Pune news : नववर्ष स्वागतासाठी पुण्यात वाहतूक बदल; महात्मा गांधी, फर्ग्युसन, जंगली महाराज रस्ता बंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 20:12 IST2025-12-30T20:12:05+5:302025-12-30T20:12:37+5:30
गर्दी वाढल्यानंतर महात्मा गांधी रस्ता, फर्ग्युसन रस्ता मध्यरात्री गर्दी ओसरेपर्यंत या भागात वाहतूक बदल राहणार आहेत, असे पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी सांगितले.

Pune news : नववर्ष स्वागतासाठी पुण्यात वाहतूक बदल; महात्मा गांधी, फर्ग्युसन, जंगली महाराज रस्ता बंद
पुणे : नववर्षाचे स्वागत करण्यासाठी शहरात जल्लोष साजरा केला जाणार आहे. त्यामुळे लष्कर भागातील महात्मा गांधी रस्ता, तसेच फर्ग्युसन रस्ता, जंगली महाराज रस्त्यावर होणारी गर्दी विचारात घेऊन बुधवारी (दि. ३१ ) सायंकाळी पाचनंतर लष्कर आणि डेक्कन जिमखाना भागात वाहतूक बदल करण्यात आले आहेत. लष्कर भागातील महात्मा गांधी रस्ता, डेक्कन जिमखाना भागातील जंगली महाराज रस्ता, नामदार गोपाळ कृष्ण गोखले रस्ता (फर्ग्युसन रस्ता) परिसरात तरुणाईची गर्दी होते. या भागातील गर्दीचे नियोजन करण्यासाठी पोलिसांकडून बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. गर्दी वाढल्यानंतर महात्मा गांधी रस्ता, फर्ग्युसन रस्ता मध्यरात्री गर्दी ओसरेपर्यंत या भागात वाहतूक बदल राहणार आहेत, असे पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी सांगितले.
लष्कर भागातील वाहतूक बदल
वाय जंक्शनकडून महात्मा गांधी रस्त्याकडे येणारी वाहतूक १५ ऑगस्ट चौक येथे बंद करून ती कुरेशी मशीद आणि सुजाता मस्तानी चौकाकडे वळविण्यात येणार आहे. इस्काॅन मंदिराकडून डाॅ. बाबासाहेब आंबेडकर रस्ता, तसेच अरोरा टाॅवर्सकडे जाणारी वाहतूक तसेच व्होल्गा चौकातून महंमद रफी चौकाकडे जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. या भागातील वाहतूक ईस्ट स्ट्रीटवरून इंदिरा गांधी चौकाकडे वळविण्यात येणार आहे. इंदिरा गांधी चौकातून महावीर चौकाकडे जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. या भागातील वाहतूक लष्कर पोलीस ठाण्याकडे वळविण्यात येणार आहे. सरबतवाला चौकातून महावीर चौकाकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात येणार आहे.
फर्ग्युसन रस्ता आणि जंगली महाराज रस्त्यावरील वाहतूक बदल
कोथरूड आणि कर्वे रस्त्याकडून येणारी वाहतूक खंडुजीबाबा चौक येथे थांबविण्यात येणार आहे. या भागातील वाहतूक विधी महाविद्यालय रस्ता, प्रभात रस्ता, अलका चित्रपटगृहाकडे वळविण्यात येणार आहे. जंगली महाराज रस्त्यावर होणारी गर्दी विचारात घेऊन झाशीची राणी चौकातून वाहतूक बंद करण्यात येणार आहे. या भागातील वाहतूक गोखले स्मारक चौक, उपरस्ते, पुणे महापालिका भवन, ओंकारेश्वर मंदिर, छत्रपती शिवाजी महाराज रस्तामार्गे वळविण्यात येणार आहे.
महात्मा गांधी, जंगली महाराज रस्ता बंद
लष्कर भागातील महात्मा गांधी रस्ता परिसरात मंगळवारी (३१ डिसेंबर) सायंकाळी पाचनंतर वाहनांना प्रवेश बंद करण्यात येणार आहे. महात्मा गांधी रस्त्यावरील १५ ऑगस्ट चौक ते अराेरा टाॅवर्स चौकदरम्यान वाहनांना प्रवेश बंद करण्यात येणार आहे. फर्ग्युसन रस्त्यावरील गोखले स्मारक चौक ते फर्ग्युसन महाविद्यालय प्रवेशद्वारापर्यंत वाहनांना प्रवेश बंद करण्यात येणार आहे. पहाटे पाचपर्यंत वाहनांना बंदी राहणार आहे.