पुणे : ‘सगळीकडेच वाहतूक कोंडी झाली आहे, नेतेच याला जबाबदार आहेत. त्यामुळेच मी मुंबईतही गणपती दर्शनाला कधी जात नाही. आम्ही आत जातो, गणपतीचे आशीर्वाद घेतो व बाहेर आल्यावर लोकांच्या शिव्या खातो’ अशा उद्विग्न शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वाहतूक कोंडीबाबतचा आपला संताप व्यक्त केला. बैठकीसाठी मध्यवर्ती भागातील सावित्रीबाई फुले स्मारक निवडल्याबद्दल त्यांनी स्पष्टपणे आपली नाराजी व्यक्त केली.
बैठकस्थळी येण्याआधी राज ठाकरे रविवार पेठेतील प्रल्हाद गवळी या पदाधिकाऱ्याच्या गणेशमूर्ती विनामूल्य देण्याच्या स्टॉलवर गेले होते. तिथे ते वाहतूक कोंडीत अडकले. तिथून सुटका झाल्यावर ते गंज पेठेतील महात्मा फुले वाडा येथे अभिवादन करण्यासाठी गेले. तिथेही त्यांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. तिथून पुढच्याच चौकात असलेल्या बैठकस्थळी म्हणजेच सावित्रीबाई फुले स्मारकात येतानाही त्यांचे वाहन एकदोन ठिकाणी अडकून पडले.
बैठकीनंतर राज ठाकरे यांच्याबरोबर बोलताना एका स्थानिक पदाधिकाऱ्याने अन्य एकदोन ठिकाणाचे महापालिकेचे सभागृह उपलब्ध नव्हते. हे मध्यवर्ती भागातील आहे, मात्र बैठक व तुमची उपस्थिती यामुळे वातावरण निर्मिती होते, त्याचा विचार करून हे सभागृह घेतले असे सांगत समर्थन करण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर पुढील वेळी वाहतूक कोंडी होणार नाही याची काळजी घेऊ, असे सांगण्यासही हा पदाधिकारी विसरला नाही.