होलिकादहनानंतरच चंद्रग्रहणाचा योग; ३ मार्चला खग्रास चंद्रग्रहणाच्या दिवशी धूलिवंदन
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2026 11:03 IST2026-03-02T11:02:57+5:302026-03-02T11:03:09+5:30
मंगळवार दि. ३ चंद्र ग्रहण असून ते संपूर्ण भारतात दिसणार आहे.

होलिकादहनानंतरच चंद्रग्रहणाचा योग; ३ मार्चला खग्रास चंद्रग्रहणाच्या दिवशी धूलिवंदन
पुणे : यंदा होळी आणि चंद्रग्रहणाचा दुर्मीळ योग जुळून येत आहे. सोमवार, दि. २ मार्च २०२६ रोजी भद्रा असली तरी सूर्यास्तानंतर प्रदोषकाळात होलिकादहन करावे, अशी माहिती दाते पंचांगचे ज्योतिष अभ्यासक मोहन दाते यांनी दिली. त्यानंतर मंगळवार, दि. ३ मार्च रोजी ग्रस्तोदित खग्रास चंद्रग्रहण होणार असून, सायंकाळी ६:४८ वाजता ग्रहण मोक्ष होईल.
दि. ३ मार्च रोजी दुपारी ३:२० वाजता ग्रहणास प्रारंभ होणार असला, तरी भारतात चंद्र उदयाला येतानाच तो ग्रहणग्रस्त दिसेल. त्यामुळे ग्रहणाचा आरंभ व मध्य भारतात दिसणार नाही. सायंकाळी ६:४८ वाजता ग्रहण संपेल.
मंगळवारी सूर्योदयापासून वेधकाळ सुरू होणार असून गर्भवती महिला, आजारी व्यक्ती, लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांनी सकाळी ११ वाजल्यापासून वेध पाळावेत. वेधकाळात अन्नसेवन टाळावे; मात्र पूजा-अर्चा, अभिषेक, नैवेद्य दाखविणे, कुळधर्म आदी धार्मिक कृत्ये करता येतील.
वेधकाळात धूलिवंदन व रंग खेळणे करता येईल. मात्र, आपल्या गावाच्या सूर्यास्तापासून सायंकाळी ६:४८ पर्यंत ग्रहणाचा पर्वकाळ राहील. काही ठिकाणी पर्वकाळ अल्प असल्यास मोक्षानंतर स्नान करावे. ज्या ठिकाणी १५-२० मिनिटांपेक्षा अधिक पर्वकाळ असेल, त्यांनी सूर्यास्तानंतर स्नान करून जप करावा व ६:४८ नंतर मोक्षस्नान करूनच भोजन करावे. “हे ग्रहण ग्रस्तोदित असल्याने चंद्र उगवत असतानाच ग्रहण लागलेले दिसेल.”
ज्योतिषशास्त्रानुसार मिथुन, तुला, वृश्चिक व मीन राशींना शुभफल, मेष, कर्क, धनु व कुंभ राशींना मिश्रफल, तर वृषभ, सिंह, कन्या व मकर राशींना अनिष्ट फल मिळेल, असे ज्योतिष अभ्यासक मोहन दाते यांनी सांगितले.
मंगळवार दि. ३ चंद्र ग्रहण असून ते संपूर्ण भारतात दिसणार आहे.
वेधकाळ : सकाळी ११ ते दुपारी ३:२०
ग्रहण पर्वकाळ (मुख्य ग्रहणकाळ)
दु. ३:२० ते सायंकाळी ६:४८ पर्यंत
गर्भवती महिलांनी कधीपासून ग्रहण पाळावे?
ग्रहणाचे वेध सकाळी ११ पासून सुरू होत असून गर्भवती महिलांनी स. ११ पासून वेध पाळावेत. वेधकाळात फक्त भोजन करू नये. मात्र, आवश्यक गोष्टी म्हणजे पाणी पिणे, मलमूत्रोत्सर्ग, झोप इ. कर्मे करता येतात. मात्र, ग्रहण पर्वकाळात सुरुवात झाल्यानंतर (दु. ३:२० ते सायं. ६:४८ ) या कालावधीत अन्नसेवन, पाणी पिणे, मलमूत्रोत्सर्ग, झोप इ. कर्मे करू नयेत.