शहरातील कामगारांना 'लाल सलाम' करणारे डाव्यांचे पक्ष आणि संघटना

By राजू इनामदार | Updated: December 6, 2025 13:23 IST2025-12-06T13:21:54+5:302025-12-06T13:23:51+5:30

लाल सलाम, कामगार क्रांती अशा विचारांच्या कम्युनिस्ट पक्षांच्या कामगार संघटना मात्र शहर व जिल्ह्यात फारसा आवाज न करता वेगवेगळ्या क्षेत्रात वाढत होत्या.

pune news left parties and organizations that give a red salute to workers | शहरातील कामगारांना 'लाल सलाम' करणारे डाव्यांचे पक्ष आणि संघटना

शहरातील कामगारांना 'लाल सलाम' करणारे डाव्यांचे पक्ष आणि संघटना

सत्तेच्या साठमारीत श्रमिकांच्या संघटना
 

लाल सलाम, कामगार क्रांती अशा विचारांच्या कम्युनिस्ट पक्षांच्या कामगार संघटना मात्र शहर व जिल्ह्यात फारसा आवाज न करता वेगवेगळ्या क्षेत्रात वाढत होत्या. रेल्वे, पोस्ट, बँका, संरक्षण, विमा अशा केंद्र सरकारी उपक्रमांमध्ये कम्युनिस्ट पक्षांच्या कामगार संघटना आजही कार्यरत आहेत.
 
पुणे : डाव्या पक्षांचा फार मोठा प्रभाव पुणे शहर किंवा जिल्ह्यात कधीही नव्हता, मात्र त्यांच्या कामगार संघटना फारच प्रभावी होत्या. आधी आयटक (ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस) व नंतर सीटु या दोन्ही कामगार संघटनांच्या जिल्ह्यात व शहरातही शक्तिशाली शाखा होत्या. आजही त्या कार्यरत आहेत, मात्र त्यांच्या राजकीय पक्षांची जिल्ह्यातील राजकीय ताकद कमी असल्याने कामगारांपुरतेच या शाखांचे काम मर्यादित राहिले आहे.

आयटक (ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस) ही देशातील आद्य कामगार संघटना. तिची स्थापना १९२० ची. काँग्रेस अंतर्गतच ती काम करायची. काँग्रेसच्या इंटकसह समाजवाद्यांच्या हिंद मजदूर सभा, किसान पंचायत अनेक कामगार संघटनांचा उदय आयटकमधूनच झाला आहे. सीटु (सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स ही कामगार संघटनाही आयटकमधूनच तयार झाली आहे. स्थापनेपासूनच आयटकवर कम्युनिस्ट विचारांच्या मंडळींचा प्रभाव होता. तो वाढत गेल्यानंतर काँग्रेसपासून ही संघटना पूर्णपणे बाजूला गेली. कम्युनिस्ट पक्षांमधील फुटीनंतर आयटक मध्येही फूट पडत गेली. कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया व मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी असे दोन प्रमुख पक्ष तयार झाले. त्यानंतर आयटकमध्येही दोन गट झाले व त्यांच्याही दोन संघटना तयार झाल्या. देशपातळीवर झालेल्या या फुटीचे पडसाद पुण्यातही उमटले.

प्रभाकर मानकर, सदाशिव भट, वसंत पवार हे सिटुचे पुण्यातील संस्थापक सदस्य. यातील मानकर हे सन १९४० पासून कामगार संघटनेत काम करायचे. भट त्यांच्यानंतरचे, मग सतीश चव्हाण, मनोहर अभ्यंकर असे वेगवेगळे लोक संघटनेत येत गेले. रेल्वे, पोस्ट, संरक्षण अशा केंद्र सरकारच्या विविध उपक्रमांमध्ये त्यांनी बांधलेल्या कामगारांच्या संघटना आज इतक्या वर्षांनंतरही, कम्युनिस्ट पक्षांचे कोणतेही पाठबळ नसताना कार्यरत आहेत, हे विशेष. मानकर यांचे निधन झाल्यावर पुण्यातील संघटनाचे नेतृत्व काही काळ मुंबईतून प्रभाकर संझगिरी यांनी केले. त्यांच्यानंतर सदाशिव भट यांच्याकडे व त्यानंतर अजित अभ्यंकर यांच्याकडे ही जबाबदारी आली. वसंतराव तुळपुळे, मदन फडणीस, एकनाथ बारहाते, भाई टिळेकर कम्युनिस्ट कामगार संघटनांचे पुणे शहर व जिल्ह्यातील पदाधिकारी.

