंबीच दिली आहे. मात्र, त्यामुळेच या विषयाबाबत अनेक प्रश्न मनसैनिकांच्या मनात घोळत आहेत. एकटे लढून पाहिल्यानंतर सातत्याने अपयश आल्यामुळे हे प्रश्न निर्माण होत आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लढवण्याची इच्छा असलेल्या काही पदाधिकाऱ्यांबरोबर संपर्क साधला असता त्यांपैकी अनेकांनी ही युती नक्की कशी आहे, असा प्रश्न केला. शिवसेना (उबाठा), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) व काँग्रेस अशी महाविकास आघाडी आहे. मनसे आघाडीमध्ये सहभागी होणार की फक्त शिवसेनेबरोबर युती करणार, हा सर्वाधिक महत्त्वाचा प्रश्न मनसैनिकांमध्ये चर्चेत आहे. त्याचबरोबर त्याला अनेक बाजूही असल्याचे मनसैनिकांबरोबर झालेल्या चर्चेत निदर्शनास आले.
आघाडीत सामील व्हायचे असेल तर तसा काहीच विषय अजून झालेला नाही. राष्ट्रवादी काँग्रेस मराठी विजय मेळाव्याला उपस्थित असल्याने त्यांची संमती गृहीत धरली जात आहे. काँग्रेसची याला संमती मिळेल का? ते मान्य करतील का? असे प्रश्न आहेत. राज यांचे फक्त मराठीचे धोरण काँग्रेसच्या एकूण विचारधारेला अमान्य होणारे आहे. त्यामुळेच की काय त्यांच्यापैकी कोणीही मराठी विजय मेळाव्याला उपस्थित नव्हते. मात्र, शिवसेना व मनसे यांच्या एकत्र येण्याबद्दलही काँग्रेसने अद्यापतरी कसलेही भाष्य केलेले नाही.
फक्त शिवसेनेबरोबर युती करायची तर मनसैनिकांना ती हवी आहे, मात्र त्या परिस्थितीत महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेला जेवढ्या जागा मिळतील, त्याच जागांमध्ये मनसेला वाटेकरी व्हावे लागेल. तसे असेल तर मोक्याच्या अनेक जागा हातच्या निसटतील, असे मनसैनिकांना वाटते आहे. जागा वाटपात मनसेचा स्वतंत्र विचार केला जावा. मुंबई वगळता राज्यातील ठाणे, नाशिक, पुणे या शहरांमध्ये मनसेचे चांगले राजकीय वजन आहे. त्यामुळे तिथे तडजोड करावी लागली तर ती मनसेला नको आहे. तिथल्या ज्या जागा पूर्वी मनसेकडे होत्या, त्या कायम राहाव्यात, असे त्यांचे म्हणणे आहे.
राज यांच्या युतीबाबत मीच काय ते बोलेन या भूमिकेमुळे त्यांनी लवकर निर्णय घ्यावा असे मनसेच्या वतीने निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. जागा व उमेदवार निश्चित झाले तर लगेचच प्रचाराला लागता येते, निर्णयाला विलंब झाला तर कमी दिवस हाताशी राहतात व मतदारांबरोबर संपर्क साधणे अवघड होते, त्याचा परिणाम मतांवर होतो, असे काही मनसैनिकांनी सांगितले.
पक्षाध्यक्षांपर्यंत भावना पोहचल्या आहेत
पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकताच कार्यकर्त्यांना तयारीला लागा, मतदार याद्यांवर लक्ष द्या असा आदेश दिला आहे. कार्यकर्त्यांच्या भावना पदाधिकाऱ्यांनी त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या आहेत. ते यावर योग्य तो निर्णय जाहीर करतील. तोपर्यंत कार्यकर्त्यांनी आपापल्या भागातील मतदार याद्या, मतदान केंद्र याकडे लक्ष द्यावे.
- हेमंत संभूस, राज्य सरचिटणीस, मनसे