संयुक्त महाराष्ट्र चळवळीत कम्युनिस्ट पक्षांच्या कामगार संघटनांचे फार मोठे योगदान होते. पुण्यातून त्यावेळी विष्णू चितळे हे कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार निवडून आले होते. पक्षाला पुण्यासारख्या ठिकाणी हे यश मिळाले याला संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे कारण होतेच, पण त्या निवडणुकीत कम्युनिस्ट पक्षांच्या कामगारांनी केलेले कामही महत्त्वाचे होते. सासवड परिसरात फत्तेसिंग पवार हेही कम्युनिस्ट कामगार चळवळ चालवत. त्यांचा हा वारसा त्यांच्या कुटुंबीयांनी अजूनही कायम ठेवला आहे. जिल्ह्यातील सहकार चळवळीमुळे कम्युनिस्ट पक्षांना फार मोठे राजकीय यश मिळाले नाही, मात्र विडी कामगार, शेतमजूर, हॉटेल कामगार अशा कष्टकरी वर्गात पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी चांगल्या संघटना बांधल्या.

आयटक व सिटु यांनी नंतर पक्षांमधील फुटीमुळे कामगार संघटनांमध्ये मतभेद होऊन त्यांच्या हिताला बाधा येऊ नये, असा निर्णय घेतला. काय करता येईल यावर विचारमंथन झाले. उपाय असा निघाला की कामगारांचे मतदान घ्यायचे. त्यांना हवी ती संघटना ते मतदान करून निवडतील. पक्ष कम्युनिस्ट असले तरी लोकशाही पद्धतीने असा निर्णय घेतला गेला, विशेष म्हणजे कोणत्याही वादंगाविना तो राबवला गेला हे महत्त्वाचे. १९७० ते ८२ व त्यापुढच्या काळातील या घटना. त्या मतदानात आयटकच्या कामगार संघटनांना विशेष पसंती मिळाली नाही. काही मोजक्या ठिकाणी त्यांच्या संघटना राहिल्या, पण प्राबल्य मात्र सिटु चेच राहिले.

कम्युनिस्ट पक्षांचे राजकीय अस्तित्व कमीकमी होत गेले, तरीही त्यांच्या कामगार संघटना मात्र कार्यरत राहिल्या. याचे कारण काय याबद्दलचे निरीक्षण अजित अभ्यंकर यांनी सांगितले. कारखाना स्तरावर असलेल्या संघटनांमध्ये पक्ष किंवा पक्षाची विचारधारा असे काहीच नसते. आर्थिक करार व कामाच्या ठिकाणची सुरक्षा, सुविधा असे विषय असतात. त्यातूनच मग वेगवेगळ्या कारखान्यांमधील संघटना कम्युनिस्ट विचारधारा किंवा मूळ पक्षाबरोबर बांधिलकी यापेक्षाही कारखान्यांपुरत्याच मर्यादित राहत गेल्या. त्यातून त्यांना निर्णयाचे स्वातंत्र्यही मिळाले. याचा अर्थ त्यांनी पक्षाचा किंवा विचारधारेचा त्याग केला असे नाही. पक्षाला गरज असेल त्यावेळी या संघटना आजही पक्षाबरोबर असतातच, पण त्यांच्यावरचा राजकीय कामगार संघटना हा शिक्का त्यांनी जाणीवपूर्वक कमी केला किंवा घालवला, असे अभ्यंकर यांनी सांगितले.

नव्या व्यवस्थेत इंजिनिअर लेबर युनियन व जनरल लेबर युनियन अशा स्वतंत्र कामगार संघटना वेगवेगळ्या कारखान्यांमध्ये स्थापन झाल्या आहेत. देशस्तरावर श्रमिक एकता महासंघ व राष्ट्रीय श्रमिक आघाडी, असे महासंघ स्थापन केले गेले आहेत. कारखाना स्तरावरील कामगार संघटना आता या महासंघाबरोबर संलग्न राहतात, पण कारखाना स्तरावरील प्रश्न स्वत:च सोडवतात. काही मोठे प्रश्न असतील, समस्या असतील तर महासंघाबरोबर संपर्क साधून त्यांची मदत मिळवतात.

Web Title : वामपंथी दल और यूनियनें पुणे के श्रमिकों को सलाम करती हैं: एक ऐतिहासिक अवलोकन।

Web Summary : घटी हुई राजनीतिक ताकत के बावजूद, पुणे में वामपंथी श्रमिक संघ सक्रिय हैं। एटक और सीटू में निहित, वे कारखाने के स्तर पर श्रमिक कल्याण को प्राथमिकता देते हैं, आर्थिक समझौतों और कार्यस्थल सुरक्षा पर ध्यान केंद्रित करते हैं, प्रत्यक्ष राजनीतिक संबद्धता से स्वतंत्र। प्रारंभिक व्यापार आंदोलनों में उनका प्रभाव उल्लेखनीय है।

Web Title : Leftist parties and unions salute Pune's workers: A historical overview.

Web Summary : Despite diminished political clout, leftist labor unions in Pune remain active. Rooted in AITUC and CITU, they prioritize worker welfare at the factory level, focusing on economic agreements and workplace safety, independent of direct political affiliations. Their influence in early trade movements is notable.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.